गोंदिया जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आदिवाशी शाळेतील 120 मुला-मुलींना एकाच ट्रकमध्ये कोंबून प्रवास करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शाळा प्रशासनाच्या या बेजबाबदारपणामुळे जवळपास दहा विद्यार्थी-विद्यार्थींनीची प्रकृती बिघडली आहे. गाडीत श्वास घ्यायला जागा मिळत नसल्याने अक्षरश: काही विद्यार्थी-विद्यार्थींनी बेशुद्ध झाल्या. अखेर गाडीत मोठा गोंधळ उडाल्यानंतर गाडी थेट प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दिशेला वळवण्यात आली.
ट्रकमध्ये ज्या 120 मुला-मुलींना अक्षरश: कोंबले होते ते गोंदिया तालुका अंतर्गत येत असलेल्या शासकीय आदिवासी शाळा मजितपूर येथील विद्यार्थी आणि विद्यार्थीनी आहेत. या सर्वांना कोयलारी या आश्रम शाळेत खेळण्यासाठी घेऊन जाण्यात आलं होतं. तिथून परतत असताना संबंधित प्रकार घडला. परत असताना काही विद्यार्थी बेशुद्ध पडले आणि गाडीत गोंधळ उडाला. अखेर गाडी थांबवण्यात आली. तिथे असलेल्यांना समजत नव्हतं. त्यामुळे तातडीन सर्व विद्यार्थ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर एका मुलीला उपचारासाठी गोंदिया येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आलं.
संबंधित घटनेमुळे गोंदिया जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. खरंतर शाळा प्रशासनाने या गोष्टींचा विचार करायला हवा होता, अशी चर्चा परिसरात सुरु आहे. एकाच गाडीत तब्बल 120 विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना कोंबनं हे खरंच अतिशय धक्कादायक आहे. त्यामुळे संबंधितांवर प्रशासन काही कारवाई करतं का ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.