भारताच्या निखत जरीनने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचला आहे. गुरुवारी झालेल्या अंतिम सामन्यात निखत जरीनने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. 52 किलोच्या गटात निखत झरीनने थायलंडच्या जुतामास जितपाँगचा 5-0 असा पराभव करून विजय मिळवला. जागतिक बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक मिळवणारी पाचवी भारतीय महिला ठरलीये.
संपूर्ण लढतीत निखत झरीनचा दबदबा दिसून आला. शेवटच्या चार फेऱ्यांमध्ये सर्व परीक्षकांनी तिच्या बाजूने निकाल देऊन पहिला उपांत्य सामना 5-0 ने जिंकून निखत जरीनने स्पर्धेवर वर्चस्व राखलं. यानंतर अंतिम फेरीतही तेच वर्चस्व पाहायला मिळालं.
निखत झरीनने गेल्या काही दिवसांत सातत्याने चांगली कामगिरी केलीये. निखतने 2019 आशियाई चॅम्पियनशिपमध्येही कांस्यपदक जिंकलं होतं. तर याच स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात तिने ब्राझीलच्या कॅरोलिन डी आल्मेडा हिचा 5-0 असा पराभव केला होता.
25 वर्षीय निखत झरीन ही जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पाचवी भारतीय महिला बॉक्सर आहे. यापूर्वी मेरी कोमने या चॅम्पियनशिपमध्ये 6 वेळा सुवर्णपदक जिंकून विक्रम केलाय.
भारताकडून एमसी मेरी कोम, सरिता देवी, जेनी आरएल आणि लेखा सी. यांनी जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदकं जिंकली आहेत. आता या यादीत युवा बॉक्सर निखत झरीनचेही नाव जोडलं गेलंय.