मराठी चित्रपटसृष्टी, हिंदी चित्रपटसृष्टी, अल्बम, स्टेज शोज गाजविणारी हरहुन्नरी पार्श्वगायिका म्हणजे वैशाली सामंत. गेली दोन दशके वैशालीने आपल्या आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. वयाच्या आठव्या वर्षापासून तिने गायनाचं शिक्षण सुरू केलं. लहानपणी तिने जयंत दातार गुरुजी, पुढे ज्योत्स्ना मोहिले आणि पं. मनोहर चिमोटे यांच्याकडे गाण्याचे धडे गिरविले. संगीतकार नंदू होनप यांच्यामुळे वैशाली सामंतने पहिल्यांदा चित्रपटासाठी पार्श्वगायन केले. वैशाली सामंत’ ही गायिकेची ओळख मिळण्यापूर्वी सात वर्षे सांगीतिक क्षेत्रात धडपड करत होते. ‘सागरिका म्युझिक’च्या ‘ऐका दाजिबा’ या अल्बममधून तिला मोठी प्रसिद्धी मिळाली. वैशालीने आतापर्यंत मराठी, हिंदी, बंगाली, गुजराती, भोजपुरी, आसामी, तमीळ, तेलुगु आदी भाषांमध्ये गाणी गायली आहेत. मराठीमध्ये तिची दोन हजारांहून अधिक गाणी आहेत. ‘ऐका दाजिबा’, ‘दूरच्या रानात’, ‘नाद खुळा’, ‘कोंबडी पळाली’ ही तिची अत्यंत गाजलेली गाणी. पार्श्वगायनाखेरीज वैशालीनं ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘गलगले निघाले’, ‘मस्त चाललंय आमचं’ या चित्रपटांनाही संगीत दिलं आहे. ए. आर. रेहमान, डब्बू मलिक, विजू शाह या हिंदीतील प्रसिद्ध संगीतकारांकडेही ती गायली आहे. वैशाली सामंतने तीन पार्टनरसह ‘पिझ्झा बॉक्स’ हा नवा व्यवसाय सुरू केला आहे.
संजीव वेलणकर, पुणे