आज दि.१३ जून च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…..

पूर्ण काळ राज्याचं मुख्यमंत्रीपद
शिवसेनेकडे राहील : संजय राऊत

शिवसेनेचा मुख्यमंत्री या महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये पूर्ण पाच वर्षे राहील. त्यामध्ये कोणतीही वाटाघाटी नाही, ही कमिटमेंट आहे. आतापर्यंत पूर्वीच्या सरकारमध्ये काही वाटे ठरलेले होते. तसं इथे मुख्यमंत्रीपदाबाबत कोणताही वाटा नाही. पूर्ण काळ राज्याचं मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे राहील. अशाप्रकारची कमिटमेंट सुरूवातीपासून ही झाली आहे आणि मला असं वाटतं की, शरद पवार यांनी देखील परवा जाहीरपणे हेच वक्तव्यं केलंल आहे.” असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज स्पष्ट केलं. नाशिकमध्ये आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.

इंग्लंडच्या राणीने
तलवारीने केक कापला

वाढदिवस वा काही सेलिब्रेशन करताना तलवारीने केक कापल्याचं आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचं आपण ऐकलं असेलच. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तलवारीने केक कापतानाचा हा व्हिडीओ आहे, इंग्लडच्या राणीचा! जी-७ राष्ट्रांची शिखर परिषद सुरू असून, या दरम्यान एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात इंग्लडच्या राणीच्या हस्ते केक कापण्यात आला. केक कापण्यासाठी चाकू असतानाही राणीने तलवारीने केक कापला.

पाकिस्तानचा माजी ऑफस्पिनर
अरशद खान आता दारिद्र्यात

भारतातील बहुतेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटर्सकडे अफाट संपत्ती आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि गरीब, हे ऐकून थोडे विचित्र वाटेल. परंतु आपल्या शेजारील देश पाकिस्तानमधील परिस्थिती अगदी उलट आहे. २००६मध्ये टीम इंडियाविरूद्ध शानदार गोलंदाजीद्वारे आपला वेगळा ठसा पाकिस्तानचा माजी ऑफस्पिनर अरशद खान आता दारिद्र्यात जगत आहे.

स्वॅब स्टिक नाकातच तुटली संरपंचांच्या
घशात जाऊन अडकली

करीमनगरमधील रामदुगु मंडलातील वेंकटरोपल्ली गावाचे सरपंच जुवाजी शेखर हे स्वतःची करोना चाचणी करण्यासाठी गेले होते. यावेळी चाचणी दरम्यान स्वॅब स्टिक नाकातच तुटली आणि ती संरपंचांच्या घशात जाऊन अडकली, यामुळे सरपंचांना असह्य वेदना सुरू झाल्या होत्या. ही घटना शुक्रवारची आहे. गावात रॅपिड अँन्टिजेन टेस्टसाठी सरपंच जुवाजी शेखर यांनी पुढाकार घेतला होता.

चीनमध्ये गॅस पाइपलाइनचा
भीषण स्फोट, १२ जणांचा मृत्यू

चीनमध्ये रविवारी सकाळी गॅस पाइपलाइनचा भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. हा स्फोट इतका भीषण होता की, आसपासच्या परिसरात त्याचे हादरे बसले. या दुर्घटनेत १२ जणांचा जागीत मृत्यू झाला. तर १०० जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. या घटनेनंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळावरील स्थिती नियंत्रणात जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात हलवलं.

मास्क न घातल्याने ब्राझीलच्या
राष्ट्राध्यक्षांना दंड

ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांना करोना प्रतिबंधाचे नियम मोडल्यामुळे १०० डॉलर्सचा दंड भरावा लागला. त्यांनी आपल्या समर्थकांच्या रॅलीत सहभागी झाल्यावर मास्क घातला नव्हता तसंच मोठी गर्दी जमवली होती. साओ पाऊलो भागांमध्ये ही कारवाई करण्यात आली.

