आज दि.२४ डिसेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

करोनाने चिंता वाढवली, मंत्री धनंजय मुंडेंची चाचणी पॉझिटिव्ह, देशभरात एका दिवसात ७५२ रुग्णांची नोंद

करोना विषाणूचा नवीन उपपक्रार असलेल्या ‘जेएन.१’ने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढवलेली असताना देशात करोनाबाधित रुग्णांची संख्यादेखील झपाट्याने वाढू लागली आहे. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी ‘जेएन.१’ने बाधित रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. केरळ, महाराष्ट्र, गोव्यासह अनेक राज्यांमध्ये जेएन.१ बाधित रुग्णांवर उपचार चालू आहेत. दरम्यान, देशात करोनाबाधित रुग्णांची संख्यादेखील वाढली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे की, या एका महिन्यात जगभरात ५२ टक्के करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे.दरम्यान, राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना देखील करोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. स्वतः मुंडे यांनी फेसबूक आणि एक्सवर याबाबतची माहिती दिली आहे. धनंजय मुंडे यांनी फेसबूकवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, नागपूर अधिवेशन संपल्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने मी कोव्हिड-१९ तपासणी केली असता पुन्हा एकदा कोव्हिड पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आहे. मला सध्या फारसा त्रास नाही, परंतु, डॉक्टरांच्या सल्ल्याने मी मागील चार दिवसांपासून क्वारन्टाईन (विलगीकरण कक्षात) राहून योग्य उपचार घेत आहे. काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही. मी लवकरच बरा होऊन आपल्या सर्वांच्या सेवेत पुन्हा दाखल होईन.

तुळजाभवानी देवीचे मंदिर राहणार २२ तास खुले, पुढील सात दिवस सशुल्क व्हीआयपी दर्शन बंद

नवीन वर्ष आणि ख्रिसमस नाताळच्या सलग सुट्ट्यांमुळे तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची संख्या वाढली आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता, तुळजाभवानी देवीचे मंदिर २२ तास दर्शनासाठी खुले ठेवण्याचा निर्णय मंदिर संस्थानने घेतला आहे. सोमवार, २५ डिसेंबर ते रविवार, ३१ डिसेंबरपर्यंत तुळजाभवानी देवीचे दरवाजे भाविकांसाठी २२ तास खुले राहणार आहेत. दरम्यान या कालावधीत व्हीआयपी देणगी दर्शन पास तात्पुरत्या कारणास्तव बंद करण्यात आले असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

मनोज जरांगेंचं २० जानेवारीपासून मुंबईत बेमुदत उपोषण

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी सरकारला दिलेला अल्टिमेटम आज संपणार आहे. परंतु, सरकारकडून अद्याप काहीच हालचाली दिसत नाहीत. याप्रकरणी चर्चा करण्याकरता फेब्रुवारीत विशेष अधिवेशन भरवलं जाईल, असं हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. असं असतानाच बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत २० जानेवारीला आमरण उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं. २० जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर ते बेमुदत उपोषण करणार आहेत. यावरून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

साक्षी मलिक निवृत्ती मागे घेणार?

क्रीडा मंत्रालयाने कुस्ती महासंघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय सिंह यांना निलंबित केलं आहे. तसेच त्यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारिणी बरखास्त केली आहे. या निर्णयाचं कुस्तीपटूंकडून स्वागत होत आहे. संजय सिंह यांची अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे नाराज झालेल्या कुस्तीपटूंनी या निर्णयावर समाधान व्यक्त केलं आहे. संजय सिंह अध्यक्ष झाल्यामुळे भारताची ऑलिम्पिक पदकविजेती कुस्तीपटू साक्षी मलिक हिने कुस्तीला कायमचा रामराम केला होता. तिने देखील केंद्र सरकारच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.

भारताचा झेंडा असलेल्या एमव्ही साईबाबा जहाजावर ड्रोन हल्ला, लाल सागरात हुतींचा हैदोस

लाल समुद्रात भारताचा झेंडा असलेल्या एका जहाजावर ड्रोन हल्ला झाल्याचं प्रकरण काही तासांपूर्वी समोर आलं होतं. या हल्ल्याप्रकरणी अमेरिकेने मोठा दावा केला आहे. अमेरिकन लष्कराने म्हटलं आहे की, येमेनमधील हुती बंडखोरांनी या जहाजाला लक्ष्य केलं होतं. गॅबनच्या मालकीच्या या एमव्ही साईबाबा जहाजावर कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु, जहाजाने या भागात गस्तीवर असलेल्या अमेरिकेच्या युद्धनौकेला आपत्कालीन संंदेश पाठवला होता. यूएस सेंट्रल कमांडने याबाबतची माहिती एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केली आहे. या जहाजावर २५ भारतीय कामगार होते जे सुरक्षित असल्याचं भारतीय नौदलाने सांगितलं आहे.

