कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतातील अनेक राज्यांमध्ये सध्या हाहा:कार उडाला आहे. गेल्यावेळच्या तुलनेत यंदा कोरोना संसर्ग वेगाने वाढत आहे. अशा दहशतीच्या वातावरणात अनेकजण कोरोनापासून वाचण्यासाठी उपाय शोधत आहेत. कोरोनापासून वाचण्यासाठीचा सर्वात सुरक्षित उपाय म्हणजे घरातून शक्य तितक्या कमी वेळा बाहेर पडणे. मात्र, तुमच्यावर अगदी घराबाहेर पडण्याची वेळ आलीच तर मास्कचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला पोहोचल्यामुळे नागरिक पुन्हा मास्क घालताना दिसत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आतापर्यंत मेडिकल मास्क आणि फॅब्रिक मास्क अशा दोन मुखपट्ट्यांचा (Mask) वापर केला जात होता. मात्र, कोरोनाचा प्रकोप वाढल्यामुळे घराबाहेर पडताना अनेकजण या दोन्ही मास्कचा म्हणजे डबल मास्कचा वापर करत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने मेडिकल मास्क आणि फॅब्रिक मास्कच्या वापरासंदर्भात काही नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. जेणेकरून तुम्हाला कोरोनाच्या विषाणूंपासून अधिकाअधिका संरक्षण मिळू शकेल.
जागतिक आरोग्य संघटनेने ट्विटरवर एक व्हीडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी मेडिकल किंवा सर्जिक मास्कचा वापर आरोग्य कर्मचाऱ्यांनी करावा, असे म्हटले आहे. तसेच ज्या लोकांना कोव्हीडची लक्षणे जाणवत आहेत किंवा जे लोक कोरोना रुग्णांची देखभाल करत आहेत, अशा व्यक्तींसाठी सर्जिकल मास्क उपयुक्त आहे. याशिवाय, ज्या भागांमध्ये कोरोनाचा प्रचंड प्रादुर्भाव झाला आहे आणि ज्याठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळणे शक्य नाही, अशा ठिकाणी ज्येष्ठ व्यक्ती आणि सहव्याधी असणाऱ्या लोकांनी सर्जिकल मास्क घालूनच फिरावे, असा सल्ला WHO ने दिला आहे.
फ्रॅबिक मास्क कोणी वापरायचा?
जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनांनुसार, ज्या व्यक्तींना कोरोनाची कुठलीही लक्षणे जाणवत नाही, त्यांनी फ्रॅबिक मास्कचा वापर करावा. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतीत कर्मचारी, रेशन आणि गर्दीच्या ठिकाणी काम करत असलेल्या व्यक्तींनी फॅब्रिक मास्कचा वापर केल्यास चालेल, असे WHO ने म्हटले आहे.
डबल मास्कचा फायदा होतो का?
काही डॉक्टरांच्या माहितीनुसार, सर्जिकल आणि फ्रॅबिक असे दोन्ही म्हणजे डबल मास्क घातल्यास कोरोना विषाणुंचा संसर्ग होण्याची शक्यता कमी होते. अमेरिकेतील CDC च्या अभ्यासानुसार, डबल मास्क परिधान केल्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका 96.4 टक्क्यांनी कमी होतो.