राष्ट्रवादीच्या नेत्या आणि राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना ताजी असताना शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांच्या कार्यालयात धमकीचे पत्र देण्यात आले आहे. विधवा महिलांच्या निर्णयाची अंमलबजावणी झाली तर विधवा महिलावर बलात्कार करण्याची विकृत धमकी या पत्रातून देण्यात आली आहे.
राज्य सरकारने नुकताच विधवा महिलांचा अपमान होणार नाही. यासाठी पतीच्या निधनानंतर काढून घेण्यात येणारी प्रतीके न काढण्याचा निर्णय घेतला होता. याबद्दल विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोरे पुण्यात बैठक घेतली होती.
राज्य शासनाचा हा अत्यंत महत्त्वाचा आणि महिलांचा सन्मान करण्याचा निर्णय असल्याची प्रतिक्रिया विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोरे यांनी व्यक्त केली. मात्र, यावेळी त्यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास विधवा महिलांवर बलात्कार करण्याची धमकी दिली जात असल्याची माहिती नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे.
काय आहे प्रकरण ?
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथे ग्राम पंचायतीने विधवा प्रथेसंदर्भात क्रांतिकारी निर्णय घेतला. या निर्णयाचे राज्यातील सर्व स्तरातून स्वागत झाले आहे. मी स्वतः देखील हेरवाड येथे दिनांक 11 मे रोजी भेट देऊन या गावाचे अभिनंदन केले आहे. या गावाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने देखील १७ मे, २०२२ रोजी एक विशेष परिपत्रक काढून सर्व ग्रामपंचायतीनी याचे अनुकरण करावे, असे आवाहन केले अशी माहिती गोऱ्हे यांनी दिली.