श्रीलंकेत सापडला हवेतून
संसर्ग होणारा नवा स्ट्रेन
आपल्या शेजारचा देश श्रीलंकेत सर्वात घातक असलेला नवा स्ट्रेन आढळला आहे. या स्ट्रेनची हवेतून उत्पत्ती झाली असून त्याचा संसर्ग हवेतूनच होत आहे. म्हणजेच तुम्ही एखाद्या कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेले नसले तरी हवेतून तुम्हाला संसर्ग होऊ शकतो. श्रीलंकेमधील जयवर्देनापुरा विद्यापीठातील इम्युनॉलॉजी अँड मॉलिक्युलर सायन्स विभागाच्या प्रमुख निलिका मालाविगे म्हणाल्या, हा स्ट्रेन खूपच सोप्या पद्धतीने आणि वेगाने पसरतो. तो हवेमध्ये एक तासापर्यंत टिकू शकतो. श्रीलंकेत आढळलेल्या आतापर्यंतच्या सर्व कोरोना विषाणूच्या प्रकारांमध्ये हा स्ट्रेन अधिक घातक आणि वेगाने फैलावणार आहे.
ऑक्सीजन कमतरते बाबत
सरकारला इशारा दिला होता
देशभरात कोरोनाचा हाहाकार सुरू असतानाच अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता तसेच बेड उपलब्ध नसल्याने रुग्णांचे मृत्यू होत आहेत. देशात अशी बिकट परिस्थिती ओढवण्यापूर्वी या कमतरतेबद्दल केंद्र सरकारला गेल्या वर्षीच या संकटाबद्दल इशारा देण्यात आला होता. मात्र, तो गांभिर्याने न घेतल्यानेच आताचे संकट ओढावून घेतल्याचे स्पष्ट होत आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या काही महिन्यांपूर्वीच संसदेच्या स्थायी समितीने सरकारला सुचवले की, रुग्णालयांमध्ये बेड आणि ऑक्सिजन प्रमाण वाढवले पाहिजे.
कोवॅक्सिन कोरोना
लसीची किंमत निश्चित
सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्डनंतर भारत बायोटेकनेही त्यांच्या कोवॅक्सिन या कोरोना लसीची किंमत निश्चित केली आहे. खासगी रूग्णालयात कोवॅक्सिन लस १,२०० रुपये आणि राज्य शासनासाठी तीच लस ६०० रुपयात दिली जाणार आहे, तसे कंपनीने सांगितले आहे. त्याचबरोबर लसची किंमत केंद्र सरकारसाठी १५० रुपये निश्चित केली आहे. याव्यतिरिक्त, निर्यात शुल्कची किंमत १५ ते २० डॉलर आहे. सीरम इन्स्टिट्यूटने कोविशिल्ड लसीची किंमत जाहीर केली. कंपनीने या लसीची किंमत राज्य सरकारसाठी प्रतिडोस ४०० रुपये आणि खासगी रुग्णालयासाठी प्रतिडोस ६०० रुपये निश्चित केली आहे.
राज्यात मोफत लसीकरण
करणार : मुख्यमंत्री
इतर उपाययोजनांबरोबरच राज्य सरकारने लसीकरण कार्यक्रमांवरही लक्ष्य केंद्रीत केलं असून, १ मेपासून लसीकरण केंद्रांवर लसीचा तुटवडा भेडसावणार नाही, यासाठी अधिकाधिक लशींचे डोस उपलब्ध होण्यासाठी जागतिक निविदा काढण्याचा निर्णय राज्याने शनिवारी घेतला. मात्र, १८ ते ४५ या वयोगटातील व्यक्तींना मोफत लस मिळणार का? असा प्रश्न विचारला जात होता. अखेर राज्य सरकारने या वयोगटातील नागरिकांचं मोफत लसीकरण करणार असल्याची घोषणा केली.
२५ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन
आयात करण्याचा प्रस्ताव
महाराष्ट्रात आजघडीला जवळपास ७० हजार अँक्टिव्ह करोना रुग्ण असून ही संख्या एप्रिल अखेरीस ९९ हजारापर्यंत वाढू शकते असा इशारा केंद्र सरकारने दिला आहे.या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने २५ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन आयात करण्याबरोबर १३२ ऑक्सिजन प्लांट उभारणे ( पीएसए) तसेच ऑक्सिजन कॉन्सट्रेटर व ऑक्सिजन टँकर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय १० लाख रेमडेसिविर इंजेक्शनची खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे ७४३ कोटी ७२ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत
माजी आमदार संजय देवतळे यांचे
करोनावरील उपचारादरम्यान निधन
राज्याचे माजी पर्यावरण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, वरोरा-भद्रावती विधानसभेचे माजी आमदार संजय देवतळे यांचे आज नागपुरात करोनावरील उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ यांच्यासह मोठा परिवार आहे. मृदू स्वभावाचे राजकारणी अशी संजय देवतळे यांची ओळख होती. देवतळे यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून सक्रिय राजकारणाला सुरुवात केली होती.
