जळगाव शहरात खुनाच्या घटनांचं सत्र सुरूच आहे. आता पुन्हा एकदा दिवाळीच्या काळातच मंगळवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास तांबापुरात एका कुटुंबावर हल्ला झाला. त्यात एका तरुण मुलाचा मृत्यू झाला तर इतर 4 जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस याठिकाणी दाखल झाले, घटनेचा तपास सुरू झाला आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
प्रदीप सिंग यांचे कुटुंब डी मार्ट समोरील तांबापुरा भागात राहतात. मंगळवारी घराजवळ असताना अचानक अज्ञात लोकांनी येऊन पूर्ववैमानस्यातून त्यांच्यावर चाकू आणि इतर शस्त्रांनी हल्ला केला. यात संजय प्रदीप सिंग याच्या छातीमध्ये डाव्या बाजूने चाकू खुपसला गेल्याने तो ठार झाला. तर त्याचा भाऊ करण सिंग, वडील प्रदीप सिंग आयात सिंग, नातेवाईक बग्गा सिंग , बलवंत सिंग हेदेखील जखमी झाले आहेत.
यात करण सिंग आणि बग्गा सिंग यांना चाकू लागला असून प्रदीप सिंग आणि बलवंत सिंग यांच्या डोक्यावर मार लागला आहे. पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलं. याठिकाणी तपासणी झाल्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संजय प्रदीप सिंग याला मयत घोषित केलं. तर इतर चौघांवर उपचार सुरू आहेत.