माणुसकीचे अध:पतन करणाऱ्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळाल्या आहेत. यामध्ये आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. धुळ्यातील एका रुग्णालयात उपचाराधीन असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्याच्या खिशातील पैसे चोरल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे माणुसकी खरंच संपली आहे की काय, असा प्रश्न पुन्हा एकदा उद्भवला आहे.
धुळ्यातील श्री गणेशा मल्टी स्पेशालिटी दवाखान्यात हा प्रकार घडला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. यामध्ये रुग्णालयातील एक कर्मचारी मृताच्या खिशातील पैसे काढताना दिसत आहे. मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यापूर्वी तो व्यवस्थित पॅक करण्यात आला. रुग्णालयातील चार तरुण कर्मचाऱ्यांनी हे काम केले. त्यावेळी या तरुणांनी मृतदेह ठेवण्यात आलेल्या बॅगची चेन उघडून रुग्णाच्या खिशात असलेली रोकड काढून घेतली. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आला. ही गोष्ट नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी रुग्णालय प्रशासनाला याबद्दल कळवले. त्यांच्या दाव्यानुसार, मृत रुग्णाच्या खिशातील 35 हजार रुपये लंपास करण्यात आले आहेत.
महिलेच्या मृत्यूनंतर अडीच तोळ्यांची सोन्याची पोत लंपास, नाशिकच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
काही दिवसांपूर्वी नाशिकच्या रुग्णालयातही मृत महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्यांची सोन्याची पोत चोरी झाल्याचा प्रकार समोर आला होता. स्पंदन रुग्णालयात हा प्रकार घडला होता. मृत महिलेल्या मुलाने याप्रकरणी पोलिसांत फिर्याद नोंदविली होती.
गौरव शिंदे यांच्या आई कल्याण शिंदे यांची कोरोनामुळे तब्येत खालावली. त्यांना कुटुंबीयांनी राजीव गांधी भवन परिसरातील स्पंदन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचार सुरु असताना, त्यांचा मृत्यू झाला. हॉस्पिटलने मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. मात्र, शिंदे यांच्या गळ्यातील तब्बल अडीच तोळ्यांची सोन्याची पोत चोरीला गेल्याचे उघडकीस आले. ही बाब गौरव शिंदे यांनी हॉस्पिटल प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. हॉस्पिटल प्रशासनाने उपस्थित कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली. सीसीटीव्ही तपासले. मात्र, त्यातून चोरी गेलेली पोत सापडत नसल्याने गौरव शिंदे यांनी सरकारवाडा पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली होती.