राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. सामाजिक विषयांवरचे मत त्या परखडपणे मांडताना दिसतात. त्या एक उत्तम गायिकाही आहेत. दिलखुलास अंदाजाने गाण्यांतून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या अमृता यांचं मूड बना लिया हे नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे.
अमृता फडणवीसांच्या इतर गाण्यांप्रमाणे हे गाणंही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. टी सीरिजच्या युट्यूबवर हे गाणं आज प्रदर्शित करण्यात आलं आहे. अवघ्या काही तासांतच या गाण्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्यात अमृता यांचा हटके अंदाज पाहायला मिळत आहे. अमृता यांनी हे गाणं गाण्याबरोबरच डान्सही केला आहे.
‘मूड बना लिया’ या गाण्यातील अमृता यांच्या लूकची व हटके अंदाजाची चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच अमृता यांनी त्यांच्या या गाण्याची घोषणा सोशल मीडियावर केली होती. त्यानंतर या गाण्याचा टीझरही प्रदर्शित करण्यात आला होता. टीझरमध्ये अमृता यांच्या डान्सची झलक चाहत्यांना पाहायला मिळाली होती. तेव्हापासूनच चाहत्यांमध्ये अमृता यांच्या नव्या गाण्याबाबत उत्सुकता वाढली होती.
अमृता यांनी याआधीही अनेक गाण्यांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. पेशाने बॅंकर असलेल्या अमृता यांना गाण्याची विशेष आवड आहे. ‘वो तेरे प्यार का गम’, ‘शिव तांडव स्रोतम’, ‘तेरी मेरी फिर से’, ‘बेटिया’ या त्यांच्या गाण्याला लोकप्रियता मिळाली होती.