आज दि.११ सप्टेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

साकीनाका बलात्कार खटला
फास्ट ट्रॅकवर चालवण्याचे आदेश

मुंबईच्या साकीनाका परिसरामध्ये झालेल्या बलात्कार घटनेतील पीडितेचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार करुन आरोपीने गुप्तांगात रॉड घुसवल्याचा अमानवीय प्रकार समोर आला होता. घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात या महिलेचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फास्ट ट्रॅकवर हा खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल, असं आश्वासन दिले आहे. कोर्टाने आरोपी मोहन चौहानला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू, घरात अशा अवस्थेत मिळाला मृतदेह

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्याचा मृतदेह राहत्या घरात सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. या अभिनेत्याने आत्महत्या केली की हत्या झाली असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. अभिनेता रमेश वलियासाला यांचा मृतदेह राहत्या घरात शनिवारी रहस्यमय परिस्थितीत आढळला. या प्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद पोलिसांनी केली असून तपास सुरू आहे. 

अभिनेता रमेश वलियासाला यांचा मृतदेह घरात गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला आहे. रमेश हे दोन दिवसांपूर्वी नवीन प्रोजेक्टच्या शूटिंगवरून घरी परतले होते. ते मल्याळमधील सर्वात लोकप्रिय अभिनेते म्हणून लोकप्रिय आहेत. त्यांनी अनेक चित्रपटात देखील काम केले होते. 

ही मन सुन्न करणारी
घटना : फडणवीस

राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भा तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. “साकीनाक्यात घडलेला प्रकार आणि त्यानंतर पीडितेचा मृत्यू मन सुन्न करणारा आहे. गेल्या महिन्याभराच्या काळात बलात्काराच्या घटना होत आहेत. याकडे लक्ष देण्याची गरज आहे”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. तसेच, या घटना मुंबईत असुरक्षिततेची भावना निर्माण करणाऱ्या असल्याचं देखील ते यावेळी म्हणाले.

अमरावतीमध्ये अल्पवयीन गर्भवती
बलात्कार पीडितेची आत्महत्या

अमरावतीमध्ये अल्पवयीन गर्भवती बलात्कार पीडितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला आहे. येवदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात ही घटना घडली आहे. बलात्कारानंतर पीडिता सात महिन्यांची गर्भवती राहिली होती. पीडितेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. शवविच्छेदन झाल्यानंतर पीडिता सात महिन्यांची गर्भवती असल्याचं समोर आलं. संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे.

ज्याच्याकडे ज्ञान आणि कौशल्य
त्याला उपजीविकेची काळजी नाही

ज्याच्याकडे ज्ञान आणि कौशल्य आहे त्याला आपल्या उपजीविकेची काळजी करावी लागत नाही असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं. गुजरातमधल्या अहमदाबाद इथल्या सरदारधाम भवनाच्या लोकार्पण सोहळ्यावेळी ते बोलत होते. सक्षम व्यक्ती आपल्या प्रगतीसाठी स्वतःचं मार्ग निर्माण करतो, असंही ते यावेळी बोलताना म्हणाले.

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा
प्रभाव काहीसा ओसरला

गेल्या काही दिवसांपासून देशात सुरू असलेला करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव काहीसा ओसरताना दिसत आहे. समोर येणारी आकडेवारी तर असेच संकेत देत आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या दैनंदिन आकडेवारीनुसार, करोना रुग्णसंख्येत आणि मृतांच्या संख्येतही काही दिवसांपासून चढउतार दिसून येत आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात ३३ हजार ३७६ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या तीन लाख ९१ हजार ५१६ झाली आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री विजय
रुपाणी यांनी दिला राजीनामा

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी शनिवारी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे राजीनामा सोपवला. राजीनामा दिल्यानंतर रुपाणी यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. कोणतीही जबाबदारी दिली तरी ती मी पार पाडेल. मला ५ वर्षांसाठी मुख्यमंत्र्यांची जबाबदारी मिळाली, ही मोठी गोष्ट आहे असे विजय रुपाणी यांनी म्हटले आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीला अवघ्या एका वर्षाचा कालावधी उरला असताना रुपाणी यांनी राजीनामा दिला आहे. आता पुढचा मुख्यमंत्री कोण? राजकीय वर्तुळात खलबतं सुरु झाली आहेत.

राज्यातील साखर कामगारांना
१२ टक्के वेतनवाढ

राज्यातील साखर कामगारांना १२ टक्के वेतनवाढीसह महागाई भत्त्यात २ रुपये ७० पैशावरून २ रुपये ९० पैसे वाढ व एक अतिरिक्त वेतनवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने स्थापन केलेल्या त्रिपक्षीय समितीच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. हा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे दि. १ एप्रिल २०१९ पासून लागू होणार असून साखर कारखाने फरकाची रक्कम देणार आहेत.

लस न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना
सक्तीच्या रजेवर पाठवणार

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी शुक्रवारी घोषणा केली की, राज्य सरकारी कर्मचारी जे वैद्यकीय व्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणामुळे करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेण्यास अपयशी ठरतील त्यांना १५ सप्टेंबरनंतर सक्तीच्या रजेवर पाठवले जाईल. पंजाबच्या मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे की, राज्यातील लोकांना रोगापासून वाचवण्यासाठी हा उपाय लागू केला आहे.

राजीव सातवांच्या पत्नीला
विधानसभेची उमेदवारी?

राष्ट्रीय स्तरावरील काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या जागी त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना राज्यसभेवर पाठवायचे की नाही, अद्याप पक्षाचा निर्णय होऊ शकलेला नाही. प्रज्ञा सातव यांना राज्यसभेवर पाठवावे की विधानसभेची उमेदवारी द्यावी, याविषयी वरिष्ठ नेत्यांमध्ये अद्याप चर्चा सुरु आहे. राज्यसभेच्या 6 रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली जाण्याची चर्चा सुरु आहे. त्याऐवजी प्रज्ञा यांना 2024च्या विधानसभा निवडणुकीत कळमनुरी मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, असा मतप्रवाह आहे. आता काँग्रेस काय निर्णय घेणार, याकडे नजरा लागल्या आहेत.

दगडूशेठ हलवाई गणपतीला
10 किलो वजनाचा सोन्याचा मुकुट

मुंबई, पुण्यासह आज राज्यभरात गणरायाचं वाजत गाजत स्वागत करण्यात आलं. कोरोनाचे नियम पाळून सार्वजनिक मंडळांमध्ये आणि घरोघरी बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली. पुण्यातील प्रसिध्द श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला एका भक्तानं तब्बल 10 किलो वजनाचा सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे. सध्या पुण्यासह संपूर्ण राज्यात या 10 किलो सोन्याच्या मुकुटाची चर्चा सुरू आहे. या सोन्याच्या मुकुटाची किंमत सुमारे 6 कोटी रुपये इतकी आहे. सोन्याचा मुकूट बाप्पाचरणी देणाऱ्याचं नाव मात्र गुपित ठेवलंय.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.