आम्हाला असा समाज घडवायचा आहे जो राष्ट्राला सुरक्षित, संघटित आणि वैभवशाली बनवेल. इतिहासात आणि वर्तमानातसुद्धा अशा अनेक व्यक्ती आहेत ज्या या धेय्याप्रति सातत्याने काम करीत आहेत. जरी आपले खानपान, वेशभूषा, बोली भाषा, पूजापद्धती, पंथ आणि उपपंथ वेगवेगळे असले, तरीही आपण याच भारतमातेचे सुपुत्र आहोत आणि विविधतेला आम्ही शाप मानत नाही, त्याला आपण आपल्या जीवनाचा अलंकार मानतो असे
उद्गार सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी काढले. पणजी येथील कार्यक्रमात ते बोलत होते.
राष्ट्र म्हणून भारताची संकल्पना पश्चिमी देशांपेक्षा वेगळी आहे. भारताने हजारों वर्षांपासून अनेक सभ्यता, संकृती, राष्ट्रे उदयास येऊन ध्वस्त होताना पाहिलेली आहे .पण राष्ट्र म्हणून भारत आजसुद्धा अस्तित्वात आहे, शाश्वत आहे , पण इतर सभ्यताबद्दल आपण असे बोलू शकत नाही. अध्ययन, वाणिज्य, तसेच समाजातील सर्व क्षेत्रांत हजारों वर्षांपासून अनेक बुद्धिमान लोक कार्यरत होते, आजसुद्धा आहेत. पण तरीसुद्धा आपल्या देशावर आक्रमणे झाले आणि आपण अनेक वर्षे गुलाम होतो. त्यावेळीसुद्धा समाजात बुद्धिमान आणि कर्तृत्ववान लोकांची कमतरता नव्हती, पण समाजात काही समाजकंटक घटक होते त्यामुळे समाजाची प्रतिरोधकशक्ती कमी झाली. समाजाची उन्नती आणि देशाची उन्नती ही सदैव एकमेकांना समांतर असते, म्हणून समाज घडवला की देश घडतो आणि संघ हेच काम करत आहे.
संघ संस्कारातून परिपक्व होऊन स्वयंसेवक समाजात जिथे गरज पडेल तिथे जाऊन काम करतो आणि याच धर्तीवर देशात जवळजवळ दीड लाख सेवाकार्ये सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी व्यासपीठावर कोकण प्रांत सहसंघचालक अर्जुन चांदेकर तसेच गोवा विभाग संघचालक राजेंद्र भोबे उपस्थित होते.