आज स्वातंत्र्याची पंचाहत्तरी साजरी होत आहे. स्वातंत्र्याचा लढा लढला जात असताना एक ध्वज असावा, त्याखाली एकजुटीने सर्व यावेत ही भावना ठेवून त्याचा रंग, त्यातील मानचिन्हे ठरविण्यात आली. वेळोवेळी त्यात बदल होऊन आताचा राष्ट्रध्वज पाहतो आहोत.
जगभरात आपल्या तिरंगा ध्वजासारखा रंग असलेला काही देशांचा ध्वज जरूर आहे. मात्र, जगभरात वरती केसरी, मध्यभागी पांढरा नि त्यात अशोकचक्र, त्याखाली हिरवा असा पट्टा दिसला की हाच आपला तिरंगा भारतीय ध्वज म्हणून छाती अभिमानाने फुलून येते.
कोणताही देश असेल त्याच्या नागरिकांत राष्ट्रध्वजाबद्दल सार्वत्रिक प्रेम आणि आदरभाव असतोच.
त्याच्या सन्मानासाठी कायदे, प्रथा, संकेत याबाबत जाणिवेचा अभाव सामान्य लोकांबाबतच नव्हे तर शासकीय संस्था- अभिकरणे, वरिष्ठ अधिकारी, नेते यांमध्ये देखील अनेकदा आढळून आलेला आहे. वेळोवेळी राष्ट्रध्वज लावण्याबाबत शासनाने लागू केलेल्या सूचनेव्यतिरिक्त बोधचिन्ह आणि नाव (अनुचित वापरास प्रतिबंध ) अधिनियम 1950 चा क्र. 12, राष्ट्र प्रतिष्ठा अपमान प्रतिबंध अधिनियम 1971 चा क्र. 69 याच्या तरतुदीनुसार राष्ट्रध्वज लावण्याचे नियमन केले जाते.
भारतीय राष्ट्रध्वज संहिता 2002 ही सध्या देशात लागू आहे. ती त्याच वर्षाच्या 26 जानेवारीपासून लागू करण्यात आली. भाग एकमध्ये राष्ट्रध्वजाच्या सर्वसाधारण वर्णनाचा समावेश असून दोनमध्ये जनतेतील सदस्य, खासगी संघटना, शैक्षणिक संस्था आदींनी राष्ट्रध्वज लावण्याची माहिती दिली आहे. तर संहितेच्या तिसऱ्या भागात केंद्र-राज्य सरकारे, त्यांच्या विविध संघटना अभिकरणे (अंगिकृत उपक्रम) यांनी राष्ट्रध्वज लावण्याबाबत माहिती आहे.
राष्ट्रीय सणांसह अन्य दिवशीही भारतीय मानक संस्थेने ठरवून दिल्यानुसार प्रमाणित ध्वज वापरता येतात. तीन रंगाचा, समान रुंदीचा कापडी जोड पट्ट्यांचा ठरवून दिलेल्या रंग क्रमानुसार नि मध्यभागी 24 आऱ्यांचे समान अंतराचे निळे चक्र, सदर राष्ट्रध्वज हा हाताने कातलेल्या, विणलेल्या लोकर, सुत, रेशमी, खादी कापड यापासून बनवलेला असेल.आयताकृती राष्ट्रध्वजाची लांबी, उंची (रुंदी) हे प्रमाण 3:2 असेच असेल. प्रसंगाच्या महत्त्वानुसार योग्य आकाराचा ध्वज निवडला जावा. मान्यवर-अतिविशेष व्यक्तींच्या विमान, मोटारीवर लावण्याचा विशिष्ट आकार आहे.
जन सदस्य, खासगी संघटना, शैक्षणिक संस्था आदीकडून ध्वजारोहण करणे/राष्ट्रध्वजाचा उपयोग करणे या तपशिलाचा समावेश आहे. राष्ट्रध्वजाचा केसरी रंगाचा पट्टा खालच्या बाजूस येईल अशा प्रकारे जाणीवपूर्वक ध्वज लावता येणार नाही. कोणत्याही व्यक्ती किंवा वस्तूला मानवंदना देण्यासाठी तो खाली आणला जाऊ नये, विशिष्ट वेळी शासन निर्देशानुसार तो अर्ध्यावर खाली आणला जाईल, याची काळजी घेणे, खासगी अंत्यसंस्कारासह कोणत्याही कारणासाठी त्याचा आच्छादन म्हणून वापर करता येणार नाही, पोशाख-गणवेश, उशा-हातरुमाल सारखा किंवा कोणत्याही पोशाख साहित्यावर छपाई भरतकाम करता येणार नाही. ध्वजावर कोणतीही अक्षरे किंवा काहीही लिहिता येणार नाही, ध्वजाचा कोणतीही वस्तू देण्या घेण्याचे, बांधण्याचे किंवा वाहून नेण्याची साधन म्हणून वापर करता येणार नाही. मात्र, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन अशा राष्ट्रीय दिनी ध्वज फडकवण्यापूर्वी तो साजरा करण्याचा भाग म्हणून फुलांच्या पाकळ्या त्याच्या घडीच्या आत ठेवता येतील.
