ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत निर्भेळ यश संपादन करण्यासाठी रविवारी अखेरच्या दिवशी १४ गडी बाद करण्याची आवश्यकता होती, मात्र यजमान संघाला सहा गडी बाद करण्यात यश मिळाले. त्यामुळे तिसरी आणि अखेरची कसोटी अनिर्णित राहिली. पावसाने प्रभावित या सामन्याच्या अखेरच्या दिवशी दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात २५५ धावांवर गुंडाळत त्यांना फॉलोऑन दिला. त्यानंतरही दक्षिण आफ्रिकेने सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले आणि ऑस्ट्रेलियाने मालिका २-० अशी जिंकली.
दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात कर्णधार डीन एल्गर (१०) आणि हेन्रिक क्लासेन (३५) यांना गमावल्यानंतर २ बाद १०६ धावा केल्या. त्यानंतर दोन्ही संघांमध्ये सामना अनिर्णित राखण्यावर सहमती झाली. त्यावेळी सेरेल एरवी ४२ आणि टेम्बा बव्हुमा १७ धावांवर खेळत होते. ऑस्ट्रेलियाने पहिला डाव ४ बाद ४७५ धावसंख्येवर घोषित केला. ऑस्ट्रेलियाने उपाहारापर्यंत दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव गुंडाळत त्यांना फॉलोऑन दिला. दुसऱ्या डावात कर्णधार पॅट कमिन्सने (१/१६) एल्गरला बाद केले. यानंतर जोश हेझलवूडने (१/९) क्लासेनला माघारी धाडले. मात्र, एरवी आणि बाव्हुमा यांनी सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले.
त्यापूर्वी, हेझलवूडच्या (४/४८) भेदक माऱ्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव २५५ धावसंख्येवर आटोपला. तळाच्या फलंदाजांमध्ये मार्को यान्सेन ७८ चेंडूंत ११ धावा केल्या. तर, केशव महाराज (८१ चेंडूंत ५३) तर, सायमन हार्मर (१६५ चेंडूंत ४७) यांनी धावसंख्येत भर घातली. हार्मर व महाराज दोघांनीही २७ षटकांत ८५ धावा करत ऑस्ट्रेलियाला विजयापासून दूर ठेवण्यात मोलाची भूमिका पार पाडली.