टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर चौथ्या टी 20 सामन्यात 82 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. टीम इंडियाने आफ्रिकेला विजयासाठी 170 धावांचे आव्हान दिले होते. मात्र भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर आफ्रिकेचा डाव अवघ्या 87 धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाने 5 सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली आहे. यामुळे आता पाचवा आणि शेवटचा सामना हा निर्णायक होणार आहे.
आफ्रिकेकडून रस्सी वन डेर डुसेनने सर्वाधिक 20 धावा केल्या. विकेटकीपर क्विंटन डी कॉकने 14 रन्सचं योगदान दिलं. तर मार्को जान्सेनने 12 धावा जोडल्या. दोघांना भोपळाही फोडता आला नाही. तर उर्वरित 5 जणांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही.
आवेश खानने टीम इंडियाकडून सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. युजवेंद्र चहलने 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर हर्षल आणि अक्षर पटेल या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेत आवेश आणि चहल या दोघांना चांगली साथ दिली.
त्याआधी आफ्रिकेने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडियाने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 169 धावा केल्या. टीम इंडियाकडून दिनेश कार्तिकने सर्वाधिक 55 रन्स केल्या. तर हार्दिक पंड्याने 46 धावांची खेळी केली. तर इशान किशनने 27 रन्सचं योगदान दिलं.
दरम्यान या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना हा 19 जूनला बंगळुरुत खेळवण्यात येणार आहे. मालिका 2-2 ने बरोबरीत झाल्याने ही सीरिज कोण जिंकणार, याकडे क्रिकेट चाहच्यांचं लक्ष असणार आहे.
ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल आणि अवेश खान.
टेम्बा बावुमा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रस्सी वॅन डेर डूसन, डेविड मिलर, हेनरिक क्लासेन, ड्वेन प्रिटोरियस, केशव महाराज, मार्को जानसेन, लुंगी एनगिडी, तबरेज शम्सी आणि एनरिक नॉर्टजे.