इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १६व्या पर्वाला शुक्रवार, ३१ मार्चपासून सुरुवात होत आहे. गतविजेत्या गुजरात टायटन्स आणि माजी विजेत्या चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांमध्ये सलामीची लढत रंगणार आहे. यंदाच्या पर्वात हे दोन्ही संघ विजेतेपदाच्या शर्यतीत असतील अशी अपेक्षा आहे. संभाव्य विजेत्यांचा विचार करताना चेन्नई आणि गुजरात यांच्या बरोबरीनेच मुंबई इंडियन्स, लखनऊ सुपर जायंट्स, राजस्थान रॉयल्स या संघांनाही विसरता येणार नाही.
गुजरात जायंट्सला जेतेपद राखण्याची कितपत संधी?
गेल्या वर्षी ‘आयपीएल’ पदार्पणातच गुजरातचा संघ विजेतेपदापर्यंत मजल मारेल असा अंदाज कोणीही बांधला नव्हता. मात्र, आता नव्या पर्वाला सुरुवात होत असताना संभाव्य विजेत्यांच्या यादीत गुजरातला प्राधान्य मिळत आहे. जुन्याबरोबर काही नवी अस्त्रे (खेळाडू) त्यांच्या संघात दाखल झाली आहेत. हार्दिक पंड्याचे नेतृत्व हे गुजरातच्या यशाचे सर्वांत मोठे कारण. दुखापती आणि स्वच्छंद राहणीमान यामुळे कारकीर्द धोक्यात आलेल्या हार्दिकला गेल्या ‘आयपीएल’ने संजीवनी दिली. खेळाडूच नाही, तर एक अभ्यासू कर्णधार म्हणून तो समोर आला. पंड्याकडे शुभमन गिल, मोहम्मद शमी, रशीद खान, डेव्हिड मिलर असे तगडे खेळाडू आहेत. लॉ़की फर्ग्युसन आता कोलकाता संघात परतल्याने त्याची उणीव गुजरातला भरून काढावी लागेल.