इंधन दरवाढीमुळे धास्तावलेले सामान्य नागरिक पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कधी घट होणार, याकडे डोळे लावून बसले आहेत. मात्र, आता सप्टेंबर महिन्याचा पंधरवडा उलटत आला तरी इंधनाच्या दरात फारशी कपात झालेली नाही. रविवारी देशात सलग सातव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर आहेत. यापूर्वी 5 सप्टेंबरला पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट झाली होती. सप्टेंबर महिन्यातील पहिल्या 12 दिवसांमध्ये इंधनाच्या दरात अवघ्या 30 पैशांची कपात झाली आहे. त्यामुळे इंधनाचे दर कमी होऊन महागाई आटोक्यात येण्याच्या सामान्यांच्या आशा पार धुळीस मिळाल्या आहेत.
पेट्रोलियम कंपन्यांनी रविवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 107.26 रुपये तर एका लीटल डिझेलसाठी 96.19 रुपये मोजावे लागत आहेत. तर दिल्लीत प्रतिलीटर पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 101.19 आणि 88.62 रुपये इतका आहे. हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील.
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.
देशभरात इंधन दरवाढीमुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. मात्र, हा काळ केंद्र सरकारसाठी सुगीचा ठरताना दिसत आहे. कारण पेट्रोल आणि डिझेलवरील करांच्या माध्यमातून केंद्र सरकारला मिळणाऱ्या महसूलात घसघशीत वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या चार महिन्यांमध्येच इंधनावरील अबकारी करातून (Excise Duty) मिळणाऱ्या महसूलात तब्बल 48 टक्के वाढ झाली आहे.
केंद्र सरकारला तेल रोख्यांचे पैसे अदा करण्यासाठी मोठ्याप्रमाणावर खर्च करावा लागत आहे. मात्र, यंदाच्या आर्थिक वर्षातील पहिल्या चार महिन्यांत कराच्या माध्यमातून मिळालेले उत्पन्न या देयकांच्या तीनपट इतके आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या माहितीनुसार, एप्रिल ते जुलै या काळात अबकारी कराच्या माध्यमातून सरकारला एक लाख कोटीहून अधिकचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्यावर्षी हाच आकडा 67,895 कोटी रुपये इतका होता.