येथे आदिवासींच्या सामुदायिक लग्नसोहळ्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आदिवासी जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळ्याचा कार्यक्रम सुरू असताना अचानक जोरदार वारा आला. तो वारा लग्नमंडपाच्या दिशेने आला. तो इतका वेगवान होता की, दहा सेकंदातच संपूर्ण लग्नमंडप उद्ध्वस्त झाला. या घटनेनंतर लग्नमंडपातील सर्व वधू, वर आणि उपस्थित वऱ्हाडी लहान मुलांची एकच तारांबळ उडाली. डहाणू तालुक्याच्या ऐना येथील शिवसेना आणि केसरी फाउंडेशन यांच्या वतीने हा सामुदायिक विवाह सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
आदिवासींचा सामुदायिक विवाहसोहळा
रविवारी शिवसेना तसेच केसरी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी जिल्हा परिषद सदस्य सुशील चुरी यांच्यावतीने आदिवासींचा सामुदायिक विवाहसोहळा आयोजित करण्यात आला होता. डहाणूच्या वानगावजवळील ऐना या आदिवासी लोकवस्ती असलेल्या गावात हा आदिवासी समाजातील 125 जोडप्यांचा विवाहसोहळा आयोजित केला होता.
इतक्या मोठा प्रमाणात विवाहसोहळ्याचे आयोजन असल्यामुळे या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी मोठा मंडप तयार करण्यात आला होता. याठिकाणी वधू-वर, वऱ्हाडी, नातेवाईक, पाहुणे, ग्रामस्थ या सर्वांना बसण्यासाठी मोठी आणि सुसज्ज अशी व्यवस्था करण्यात आली होती. मोठ्या प्रमाणात विवाहसोहळ्याचे आयोजन करण्यात आल्यामुळे याठिकाणी मोठी गर्दी होती.
दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी लग्नाचा मुहूर्त होता. यावेळी सर्वच वधू-वर मंडळी, त्यांचे नातेवाईक आणि इतर जण मंडपात बसले होते. मात्र, 11 वाजण्याच्या सुमारास जोराचा वारा सुटला. यानंतर सर्वत्र धूळ उडाली. हा वारा इतका वेगवान होता की, तो मंडपात शिरल्यानंतर काही सेकंदातच मंडप कोसळला. यानंतर सर्वांची एकच धावपळ झाली. या घटनेत वधू वरांसह चार जण जखमी झाले. त्यांच्यावर ऐना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.
या सर्व प्रकारानंतर अखेर भोजनमंडपात वधू-वरांना बसवण्यात आले. त्याठिकाणी हा सामुदायिक विवाहसोहळा पार पडला. या सोहळ्याला आमदार श्रीनिवास वनगा यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. अशा प्रकारे शेकडो आदिवासी जोडप्यांचा हा सामुदायिक विवाहसोहळा पार पडला.