अन्य कुठल्याही धर्मात केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हस्तक्षेप करत नाहीत. देशातील कुठल्याही चर्च, मशिदीचे सरकारीकरण आजवर झालेले नसताना सरकारने केवळ पंढरपूरसारख्या तीर्थक्षेत्रांचे चालवलेले सरकारीकरण हे चुकीचे आहे. त्या न्यायाने मोदी हे हिंदूत्ववादी नसल्याचे धक्कादायक विधान भाजपचे माजी खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी केले.
पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सरकारमुक्त करण्याबद्दल त्यांनी येथे संत, धर्मगुरू, महाराज आणि शहरातील नागरिकांशी चर्चा केली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी वरील वक्तव्य केले.स्वामी म्हणाले, की पंतप्रधान मोदींनी आजवर या देशात कोणत्याही चर्चचे सरकारीकरण केले का? १९४७ नंतर आजपर्यंत एकही चर्च किंवा मशीद सरकारने ताब्यात घेतली नाही. मग हिंदूनी कोणते पाप केले आहे. हिंदूचीच देवस्थाने सरकार कशी काय ताब्यात घेत त्यांचे सरकारीकरण करत आहेत. उत्तराखंडमध्येही अनेक मंदिरांचे सरकारीकरण करण्यात आले आहे. हिंदूना न्यायालयात जाऊन ती मुक्त करावी लागणार आहेत. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली चाललेले हे थोतांड आहे. एका धर्माला एक तर दुसऱ्याला वेगळा न्याय कसा दिला जात आहे. प्रत्यक्ष मोदी देखील याला अपवाद नाहीत. आणि त्या अर्थाने ते देखील हिंदूत्ववादी नाहीत अशी टीका डॉ. स्वामी यांनी या वेळी केली.
मी भाजपाविरोधी नाही असे सांगत ते म्हणाले, की भाजपच्या जाहीरनाम्यानुसार मी काम करणार आहे. मात्र खेदाने सांगावे वाटते की पंतप्रधान मोदी तसे नाहीत. कलम ३७० हटवण्यासाठी मी अमित शहा यांना मार्गदर्शन केले असेही ते म्हणाले. राज्यातील फडणवीस सरकारबाबत विचारले असता स्वामी यांनी महाराष्ट्रामधील शिंदे फडणवीस सरकार अनैतिक आहे. त्यांचे प्रकरण न्यायालयत प्रलंबित आहे, असे मार्मिक उत्तर दिले.दरम्यान, पंढरपूरमधील प्रस्तावित कॉरिडॉरमध्ये बाधित होत असलेल्या येथील होळकर वाडा व श्री रामाचे दर्शन त्यांनी घेतले. कॉरिडॉरमध्ये बाधित होत असलेल्या सर्व बाबींची सविस्तर माहिती घेतली व चर्चा केली या संदर्भात आपण पंढरपूरमधील बाधित नागरिकांना निश्चित न्याय मिळवून देऊ असे अभिवचन त्यांनी दिले. स्वामी यांनी या वेळी श्री विठ्ठल रुक्मिनिमातेचे दर्शन घेतले.
(भाजपाचे नेते, माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले.)