राज्यातील सदस्य, खासगी संघटना, शैक्षणिक संस्था यांना राष्ट्रध्वजाची प्रतिष्ठा-सन्मान राखून सर्व प्रसंग-समारंभावेळी राष्ट्रध्वज फडकविता-लावता येईल. तो स्पष्टपणे दिसेल अशा रीतीने लावला पाहिजे. फाटलेला/चुरगळलेला ध्वज लावला जाऊ नये. ध्वज अन्य कोणत्याही ध्वजांसोबत एकाचवेळी, एकाच काठीवर फडकवू नये.
वक्त्याच्या व्यासपीठावर ध्वज लावायचा असल्यास वक्त्याचे तोंड श्रोत्यांकडे असल्यास वक्त्याच्या उजव्या हाताला असावा किंवा पाठीमागे लावायचा असल्यास त्याच्या मागे वरच्या बाजूस तो असावा. राष्ट्रध्वजाच्या वरच्या बाजूला, त्याच्या बरोबरीने अन्य कोणत्याही पताका ध्वज लावू नये. ध्वज ज्या काठीवर फडकत ठेवला असेल त्या काठीवर, त्या काठीच्या वरच्या टोकावर फुले-हार यासह कोणतीही वस्तू ठेवू नये अथवा बोधचिन्ह लावू नये. तोरण पताका, गुच्छ किंवा शोभेसाठी म्हणून उपयोग करू नये.
राष्ट्रध्वज कागदापासून तयार केलेला महत्त्वपूर्ण अशा राष्ट्रीय, सांस्कृतिक आणि क्रीडाविषयक कार्यक्रमाप्रसंगी लावता येईल. तथापि, असे कागदी ध्वज कार्यक्रमानंतर जमिनीवर फेकू नयेत. त्याची प्रतिष्ठा राखून खासगीरीत्या विल्हेवाट लावावी. ध्वज मोकळ्या जागेत लावायचा असल्यास तो सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत लावला जावा.
ध्वज फाटेल अशा कोणत्याही पद्धतीने तो लावू नये किंवा बांधू नये. ध्वजारोहणवेळी तो झर्रकन वर चढवावा आणि तो उतरवताना मात्र सावकाश उतरवावा. बिगुलाच्या प्रसंगोचित सुरांवर ध्वजारोहण ध्वजावतरण करायचे असल्यास या क्रिया त्या सुरांबरोबरच झाल्या पाहिजेत. घटनात्मक उच्च पदस्थ व्यक्ती यांच्या उजव्या बाजूस तो नेहमी असेल हे पाहावे. तसेच अशा व्यक्तींच्या निधनप्रसंगी राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणण्याचीदेखील विहित पद्धती ध्वजसंहितेत नमूद केलेली आहे. राष्ट्रीय सण, आनंदोत्सवावेळी अशी दुःखद घटना घडल्यास भारत सरकारच्या गृह
मंत्रालयाकडून आलेल्या आदेशाचे पालन करून राष्ट्रध्वज तातडीने अर्ध्यावर उतरवावा.
गेल्या काही वर्षांत देशभरात प्लॅस्टिक ध्वजाची सर्रास विक्री होताना दिसते. त्यावरून वेळोवेळी केंद्र सरकारने सूचना दिल्या आहेत. दरम्यान,15 ऑगस्टच्या निमित्ताने काही ई-कॉमर्स संकेतस्थळे आणि दुकाने यावरून राष्ट्रध्वजाचा मास्क विकला जात आहे. भारतीय राष्ट्रध्वज हा अस्मितेचा विषय असल्याने त्याचा मास्क म्हणून वापर करू नये.
हे मास्क अस्वच्छ होणे, शेवटी तो कचऱ्यात टाकणे याने राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. असे करणे कायद्यांनुसार दंडनीय अपराध आहे. राष्ट्रध्वज हे सजावटीचे माध्यम नाही. वर्ष 2011 मध्ये याबाबतच्या जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने राष्ट्रध्वजाचा होणारा अपमान रोखावा या निर्देशानुसार कारवाई करावी अशी मागणी त्यात करण्यात आली आहे.
राष्ट्रध्वज भारतीयांचा सन्मान आहे. त्याचा योग्य आदर करणे हे भारतीय संविधानाचा आदर करण्यासारखेच आहे. प्रत्येकाने राष्ट्रध्वज योग्य तऱ्हेने फडकवला जाईल, अजाणतेपणी काही जण तो छातीवर उलट लावतात, तो नीट लावला जाईल, तो कुठे फेकला जाणार नाही, तसा दिसल्यास उचलून पायदळी किंवा कचऱ्यात पडणार नाही याची दक्षता घेणे हे आपले कर्तव्यच मानले पाहिजे.
सर्वच झेंडारोहण करणाऱ्या व्यक्ती-संस्था यांनी याविषयीच्या कायद्याची माहिती घेणे नि इतरांना देणे, राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये यासाठी काळजी घेणे स्वतःसाठी बंधनकारक करून घ्यावे. देशप्रेम नि ध्वजप्रेम या आचरणात आणायच्या गोष्टी आहेत.
विनय खरे