किल्ल्यांच्या संवर्धनासाठी
सूचना पाठवा

राज्यातील गड किल्ल्यांचे पावित्र्य टिकवून त्यांचे टप्प्याटप्प्याने संवर्धन करण्यासंदर्भात आता पावले टाकण्यात येत असून राज्यातील दुर्गप्रेमी, दुर्गसंवर्धक आणि गिर्यारोहक यांनी यासंदर्भातील आपल्या सूचना व प्रस्ताव मुख्यमंत्री सचिवालयातील संकल्प कक्षास त्वरित पाठवाव्यात असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. किल्ल्यांच्या संवर्धनातील अडचणी दूर करण्यासाठी पुढे यावे व कामाला सुरुवात करावी असेही त्यांनी सांगितले.

वारीचा निर्णय विचार
करूनच घेतला : भुजबळ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काही निर्बंध घालून वारीसाठी दहा पालख्यांनाच परवानगी दिली आहे. त्याचं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी समर्थन केलं आहे. मंत्रिमंडळात असलेल्यांच्या घरातील आजोबा-पणजोबांपासून सगळे वारी करतात. त्यामुळे वारीचा निर्णय विचार करूनच घेतला आहे, असं सांगतानाच ज्यांना राजकारणच करायचं आहे, त्यांना रोखू शकत नाही, असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं.

वेटलिफ्टर मीराबाई चानू
ऑलिम्पिकसाठी पात्र

जपानची राजधानी टोकियो इथं होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेआधी भारतीय खेळप्रेमींसाठी एक चांगली बातमी आहे. भारताची आघाडीची वेटलिफ्टर मीराबाई चानू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे. आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशनने जाहीर केलेल्या क्रमवारीत मीराबाईला दुसरं स्थान देण्यात आलं आहे.

ब्लॅक फंगसची औषधे आता
पूर्णपणे जीएसटी मुक्त असणार

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी काऊंसिलच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. जीएसटी काऊंसिलच्या बैठकीत ब्लॅक फंगसची औषधं जीएसटी मुक्त करण्याला मंजूरी देण्यात आली आहे. ब्लॅक फंगसची औषधे आता जीएसटी मुक्त असणार आहेत. कोरोनासंबंधित इतर औषधांवरील जीएसटी 12 वरुन 5 टक्के करण्यात आला आहे. 30 सप्टेंबर 2021पर्यंत जीएसटी कपातीचा निर्णय लागू राहणार असल्याचंही सीतारामन यांनी स्पष्ट केलं.

आणखी एका महासागराचा
लागला शोध

आपल्या सर्वांना माहित आहे की पृथ्वीचा (Earth) 75 टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. आपली पृथ्वी सात खंड आणि चार महासागरांसह जीवनाचा आधार आहे. परंतु भौगोलिक विज्ञानाने आता या नकाशामध्ये एकाची भर पडली आहे. नॅशनल जिओग्राफिकच्या मते, महासागर चार नसून जगात पाच महासागर (Fifth Ocean of the World) आहेत. अंटार्क्टिकाजवळील दक्षिण महासागर वेगळा महासागर आहे.

उत्तर प्रदेशात उभारले
करोना मातेचं मंदिर

उत्तर प्रदेशच्या या गावामध्ये ग्रामस्थांनी स्वत:हून पुढाकार वर्गणी काढून स्थापन केली आहे करोना मातेची मूर्ती! या मूर्तीची रोज पूजा-अर्चा केली जाते. करोना मातेला नैवेद्य, फुलांचा साज चढवला जातो. आणि मागणं घातलं जातं तिच्याच नावाने असलेल्या करोनाला पिटाळून लावण्याचं! आता ही त्यांची श्रद्धा आहे, अंधश्रद्धा आहे की त्याचाही कडेलोट आहे, हा मात्र चर्चेचा विषय ठरू शकेल! उत्तर प्रदेशच्या प्रतापगडमधल्या शुक्लपूर गावातला हा प्रकार. गावातल्या एका मोठ्याशा कडुलिंबाच्या झाडाखाली आहे करोना मातेचं मंदिर.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.