उत्तर प्रदेशमधील कानपूर जवळ झालेल्या भीषण रस्ता अपघातात 17 जणांचा मृत्यू झाला आहे. खासगी शताब्दी बस आणि प्रवासी लोडर यांच्यात जोरदार टक्कर झाली. या अपघातात 17 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी आहेत. 25 हून अधिक जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. कानपूरचे आयजी मोहीत अग्रवाल यांच्यासह सर्व उच्च अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मदत आणि बचावकार्य सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री योगी यांनी या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.
पीएम नरेंद्र मोदी म्हणाले, कानपूरमधील रस्ता अपघात अतिशय दु:खादायक आहे. या अपघातात अनेक लोकांचे प्राण गमावले आहेत. मी त्यांच्या कुटुंबीयांबद्दल शोक व्यक्त करतो आणि जखमींच्या आरोग्यात लवकरच सुधारणा व्हावी, असे ट्विट केले आहे.
कानपूरमधील या दुःखद घटनेत प्राण गमावलेल्यांच्या कुटूंबासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत रक्कम जाहीर केली आहे. त्याचबरोबर जखमींना 50,000 रुपयांची मदत दिली जाईल, असे घोषित केले आहे. ही रक्कम पीएमएनआरएफकडून दिली जाईल. पंतप्रधान कार्यालयाने ही माहिती दिली.
मुख्यमंत्री योगी यांचीही आर्थिक मदतीची घोषणा
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कानपूरमधील भीषण रस्ता अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. हा अपघात सचेंदीच्या किसन नगर भागात कालव्याजवळ झाला. खासगी शताब्दी बस आणि प्रवासी लोडरमध्ये जोरदार टक्कर झाल्याने हा अपघात झाला.