जन्म. १३ ऑगस्ट १८९८
प्रल्हाद केशव अत्रे हे मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी व वक्ते होते. ते महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते होते. त्यांना आचार्य अत्रे असे म्हटले जात होते. अत्र्यांच्या घणाघाती भाषणांमुळेच संयुक्त महाराष्ट्र मिळाला असे मानले जाते.
साहित्यिक, शिक्षणतज्ञ, चित्रपटनिर्माते-दिग्दर्शक, वृत्तपत्रकार, वक्ते आणि नेते म्हणून ते संपूर्ण महाराष्ट्राला परिचित होते. त्यांचे शालेय शिक्षण जन्मगाव सासवड येथे व पुढे पुणे, मुबंई आणि लंडन येथून बी. ए., बी.टी.टी.डी. पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले. भारतात परतण्यापूर्वी हॅरो येथे त्यांनी अध्यापन केले. पुण्यातील कॅम्प एज्यूकेशन सोसायटीच्या शाळेत अत्रे अध्यापक होते. या शाळेचे ते पुढे मुख्याध्यापकही झाले. ‘नवयुग वाचनमाले’द्वारे त्यांनी लिहिलेली शालेय क्रमिक पुस्तकं हे त्यांचं शैक्षणिक क्षेत्रातील मोठं योगदान माणले जाते. त्यांची टोकदार लेखणी, बोचरा विनोद आणि दिलदार वृत्तीला महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही.
प्रल्हाद केशव अत्रे हे महाराष्ट्रातील एक झंझावाती व्यक्तिमत्व होतं. साहित्य, शिक्षण, नाटक, चित्रपट, राजकारण व पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात त्यांना आपला ठसा उमटवला. या सर्वच क्षेत्रामध्ये त्यांचा विलक्षण दबदबा होता. जनमानसावर त्यांचा प्रचंड पगडा होता. ते फर्डे वक्ते होते. आपल्या वक्तृत्वाने ते श्रोत्यांना भारावून टाकत असत. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. काही काळ ते महाराष्ट्र विधानसभेत आमदारही होते. त्यांच्या काळातही विद्वान व साहित्यिकांबरोबर त्यांचे वादही खूप गाजले. आचार्य ही बिरुदावली त्यांना प्राप्त झाली होती. तेव्हाचे राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांनी त्यांचे रायटर अँन्ड फायटर ऑफ महाराष्ट्र
असे यथार्थ वर्णन केले होते.
आचार्य अत्रेंनी १९३३ मध्ये नाट्य व चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. मास्टर विनायक यांनी दिग्दर्शित केलेल्या ब्रम्हचारीब्रॅन्डीची बाटलीया चित्रपटांच्या कथा पटकथा त्यांनी लिहिल्या. पायाची दासी,
धर्मवीर` हे त्यांचे आणखी काही उल्लेखनीय चित्रपट आहेत. साने गुरुजींची ‘श्यामची आई’ या पुस्तकावर त्यांनी १९५३ साली चित्रपट बनविला. १९५४ साली या चित्रपटाला पहिले राष्ट्रपती पदक मिळाले. याशिवाय महात्मा फुले यांच्या जीवनावरील चित्रपटाची निर्मितीही त्यांनी केली. अत्र्यांच्या बहुतांशी चित्रपटांमध्ये विनोद आणि सामाजिक आशय यांचं चपखल मिश्रण आढळून येतं. त्यांनी हिंदी चित्रपटाचीही निर्मिती केली.
१९२३ साली अत्रे यांनी ‘अध्यापन’ मासिक सुरू केले. १९२६ मध्ये ‘रत्नाकर’ आणि १९२९ ला ‘मनोरमा’, पुढे १९३५ मध्ये ‘नवे अध्यापन’ व १९३९ मध्ये ‘इलाखा शिक्षक’ ही मासिके काढली. १९ जानेवारी १९४० साली त्यांनी नवयुग साप्ताहिक सुरू केले. त्यानंतर ते अखेरपर्यंत वृत्तपत्रक्षेत्रातच ते कार्यरत राहिले. याचबरोबरच ‘अत्रे थिएटर्स’ या नाट्यसंस्थेमार्फत रंगभूमीशी त्यांचे व्यावासायिक नाते राहिले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यांनी आपली कर्तुत्व आणि लेखणी यांद्वारे मोठे कार्य केले.
आचार्य अत्रेंनी १९४७ रोजी जयहिंद हे सांजदैनिक आणि १५ नोव्हेंबर १९५६ रोजी मराठा हे दैनिक सुरू केले. त्यांच्या राजकीय कर्तृत्वाचा विकास संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या काळातच झाला. वक्तृत्व व वृत्तपत्र ही त्यांची प्रभावी साधने होती. मृत्युलेख व अग्रलेख ही त्यांची खासियत होती. लोकप्रिय वक्ते म्हणूनही त्यांचा मोठा लौकिक होता. अत्र्यांचे भाषण म्हणजे हशा व टाळ्यांच्या माध्यमातून परखड विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे हुकमी साधन होते. फार काय, तर आचार्य अत्रेंच्या घणाघाती भाषणांमुळेच संयुक्त महाराष्ट्र मिळाला असे मानले जाते.
आचार्य अत्रे यांनी गडकरी आणि फ्रेंच प्रहसनकार मोल्येर यांना गुरु मानले होते. त्यांचा प्रभाव अत्रेंच्या नाटकांवर पडलेला दिसतो. त्या नाटकांत सामाजिक दोषदर्शन व दंभस्फोट आहेत. परंतु उपहास, उपरोध, विडंबन व अतिशयोक्ती या विनोदसाधनांच्या द्वारा त्यांचे सादरीकरण केले आहेत. साष्टांग नमस्कार (१९३३), भ्रमाचा भोपळा (१९३५) आणि लग्नाची बेडी (१९३६) हे त्यांचे काही लोकप्रिय नाटके आहेत. घराबाहेर (१९३४) व उद्याचा संसार (१९३६) ही अत्रेंची विशेष गंभीर व सामाजिक समस्यात्मक नाटके आहेत. त्याकाळी विशेष अनुकरणीय ठरलेल्या इब्सेन या नॉर्वेजियन नाटककाराचा प्रभाव अत्रेंच्या या दोन्ही नाटकावर झालाचे भासते. नाशिक येथे १९४२ मध्ये भरलेल्या सत्ताविसाव्या महाराष्ट्र साहित्य-संमेलनाचे ते अध्यक्ष होते. अडतिसावे नाट्यसंमेलन (बेळगाव, १९५५), दहावे मराठी पत्रकार-संमेलन (१९५०) आणि बडोदे, इंदूर व ग्वाल्हेर येथील प्रादेशिक साहित्यसंमेलने यांची अध्यक्षपदेही त्यांनी विभूषित केली होती. आचार्य अत्रे यांचे १३ जून १९६९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर ,पुणे