इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या आगामी हंगामापूर्वी झालेल्या खेळाडू लिलावात इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करनवर विक्रमी बोली लागली. पंजाब किंग्ज संघाने करनला १८.५ कोटी रुपयांत खरेदी केले. त्यामुळे तो ‘आयपीएल’ लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. आपल्यावर इतकी मोठी बोली लागेल हे अपेक्षित नव्हते, अशी प्रतिक्रिया करनने व्यक्त केली.
‘‘लिलावासाठी मी खूप उत्सुक होतो. त्यामुळे मला आदल्या रात्री फारशी झोप आली नाही. माझ्यावर इतकी मोठी बोली लागेल हे अपेक्षित नव्हते. मी खूप आनंदी आहे. पंजाबच्या संघाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचा आभारी आहे,’’ असे करन म्हणाला.करनने २०१९मध्ये पंजाबकडूनच ‘आयपीएल’मध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तो चेन्नई सुपर किंग्ज संघाकडूनही खेळला. मात्र, आता पुन्हा पंजाबचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तो उत्सुक आहे. ‘‘चार वर्षांपूर्वी मला पंजाबच्या संघानेच ‘आयपीएल’मध्ये पदार्पणाची संधी दिली होती. त्यामुळे माझ्या ‘आयपीएल’मधील प्रवासाची जिथे सुरुवात झाली, तिथेच पुन्हा परतण्याची संधी मिळणार असल्याने मी खूप आनंदी आहे. या संघात इंग्लंडचे काही खेळाडूही(जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन) आहेत. त्यांच्यासोबत खेळण्यासाठीही मी खूप उत्सुक आहे,’’ असे करनने सांगितले.