दिल्लीतील लॉकडाऊन
आठवड्याभरासाठी वाढविला
दिवसाकाठी तब्बल २५ हजाराहून अधिक नवे कोरोना बाधित होत असल्याने अखेर दिल्लीतील लॉकडाऊन आणखी आठवड्याभरासाठी वाढविण्यात आला आहे. तशी घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. दिल्लीत यापूर्वीच लॉकडाऊन लागू आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी आज विशेष बैठक घेण्यात आली. त्यात लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या सोमवारपर्यंत (३ मे ) हा लॉकडाऊन असणार आहे. दिल्लीत २६ एप्रिल पर्यंत सहा दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्यात आला होता. वाढते बाधित पाहता आरोग्य सुविधा तोकड्या पडत आहेत. म्हणून हा निर्णय घेतल्याचे केजरीवाल यांनी म्हटले होते.
देशाला जबाबदार नागरिकांची
आवश्यकता : राहुल गांधी
सिस्टम’ फेल आहे, म्हणून आता ‘जन की बात’ करणं महत्वाचं आहे. या संकटात देशाला जबाबदार नागरिकांची आवश्यकता आहे. माझी सर्व काँग्रस सहकाऱ्यांना विनंती आहे की, सर्व राजकीय कामं सोडून केवळ लोकांना सर्व मदत करा, सर्व प्रकारे देशवासियांचं दुःख दूर करा. काँग्रेस परिवाराचा हाच धर्म आहे.” असं राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे.
हवेतून ऑक्सिजन तयार
करणारे १४ प्लांट कार्यान्वित करणार
ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन हवेतून ऑक्सिजन तयार करणारे १४ प्लांट मुंबई महानगर क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बसविण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मीरा भाईंदर, विरार, नवी मुंबई आणि पनवेल या महापालिकांमध्ये पुढील काही दिवसांमध्ये हे प्लांट कार्यान्वित होतील, असे मंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजनची गरज भासू लागली आहे. त्यावर मात करतानाच भविष्यात अशा प्रकारचा तुटवडा जाणवू नये यासाठी हवेतून ऑक्सिजन शोषून रुग्णांना पुरविणाऱ्या प्लांटची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.
शरद पवार यांच्यावर
आणखी एक शस्त्रक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांना पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गेल्यावेळी त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना पुन्हा तपासणीसाठी बोलवले होते. आज ते त्यासाठी गेले असता डॉक्टरांच्या निदर्शनास आले की त्यांच्या तोंडातील अल्सर वाढीस लागला आहे. त्यामुळे तातडीने पवार यांच्या तोंडातील अल्सर काढण्यात आला आहे. तशी माहिती राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. सध्या पवार यांची प्रकृती ठीक असून ते हॉस्पिटलमध्येच आहेत. कोरोना संकटाबाबतचे अपडेट ते नियमित घेत आहेत. लवकरच ते त्यांचे दैनंदिन काम सुरू करतील, असे मलिक यांनी सांगितले आहे.
विमानातून रेमडेसिविर
इंजेक्शनच आणले आहेत का
नगरचे भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी खासगी विमानातून थेट १० हजार रेमडेसिविर इंजेक्शन आणले आहेत. त्याचा व्हिडिओ त्यांनी प्रसारित केला आहे. मात्र, डॉ. विखे यांनी नक्की रेमडेसिविर इंजेक्शनच आणले आहेत का, असा प्रश्नच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी विचारला आहे. विखे यांनी आणलेली औषधे संशयास्पद असल्याचे चाकणकर यांनी म्हटले आहे. जर, डॉ. विखे यांनी रेमडेसिविर आणले आहेत तर नगरमध्ये सर्वसामान्यांना वणवण का भटकावे लागत आहे, असा सवालही चाकणकर यांनी विचारला आहे. डॉ. विखे यांनी हे इंजेक्शन नक्की कुठे वाट याचा तपशील जाहिर करावा किंवा हे इंजेक्शन मिळणार आहे, ते सांगावे, असे आव्हानही चाकणकर यांनी दिले आहे.
गीतकार हरेंद्र जाधव यांचं निधन
हरेंद्र जाधव यांना काही वर्षांपूर्वी पक्षाघाताचा झटका आला होता. त्यामुळे ते अंथरुणावरच होते. माझ्या नवऱ्याने सोडलीया दारू… पाहा पाहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा… आता तरी देवा मला पावशील का?… आदी एकापेक्षा एक सरस गाणी लिहून मराठी मनावर अधिराज्य गाजविणारे प्रसिद्ध गीतकार हरेंद्र जाधव यांचं आज निधन झालं. वयाच्या 87व्या वर्षी त्यांनी अखेरचा निरोप घेतला.
SD social media
9850 60 3590