धुळे आगारातली घटना
राज्यात अजूनही एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्याचं सत्र सुरू आहे. एसटी बसमधील दोरीच्या मदतीने एका कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना धुळ्यात घडली आहे. धुळे बस आगारातचही घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळे बस स्थानकामध्ये ही घटना घडली. हिरामण देवरे असं या एसटी बस चालकाचे नाव आहे. पुण्याच्या शिवाजीनगर बस स्थानकामध्ये हिरामण देवरे कार्यरत होते. शनिवारी पुण्यातून धुळ्यात ते आले होते. त्यानंतर धुळे बस स्थानकामध्ये बसमधील घंटी वाजवण्यासाठी असलेल्या दोरीने बसमध्येच गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.
बऱ्याच वेळ झाला चालक बसमधून बाहेर न आल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांना संशय बळावला. त्यांनी बसमध्ये डोकावून पाहिले असता हिरामण देवरे यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
हिरामण देवरे यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आला. हिरामण देवरे यांनी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले याबद्दल अद्याप माहिती मिळू शकली नाही. हिरामण देवरे यांच्या आत्महत्येमुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.