आज दि. ५ एप्रिल च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

राहुल गांधी शिक्षा प्रकरण, गुलाम नबी आजाद यांचं मोठं विधान

डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीचे (डीपीएपी) अध्यक्ष गुलाम नबी आझाद यांनी बुधवारी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. न्यूज 18 चे व्यवस्थापकीय संपादक अमिश देवगण यांच्याशी खास संवाद साधताना आझाद म्हणाले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या जवळचे लोक त्यांचे विरोधक आहेत आणि त्यांनी जे केले त्यामुळे आज त्यांना शिक्षा झाली आहे.

माजी केंद्रीय मंत्री आझाद यांनी राहुल गांधी यांच्या’मोदी आडनाव’ विधानाबद्दल माफी मागण्यास नकार दिल्याबद्दल राहुल गांधींवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, सर्व गांधींनी माफी मागितली आहे, इंदिरा गांधींनीही माफी मागितली आहे. 

आदित्य ठाकरेंनी केली मुख्यमंत्री शिंदेंची नक्कल, लोक म्हणाले वन्स मोअर…

रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी महाविकास आघाडीकडून आज ठाण्यात भव्य असा मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्याच्या निमित्ताने ठाकरे गट आणि राष्ट्रवादीने जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नक्कल सुद्धा केली. सभेतील उपस्थितीत लोकांनी वन्स मोर अशी दादही दिली. पण, आता वन्स मोअर नको, यांना कायमचं घालवायचं आहे, असं म्हणताच सभेत एकच टाळ्यांचा कडकडाट झाला.

रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी महाविकास आघाडीने ठाण्यात महामोर्चा काढला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी कडक भाषण केलं.

नवी मुंबई: कडधान्य दरात वाढ, पावसाने उत्पादनावर परिणाम

वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न धान्य बाजार समितीत कडधान्य आवक घटली असल्याने २% ते ९% दरवाढ झाली आहे. ऐन हंगामात अवकाळी पावसाने उत्पादनावर परिणाम झाल्याने बाजारात आवक घटली, त्यामुळे हरभरा,चणाडाळ, तूरडाळ, मसुरडाळ, मुगडाळीची दरवाढ झाली आहे.गृहिणींच्या नित्याच्या वापरात तूर,मसूर,मूग चणाडाळ असतेच. त्यामुळे महागाई होऊन देखील या डाळींची मागणी तेवढ्याच प्रमाणात असते. मात्र अवकाळी पावसाने उत्पादनाला फटका बसला असून बाजारात आवक कमी झाली आहे.

सोलापुरात यंदा उन्हाळ्यात प्रथमच तापमानाने ओलांडली चाळिशी

कोरडे आणि उष्ण हवामानाचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापुरात सध्याच्या उन्हाळ्यात बुधवारी सर्वाधिक ४०.३ अंश सेल्सिअस तापमान मोजण्यात आले. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तापमानाने चाळिशी पार केल्यामुळे प्रचंड उकाडा जाणवत आहे. यातच सध्या मुस्लीम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्यात दिवसभर निरंकारी उपवास करताना सर्वांची कसोटी लागत आहे.

मुंबईतील एअर इंडियाची इमारत शिंदे सरकार ‘इतक्या’ कोटींना विकत घेणार

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार नरिमन पॉइंट येथील एअर इंडियाची प्रसिद्ध इमारत विकत घेण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे त्या इमारतीला शिंदे सरकार मंत्रालयाच्या विस्तारात रूपांतरित करण्याच्याही प्रयत्नात आहे. इमारतीची मालकी असलेल्या एआय अॕसेट्स होल्डिंग लिमिटेडने राज्य सरकारच्या १,६०० कोटी रुपयांच्या अंतिम ऑफरला तत्त्वतः मान्यता दिली होती. केंद्र सरकारनं तिथली सगळी कार्यालये हलवून १०० टक्के इमारतीचा ताबा आमच्याकडे दिल्यासच हा करार प्रत्यक्षात उतरणार असल्याचंही एका वरिष्ठ मंत्र्यांनी सांगितलं आहे.

बागेश्वर बाबा अखेर नरमले

बागेश्वर धाम सरकारचे पीठाधीश्‍वर महंत धीरेंद्र कृष्ण शास्त्री त्यांच्या वक्तव्यावरुन वारंवार चर्चेत येत असतात. काही दिवसांपूर्वी संत तुकाराम महाराज यांच्याबाबत त्यांनी वादग्रस्त माहिती सांगितली होती. तर नुकतेच शिर्डीचे साई बाबा यांच्यावरही त्यांनी असच वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यानंतर देशभरातून साईभक्तींनी नाराजी व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की साईबाबा संत असू शकतात पण त्यांना देव म्हणता येणार नाही. धीरेंद्र शास्त्रींच्या या वक्तव्यावरून खळबळ उडाली होती, त्यानंतर त्यांनी आता माफी मागितली आहे.

