भारतीय जनता पार्टी 26 नोव्हेंबर म्हणजेच संविधान दिनापासून ते 6 डिसेंबर या कालावधीत देशभर “संविधान गौरव अभियान” राबवणार आहे. या अभियानात सर्व राज्यांच्या जिल्हा मुख्यालयात दौरे केले जाणार आहेत आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालसिंग आर्य यांनी ही घोषणा केली आहे. पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाने ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे, असं म्हटलं जातय.
आर्य म्हणाले की, “भाजप अनुसूचित जाती मोर्च्यामार्फत 26 नोव्हेंबर-संविधान दिनापासून ते 6 डिसेंबर म्हणजे बाबासाहेब आंबेडकर परिनिर्वाण दिवसापर्यंत देशभरात संविधान गौरव अभियान राबवला जाणार आहे.” उत्तराखंडमध्ये हे कार्यक्रम विधानसभा स्तरावर, तर उत्तर प्रदेशमध्ये तो जिल्हा स्तरावर होणार आहे.
पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाने ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं जातय. मात्र, भाजप निवडणुका डोळ्यासमोर ठेवून असे कार्यक्रम करत नाही, असं आर्य म्हणाले. महापुरुषांचे आणि त्यांच्या योगदानाचे स्मरण व्हावे आणि देश व संविधानाप्रती असलेल्या कर्तव्याबाबत जनजागृती व्हावी, हा या कार्यक्रमामागचा उद्देश आहे, ते म्हणाले.
या अभियानादरम्यान जिल्हा मुख्यालयावर संविधान गौरव यात्रा काढण्यात येणार आहेत आणि प्रत्येक यात्रेच्या शेवटी परिसंवादाचे आयोजन केले जाईल. अनुसूचित जातीतील गुणवंतांचाही गौरव करण्यात येणार असून संविधानाची शपथही देण्यात येणार आहे. प्रमुख पाहुण्यांच्या वतीने सोशल मीडियावर मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती लालसिंग आर्य यांनी दिली. आर्य यांनी सांगितले की, या मोहिमेची सुरुवात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा मणिपूरमधून करतील. यावेळी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सीटी रवी इतर नेत्यांसह दिल्लीत उपस्थित राहणार आहेत. या अभियानांतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते, खासदार, आमदार आणि इतर लोकप्रतिनिधी आणि पक्षाचे पदाधिकारीही सहभागी होणार आहेत.