चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता किच्चा सुदीप दक्षिण चित्रपट विश्वातील सुपरहिट स्टार्सपैकी एक आहे. आज (2 सप्टेंबर) किच्चा सुदीप याचा वाढदिवस आहे. त्याचा जन्म 2 सप्टेंबर 1973 रोजी कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यात झाला. सुदीप प्रामुख्याने कन्नड चित्रपटांमध्ये काम करतो. बॉलिवूड चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर तो सलमान खानच्या ‘दबंग 3’ या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी अभिनेत्याच्या जीवनाशी संबंधित अनेक मनोरंजक गोष्टी सांगणार आहोत.
सुदीप एका व्यावसायिक कुटुंबातून पुढे आला आहे. किच्चा सुदीप वडिलांचा हॉटेलचा व्यवसाय आहे. सुदीपने दयानंद सागर अभियांत्रिकी महाविद्यालयातून यांत्रिक अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. तो उत्कृष्ट क्रिकेटही खेळतो. कदाचित तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, तो विद्यापीठ स्तरावरील क्रिकेटपटू देखील राहिला आहे.
चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी सुदीप टीव्हीच्या जगात प्रसिद्ध होता. ‘प्रेमदा कादंबरी’ या मालिकेतून त्याला बरीच लोकप्रियता मिळाली. यानंतर त्याने आपला मोर्चा मोठ्या पडद्याकडे वळवला. मुख्य अभिनेता म्हणून सुदीपचा पहिला चित्रपट ‘थाईवा’ होता. हा चित्रपट 1997 मध्ये रिलीज झाला होता. यानंतर त्यानी ‘प्रथमर्थ’ या चित्रपटामध्ये सहाय्यक भूमिका केली होती.
2001 मध्ये सुदीप याने सुपर हिट चित्रपट ‘हुचा’ मध्ये काम केले. या चित्रपटाने त्याला सर्वाधिक लोकप्रियता मिळवून दिली. सुदीपला सलग तीन वर्षे ‘हुचा’, ‘नंदी’ आणि ‘स्वाती मुथ्यम’ या चित्रपटांसाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. सुदीपचे लग्न प्रिया राधाकृष्ण हिच्या बरोबर झाले आहे आणि त्यांना एक मुलगी देखील आहे, जिचे नाव सानवी आहे.
2008 मध्ये सुदीपने ‘फुंक’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याने राम गोपाल वर्मा यांच्या ‘रण’, ‘फुंक 2’ आणि ‘रक्तचरित्र’ या चित्रपटांमध्येही काम केले आहे. सुदीप ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोचे कन्नड व्हर्जन होस्ट करतो. सुदीपला कन्नड चित्रपटातील सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक मानले जाते.