महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख हे तब्बल 14 महिन्यांनी जेलबाहेर आले आहेत. सीबीआयने त्यांच्या जामिनाला स्थगिती देण्यासाठी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली, यानंतर अनिल देशमुख यांचा जामिनाचा मार्ग मोकळा झाला. 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
अनिल देशमुख यांना ईडीने 1 नोव्हेंबर 2021 रोजी अटक केली होती. भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला होता.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी 2021 मध्ये राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देशमुख यांनी दरमहा 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिले होते असा आरोप त्यांच्यावर परमबीर सिंह यांनी केला होता. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने प्राथमिक चौखसी केली होती. त्यानंतर अनिल देशमुख यांच्यासह काही जणांवर गुन्हा नोंद केला होता.
अजितदादा-जयंत पाटील मुंबईत
दरम्यान अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ मुंबईत आल्या आहेत. नागपूरमधलं हिवाळी अधिवेशन सोडून अजित पवार मुंबईत आले आहेत, यासाठी राज्य सरकारकडून अजित पवारांना स्पेशल चार्टर प्लेन देण्यात आलं.अनिल देशमुख यांच्या सुटकेनंतर त्यांच्या स्वागतासाठी वरळीतल्या त्यांच्या घराबाहेर तसंच नागपूरच्या त्यांच्या घराबाहेर पोस्टर लावण्यात आले आहेत.