वर्गामध्ये पाऊल ठेवल्यावर शिक्षकांकडे पाहून गुड मॉर्निंग म्हणणाऱ्या 40 विद्यार्थ्यांना शिक्षकाने छडीने बेदम मारहाण केल्याची घटना बीड जिल्ह्यामध्ये घडली आहे. वर्गात आल्यावर व्हेरी गुड मॉर्निंग म्हणायचं, असं या शिक्षकाचं म्हणणं होतं. पण, विद्यार्थ्यांनी फक्त गुड मॉर्निंग म्हटलं म्हणून शिक्षा दिल्याचा प्रकार घडला आहे.
बीड जिल्ह्यातील परळी येथील वडसावित्रीनगर भागात नागनाथ निवासी प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयामध्ये हा प्रकार घडला आहे. बालाजी लक्ष्मण फड असं या शिक्षकाचं नाव आहे. या शिक्षकाविरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असं वृत्त दिव्य मराठी दैनिकाने दिले आहे.
फड हा आठव्या वर्गात विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी गेला होता. शिक्षक वर्गात आल्यानंतर मुलांनी ‘गुड मॉर्निंग सर…’
असे एक सुरात म्हणून स्वागत केलं. पण, गुड मॉर्निंग ऐवजी व्हेरी गुड मॉर्निंग का म्हणाला नाही म्हणून बालाजी फड याने छडीने संपूर्ण वर्गाला बेदम मारहाण केला. विद्यार्थ्यांच्या हाताला यात जबर दुखापत झाली. एका विद्यार्थ्याच्या हाताला दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी अंबोजागाई रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांनी याची माहिती संस्थाचालक भीमराव सातभाई यांना दिली. त्यांनी बालाजी फड यांना जाब विचारला असता, त्याने संस्थाचालकाला शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. या प्रकरणी संस्थाचालकाने परळी शहर पोलीस ठाण्यात शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.बालाजी फड या शिक्षकाने याआधीही सहशिक्षकासोबत गैरवर्तन केले होते. त्यावेळी त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. पण, न्यायालयाने पुन्हा रुजू होण्याचे आदेश दिले होते. पण, आता पुन्हा एकदा बालाजी फड याने 40 विद्यार्थ्यांना मारहाण केली आहे.