आपल्या सरकारची आठ वर्षे सुप्रशासन आणि सामाजिक न्यायाला समर्पित होती. देशापुढील मुख्य मुद्दय़ांना बगल देऊन अन्यत्र लक्ष वेधण्याच्या विरोधकांच्या सापळय़ात न अडकता भाजप नेत्यांनी सदैव राष्ट्रहिताच्या मुद्दय़ांनाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
जयपूर येथील भाजप पदाधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधताना मोदी बोलत होते. ते म्हणाले, की देशहिताचे मुख्य मुद्दे घेऊन काम करा. त्यासाठी कमी मेहनतीत फळाची अपेक्षा ठेवणारा ‘शॉर्टकट’ न अवलंबता दीर्घकाळ आणि सातत्याने मेहनतीने आपले लक्ष्य गाठा. भाजपने आगामी २५ वर्षांचे लक्ष्य निश्चित करून, ते गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत. सरकारने आठ वर्षे पूर्ण केल्यानिमित्त आणि वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीत कथित शिवलिंग सापडल्याच्या मुद्दय़ांवरून वादंग निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी म्हणाले, की भाजपने विकासाचा मुद्दा राष्ट्रीय राजकारणाच्या मुख्य पटलावर आणला. मात्र, काही राजकीय पक्ष त्यांच्या क्षणिक फायद्यासाठी राष्ट्राच्या भवितव्याशी धोकादायक खेळ खेळत आहेत.
आपल्या स्वार्थासाठी काही पक्ष समाजातील कच्चे दुवे आणि छोटे ताण-तणावांचे मुद्दे हेरून विष कालवण्याचे काम करीत आहेत. जात अथवा प्रादेशिकतेच्या नावाखाली विरोधक जनतेला चिथावणी देत आहेत. अशा पक्ष आणि शक्तींपासून जनतेला सावध करत भाजपने मात्र ‘एक भारत : श्रेष्ठ भारत’ या स्वप्नपूर्तीसाठी सातत्याने प्रयत्नरत राहावे, असे आवाहन मोदी यांनी केले. पूर्वी जनसंघ असल्यापासून भाजपचा राष्ट्रभक्ती, राष्ट्रहित, राष्ट्रोद्धाराच्या सूत्रांवर भर राहिला आहे, असे मोदी म्हणाले.
सर्व भारतीय भाषा ‘भारतीयत्वा’चा आत्मा असल्याने आदरास पात्र आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात स्थानिक भाषांना प्राधान्य दिले गेले आहे. त्यामुळे प्रादेशिक भाषांना न्याय देण्याचे सरकारचे धोरण अधोरेखित होते. या भाषांच्या विकासानेच देशाचे भवितव्य उज्ज्वल होणार आहे, असेही मोदी यांनी सांगितले.