आरजेडीमुळे बिहारमध्ये पुन्हा ‘जंगलराज’

रामनवमीच्या दिवशी बिहारमध्ये काही ठिकाणी हिंसक प्रतिक्रिया उमटल्या. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सासाराम येथील दौरा रद्द करावा लागला होता. या हिंसाचाराच्या प्रकारावरून भाजपाने सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. जनता दल (यु) आणि राष्ट्रीय जनता दलाने एकमेकांशी हातमिळवणी केल्यानंतर राज्यात दंगलीचे प्रकार वाढले आहेत, अशी टीका भाजपाकडून करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी २ एप्रिल रोजी नवादा येथील जाहीर सभेत सरकारवर आरोप करीत जनतेला आवाहन केले की, “भाजपा २०२४ रोजी पुन्हा सत्तेत आल्यानंतर आम्ही दंगलीचे प्रकार गाडून टाकू.” तसेच केंद्रीय गृहखात्याने बिहारचे राज्यपाल आर. व्ही. आर्लेकर यांना पत्र लिहून सासाराम आणि बिहारशरीफ येथील दंगलीबाबत कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्याची विनंती केली.

हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीनावर मोठी अपडेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 11 एप्रिलला सुनावणी होणार आहे. तोपर्यंत मुश्रीफांना अटकेपासून दिलेलं संरक्षण कायम असणार आहे. न्यायमूर्ती एम जी देशपांडे यांचं कोर्ट या प्रकरणावर निर्णय देणार आहे. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना तसेच कोल्हापूर जिल्हा सहकारी बँक यामध्ये कथित गैरव्यवहार केल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांच्यावर आहेत

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येची सुप्रीम कोर्टाकडून दखल

देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. यामुळे नागरिकांच्या चिंतादेखील वाढल्या आहेत. अशातच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी वकिलांना मोठी सूट दिली आहे. सरन्यायाधीशांनी वकिलांना न्यायालयात वर्च्युअली हजर राहण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आता वकीलही वर्क फ्रॉम होम (घरून काम) करू शकतील. सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, वर्तमानपत्रांमधील रिपोर्ट्स सांगतायत की, देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत जर वकील न्यायालयात वर्च्युअली हजर राहणार असतील तर ते असं करू शकतात. तसेच वकील हायब्रिड पद्धतीने देखील काम करू शकतात.

सर्वोच्च न्यायालयाचा विरोधी पक्षांना दणका

गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात आणि देशभरात विरोधी पक्षांकडून सातत्याने केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा केंद्र सरकारकडून गैरवापर होत असल्याचा आरोप सातत्याने विरोधी पक्षांकडून केला जात आहे. तपास यंत्रणांना हाताशी धरून विरोधी पक्षातील नेत्यांना त्रास दिला जात आहे आणि त्यांना भाजपामध्ये जाण्यास भाग पाडलं जात आहे असाही दावा करण्यात आला. यासंदर्भात देशातील एकूण १४ विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जे. बी. पर्दीवाला यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. या याचिकेमध्ये प्रामुख्याने ईडी आणि सीबीआयला लक्ष्य करण्यात आलं होतं. यावेळी न्यायालयाने याचिका फेटाळताना विरोधी पक्षांना सुनावलं. “कोणत्याही सबळ पुराव्याशिवाय फक्त राजकीय नेतेमंडळींसाठी आम्ही आदेश देऊ शकणार नाही. न्यायालयानं असं केल्यास ते कदाचित धोकादायक ठरू शकेल”, असं न्यायालयाने यावेळी नमूद केलं.

देशात २४ तासात आढळले ४,४३४ नवे कोरोनाबाधित रुग्ण, मृत्यूंचं प्रमाण २०० टक्क्यांनी वाढलं

कोरोनाबाबतची चिंताजनक आकडेवारी नुकतीच समोर आली आहे. गेल्या २४ तासात देशात तब्बल ४,४३५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. गेल्या १६३ दिवसांमधील ही सर्वाधिक संख्या आहे. गेल्या २४ तासांत आढळलेल्या नवीन रुग्णांसह देशातील एकूण सक्रीय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता २३,०९१ वर गेली आहे. सक्रीय रुग्ण म्हणजे, ज्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान, एका बाजूला नव्या रुग्णांची संख्या वाढत असताना मृतांची संख्यादेखील वाढली आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात कोरोनामुळे १५ रुग्णांनी जीव गमावला आहे. यापैकी महाराष्ट्र आणि केरळमध्ये प्रत्येकी चार मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. तर छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, पुद्दुचेरी आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात कोरोनामुळे ५,३०,९१६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

WAR2 बाबत मोठी अपडेट! ह्रतिक रोशनला टक्कर देणार ज्युनिअर एनटीआर?

बॉलिवूडचा फिट अभिनेता म्हणून ओळखला जाणार ऋतिक रोशन सध्या त्याच्या अपकमिंग ‘वॉर 2’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमाशी संबंधीत सगळ्या डिटेल्स प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहेत.  वॉरनं प्रेक्षकांचं चांगलंच प्रेम मिळवलं. त्यानंतर वॉर 2साठी प्रेक्षक चांगलेच उत्साही आहेत. वॉर 2मध्ये ऋतिकला टक्कर देण्यासाठी थेट साऊथ अभिनेत्याची एंट्री होणार आहे. आरआरआर सारख्या सिनेमातून जगभरातील प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा अभिनेता ज्युनिअर एनटीआरची वॉर2मध्ये वर्णी लागल्याचं म्हटलं जात आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.