पुढील ५ दिवस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत
विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
उत्तर भारतात तापमानाचा पारा वाढत असताना आता दक्षिण भारतात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं आगमन होत आहे. अंदमाननंतर आता नैऋत्य मोसमी वारे बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचले आहेत. येत्या काही दिवसांत केरळ आणि त्यानंतर महाराष्ट्रातही मान्सून धडकणार आहे. दरम्यान, पुढील ५ दिवस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, विदर्भातील काही भागात उन्हाचा तडाखा कायम राहणार असून तापमानाचा पारा चढाच राहणार आहे.
पुण्यात स्मृती इराणी यांच्या
कार्यक्रमात मोठा गोंधळ
पुण्यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ पाहिला मिळाला. पुण्याच्या बालगंधर्व मंदिरात स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम सुरु असताना राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी घुसून घोषणाबाजी केली. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या वैशाली नागवडे यांना मारहाण करण्यात आली. महागाईविरोधात आंदोलन करणाऱ्या वैशाली नागवडे आणि राष्ट्रवादीच्या इतर महिला कार्यकर्त्याां बालगंधर्व मंदिर घुसून घोषणाबाजी करत होत्या.
त्र्यंबकेश्वरमधील सुप्रसिद्ध गुरुपीठात
50 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप
तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वरमधील सुप्रसिद्ध स्वामी समर्थ गुरुपीठात 50 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. गुरुपीठ संचालकांविरुद्ध निधीच्या अपहाराची तक्रार त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या सर्व प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. निविदा न काढता कामांवर खर्च केल्याचा ठपका संचालकांवर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे याप्रकरणी गुरुपीठाच्या व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी तक्रारदारांकडून करण्यात आली आहे. धर्मादाय आयुक्तांचा अहवाल येणार आहे. हा अहवाल आल्यानंर पुढील योग्य की कारवाई करण्यात येईल, असं पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलंय.
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेमध्ये
शिवलिंग सापडल्याचा दावा
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिराशेजारी असलेल्या ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. यावरून AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मोठं व्यक्तव्य केलंय. वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीचा सर्वे पूर्ण झाला. हा सर्वे सलग तीन दिवस सुरु होता. यातून काही महत्त्वाचं निरीक्षण समोर आलं. सर्वे करणाऱ्या टीमने सोमवारी नंदीसमोरील विहिरीचं सर्वेक्षण केलं. या सर्व्हेत विहिरीमध्ये शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षाचे वकील सुभाष नंदन चतुर्वेदी यांनी केला.
केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलिस
कोठडी ठोठावण्यात आली
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणं अभिनेत्री केतकी चितळेला चांगलंच महागात पडलं आहे. केतकीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. त्यानंतर आज ठाणे पोलीस केतकी चितळे हिला घेऊन तिच्या कळंबोली इथल्या घरी पोहचले आहेत. केतकीच्या घरातून लॅपटॉप आणि इतर कागदपत्र घेण्यासाठी पोलीस तिच्या घरी दाखल झाले आहेत. लॅपटॉपमध्ये आणखी काही आक्षेपार्ह माहिती मिळतेय का याची तपासणी पोलीस करतील. त्यानंतर तीला पुन्हा ठाणे पोलीस स्टेशनला आणलं जाईल. केतकी अटक करताना पोलिसांनी तिचा मोबाईल जप्त केला होता.
जालन्यातील प्रवेशद्वाराला नाव
देण्याच्या वादातून दोन गटात राडा
जालन्यातील चांदई एक्को गावातील प्रवेशद्वाराला नाव देण्याच्या वादातून जालन्यातील चांदई एक्को गावात १२ मे रोजी दोन गटात राडा झाला. या प्रकरणी पोलिसांनी तब्बल ३०२ गावकऱ्यांवर गुन्हे दाखल केले आणि काही जणांना अटक करण्यात आली. गावातील या राड्याची माहिती मिळताच केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खान राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सोमवारी (१६ मे) चांदई एक्को गावात जाऊन दोन्हीही गटांशी चर्चा करून हा वाद मिटवलाय. यापुढे चांदई एक्को गावात पूर्वीप्रमाणेच शांतता राहणार असून गावात पोलिसांकडून लावण्यात आलेली संचारबंदी हटवण्यात यावी, अशी विनंती पोलीस प्रशासनाला करणार असल्याची माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली.
फलंदाज अजिंक्य राहणे दुखापतीमुळे
बायोबबल सोडून आयपीएलमधून बाहेर
प्लेऑफपर्यंत पोहोचण्यासाठी संघांची चुरस लागलेली असताना कोलकाता नाईट रायडर्सची चिंता वाढली आहे. या संघातील दिग्गज फलंदाज अजिंक्य राहणे दुखापतीमुळे बायोबबल सोडून आयपीएलमधून बाहेर पडला आहे. उर्वरित सामन्यात तो खेळणार नसून मिळालेल्या माहितीनुसार त्याच्यावर बंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये उपचार करण्यात येणार आहेत.
SD social media
9850 60 3590