इस्रायलचे हल्ले चालूच, गाझातील हवाई हल्ल्यात एकाच कुटुंबातील ७६ सदस्यांचा बळी

इस्रायल आणि हमासमधील युद्ध अद्याप चालू आहे. गाझामध्ये लपलेल्या हमासच्या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी इस्रायलने जंगजंग पछाडलं आहे. शुक्रवारी (२२ डिसेंबर) रात्री इस्रायलच्या वायूदलाने गाझामधल्या दोन घरांवर हवाई हल्ला केला. यामध्ये एकाच कुटुंबातील ७६ सदस्यांसह एकूण ९० पॅलेस्टिनी नागरिक मारले गेले. मदत आणि बचाव पथकांनी शनिवारी याबाबतची माहिती दिली आहे. या हल्ल्याच्या एक दिवस आधीच संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुखांनी सांगितलं होतं की गाझामधील कोणतीही जागा सुरक्षित नाही. इस्रायलच्या सततच्या हल्ल्यांमुळे तिथे मानवतावादी मदत पोहोचवण्यात अडथळे येत आहेत.

गुजरात बंदरावरील व्यापारी जहाजावर इराणकडून हवाई हल्ला, अमेरिकेचा थेट आरोप

अरबी समुद्रात गुजरातच्या किनारपट्टीजवळ एका व्यापारी जहाजावर शनिवारी ड्रोन हल्ला झाला. या हल्ल्यामुळे स्फोट होऊन जहाजाच्या काही भागाला आग लागली. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आगीमुळे जहाजाचे मोठे नुकसान झाले. या जहाजावर २० भारतीय कर्मचारी असल्याने भारतीय नौदलाने त्यांच्या सुरक्षेसाठी आपले जहाज पाठविले आहे.तर, हा ड्रोन हल्ला इराणने केला असल्याचा दावा अमेरिकेच्या संरक्षण दलाने केला आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

आरोग्याबाबत व्याख्यान देतानाच हृदयविकाराचा झटका; IIT कानपूरचे प्रा. समीर खांडेकर यांचे निधन

आयआयटी कानपूरचे वरिष्ठ प्राध्यापक ५३ वर्षीय समीर खांडेकर माजी विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात आरोग्याच्या विषयावर व्याख्यान देत असतानाच हृदयविकाराचा झटका येऊन खाली कोसळले. त्यांना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे शुक्रवारी डॉक्टरांनी सांगितले. आयआयटी कानपूरच्या मॅकेनिकल इंजिनीयरिंग विभागाचे प्रमुख या पदांवर प्राध्यापक खांडेकर कार्यरत होते. सदर व्याख्यानासाठी माजी विद्यार्थी जमले होते. या घटनेच्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, खाली कोसळण्याआधी प्रा. खांडेकर यांनी “तुम्ही सर्वांनी आरोग्याची काळजी घ्या”, असे वाक्य उच्चारले होते.

आयपीएलमुळे सुरक्षा रक्षकाचा मुलगा झाला करोडपती

दरवर्षी आयपीएल लिलावात अनेक तरुण आणि प्रतिभावान क्रिकेटपटू करोडपती होतात. यातील अनेक खेळाडू देशासाठी अनेक सामने जिंकणाऱ्या खेळी खेळतात आणि भारतीय चाहत्यांना आनंदाचे अनेक क्षण देतात. जसप्रीत बुमराहपासून हार्दिक पंड्या आणि शुबमन गिलपर्यंत असे अनेक खेळाडू आहेत जे आयपीएलमध्ये करोडपती झाल्यानंतर देशासाठी चांगली कामगिरी करत आहेत. सध्या हे खेळाडू टीम इंडियाचा अविभाज्य भाग बनले आहेत.रॉबिन मिन्झचे वडील रांची विमानतळावर सुरक्षा रक्षक आहेत आणि लिलावापूर्वी धोनीने त्याला वचन दिले होते की जर कोणत्याही संघाने त्याच्यावर सट्टा लावला नाही तर चेन्नई सुपर किंग संघ त्याला खरेदी करेल. तथापि, अनेक संघांनी रॉबिनला विकत घेण्यासाठी स्पर्धा केली. चेन्नईशिवाय हैदराबादनेही त्याच्यावर बोली लावली. अखेर गुजरातने त्यांचा संघात समावेश केला

SD Social Media

9850603590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.