देशाच्या उत्तर व पूर्व भागात रविवारी धुक्याची दाट चादर पसरली होती. दिल्लीसह मैदानी प्रदेशात सध्या तीव्र थंडीची लाट आली आहे. या भागात किमान तापमान १.९ अंश सेल्सिअसवर घसरले आहे. त्यामुळे ४८० रेल्वेगाडय़ांच्या वाहतुकीवर परिणाम झाला. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सलग चौथ्या दिवशी दिल्लीतील किमान तापमान हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील बहुतांश ठिकाणांपेक्षा कमी होते.
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दाट धुक्यामुळे ३३५ रेल्वेगाडय़ांना विलंब झाला. ८८ रेल्वेफेऱ्या रद्द करण्यात आल्या. ३१ रेल्वेगाडय़ांचा वाहतूक मार्ग बदलण्यात आला, तर ३३ रेल्वेगाडय़ांचा प्रवास त्यांच्या अंतिम गंतव्यस्थानाच्या आधीच थांबवण्यात आला.
विमानप्रवाशांना विमान वाहतुकीच्या ताज्या माहितीसाठी संबंधित विमान कंपन्यांशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी सुमारे २५ विमानांच्या उड्डाणास विलंब झाला.भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, धुक्यामुळे भटिंडा व आग्रा येथे दृश्यमानता शून्य मीटर आणि पतियाळा, चंडीगढ, हिस्सार, अलवर, पिलानी, गंगानगर, लखनौ, कूचबिहार आणि अमृतसर, लुधियाणा, अंबाला, भिवानी येथील दृश्यमानता २५ मीटपर्यंत घसरली. पालम (दिल्ली), फुर्सतगंज, वाराणसी, मेरठ, गया आणि धुबरी येथे ५० मीटपर्यंतचे दिसू शकत होते. हरियाणातील रोहतक, दिल्लीतील सफदरजंग, रिज आणि अयानगर, उत्तर प्रदेशातील गोरखपूर, बहराइच आणि बरेली, बिहारमधील भागलपूर, पश्चिम बंगालमधील बागडोगरा आणि जलपायगुडी व आसाम, मेघालय त्रिपुरातील अनेक ठिकाणी २०० मीटर दृश्यमानता नोंदवली गेली.
हवामान कार्यालयाच्या माहितीनुसार जेव्हा दृश्यमानता शून्य ते ५० मीटरच्या दरम्यान असते तेव्हा त्या वेळी अतिदाट धुके असते. ५१ ते २०० मीटर दरम्यान दृश्यमानता असल्यास दाट धुके, २०१ ते ५०० मीटर दरम्यान मध्यम व ५०१ ते एक हजार मीटरदरम्यान दृश्यमानता असल्यास विरळ धुके असते.रविवारी सकाळी दिल्लीत थंडीची लाट पसरली होती. दिल्लीतील मुख्य हवामान केंद्र सफदरजंग वेधशाळेत किमान तापमान १.९ अंश सेल्सियस नोंदवले, जे गेल्या दोन वर्षांतील राष्ट्रीय राजधानीत जानेवारीतील हे सर्वात कमी तापमान आहे.
दिल्लीसह वायव्य भारतातील बर्फाच्छादित पर्वतांवरून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे लोधी रोड, अयानगर, रिज आणि जाफरपूर हवामान केंद्रांवर अनुक्रमे २.८ , २.६ , २.२ व २.८ अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली. दिल्लीतील किमान तापमान सलग चौथ्या दिवशी चंबा (८.२), डलहौसी (८.२), धर्मशाला (६.२), सिमला (९.५), हमीरपूर (३.९), मनाली (४.४), कांगडा (७.१), सोलन (३.६), डेहराडून (६), मसूरी (९.६), नैनिताल (६.२), मुक्तेश्वर (६.५) आणि टेहरीसह (७.६) अशा हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या बहुतेक डोंगराळ प्रदेशांपेक्षा कमी होते. हरियाणाच्या हिस्सारमध्ये १.४, पंजाबच्या आदमपूरमध्ये २.८, चुरूमध्ये उणे ०.५ व राजस्थानच्या पिलानीमध्ये १.५ अंश सेल्सियसपर्यंत पारा घसरला होता. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये ३.२ अंश आणि वाराणसीमध्ये ३.८ , बिहारच्या गयामध्ये २.९ , मध्य प्रदेशातील नौगोंगमध्ये उणे एक अंश आणि उमरियात १.५ अंश सेल्सियस तापमान होते.
थंडीच्या लाटेचे निकष
जेव्हा मैदानी भागात किमान तापमान चार अंश किंवा १० अंश आणि सामान्य तापमानापेक्षा ४.५ अंश कमी असते, तेव्हा हवामान विभाग थंडीची लाट घोषित करते. किमान तापमान दोन अंशांच्या खाली गेल्यावर तीव्र थंडीची लाट निर्माण झाल्याचे सांगण्यात येते. जेव्हा किमान तापमान १० अंशांपेक्षा कमी किंवा तेवढेच असते आणि कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा किमान ४.५ अंश कमी असते तेव्हा थंड दिवस मानला जातो. जेव्हा कमाल तापमान सरासरीपेक्षा किमान ६.५ कमी असते तेव्हा तो अत्यंत थंड दिवस मानला जातो.