आपण तिसऱ्या लाटेकडे वाटचाल
करत आहोत : राजेश टोपे
आपण आता हळू हळू तिसऱ्या लाटेकडे वाटचाल करत असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.ते जालन्यात बोलत होते. आता लावलेल्या निर्बंधाचं पालन करणं गरजेचं असून जे निर्बंध पाळणार नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला हवे,” असंही टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. याशिवाय निर्बध कडक करावे लागतील असा इशारा देखील टोपे यांनी दिलाय. मास्क नसेल तर दंड करा, गर्दी टाळा असे आदेश प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले जातील असंही टोपे म्हणाले. करोना रुग्णांची संख्या वाढली तरी घाबरून जाण्याची गरज नाही असंही टोपे म्हणाले.
इटलीवरून भारतात परतलेले
१३ करोनाबाधित रुग्ण गेले पळून
इटलीवरून भारतात परतलेले, संस्थात्मक विलगीकरणात असलेले १३ करोनाबाधित रुग्ण पळून गेल्याची घटना अमृतसरमध्ये घडली आहे. त्यामुळे आता प्रशासनाची चिंता वाढली आहे. यापैकी ९ जण विमानतळावरूनच पळाले असून ४ जण स्थानिक रुग्णालयातून पळून गेले आहेत. इटली इंडिया विमानप्रवास करून एकूण १६० जण भारतात परतले होते. त्यापैकी बुधवारी भारतात आलेल्या प्रवाशांपैकी १२५ प्रवासी करोनाबाधित आढळले होते.बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार यापैकी लहान मुलं आणि बालक म्हणजे १९ जणांची करोना चाचणी झालेली नाही.
जागतिक आरोग्य संघटना म्हणते,
ओमायक्रॉनकडे दुर्लक्ष करु नका
करोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनने संपूर्ण जगावर भीतीचं सावट निर्माण केलं असताना डेल्टाच्या तुलनेत तो कमी धोकादायक असल्याने अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेड्रोस गेब्रेयसस यांनी मात्र ओमायक्रॉनमुळे संपूर्ण जगभरात मृत्यू होत असताना सौम्य म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करु नका असा इशारा दिला आहे. ट्रेड्रोस गेब्रेयसस यांनी करोनाचा नवा व्हेरियंट वेगाने संसर्ग फैलावत असून मोठ्या प्रमाणात लोकांना लागण होत असल्याचं सांगितलं आहे. देशांमध्ये ओमायक्रॉनने डेल्टालाही मागे टाकलं असून रुग्णालयांमध्ये गर्दी होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
उद्धव ठाकरे यांच्यासंबंधी आक्षेपार्ह
पोस्टप्रकरणी संदीप म्हात्रे यांना अटक
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासंबंधी आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी भाजपाचे माजी नगरसेवक संदीप म्हात्रे यांना अटक करण्यात आली आहे. शिवसैनिकांनी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर भाजपाचे माजी नगरसेवक संदीप म्हात्रेंना अटक करण्यात आली. संदीप म्हात्रे यांनी ट्विटर आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह मजकूर टाकला होता. संदीप म्हात्रेंवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल आहेत.
ममता सिंधुताई यांना
करोनाची लागण
‘अनाथांची माय’ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां सिंधुताई सपकाळ (७४) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी निधन झाले. त्यानंतर तीन दिवसांनी त्यांची मुलगी ममता सिंधुताई यांना करोनाची लागण झाल्याचं समोर येत आहे. ममता या सिंधुताई सपकाळ यांच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित असल्याने चिंता वाढली आहे. ममता सिंधुताई यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे. आपली करोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून आपल्या संपर्कात आलेल्या इतरांनी काळजी घेण्याचं आवाहन ममता यांनी केलं आहे.
वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत (नीट-पीजी)
ओबीसींना २७ टक्के आरक्षण
वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत (नीट-पीजी) ओबीसींना २७ टक्के आणि आर्थिकदृष्टया मागास घटकाला १० टक्के आरक्षण लागू करण्याविरोधातील याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. वैद्यकीय कोट्यात ओबीसी आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने मंजुरी दिली आहे. तसंच आर्थिक दुर्बल घटकांसाठी १० टक्के आरक्षणालाही सुप्रीम कोर्टाने हिरवा कंदील दाखवला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने नीट-पीजी समुपदेशन प्रक्रिया रखडली असल्याने ही प्रक्रिया लवरकच सुरू होणे महत्वाचे असल्याचं नमूद करत या प्रकरणावर शुक्रवारी निर्णय देण्यात येणार असल्याचे कोर्टाने स्पष्ट केलं होतं. कोर्टाने आज निर्णय दिला आहे.
माझा हात पाहा आणि
सांगा : नारायण राणे
एका कार्यक्रमानिमित्त नारायण राणे हे वाराणसी येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना पंजाबमधील घटनेसोबत महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदाबाबतही भाष्य केले. “महाराष्ट्रात येणाऱ्या काळात मुख्यमंत्री पदाचा दावेदार मी असणार असे कोणी सांगितले. मी तर असे कधी बोललो नाही. तुम्हाला काही भविष्य माहिती असेल तर माझा हात पाहा आणि सांगा. मी असा काही विचार केलेला नाही. मी एकदा मुख्यमंत्री झालो आहे आणि आता केंद्रात मंत्री आहे,” अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली.
पत्नी आणि मुलीनेच खलबत्याने ठेचून
पोलीस कॉन्स्टेबलची केली हत्या
पत्नी आणि मुलीनेच खलबत्याने ठेचून पोलीस कॉन्स्टेबलची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील कुर्ला पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश बोरसे यांची घरगुती वादातून पत्नी आणि मुलीने हत्या केली. कल्याण पूर्वेकडील कोळसेवाडी पावशेनगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी पत्नी आणि मुलीला अटक केली आहे. पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश बोरसे कल्याण पूर्वेकडील कोळसेवाडी पावशेनगर परिसरात पत्नी ज्योती बोरसे व मुलगी भाग्यश्री बोरसे यांच्यासोबत राहत होते.
पंजाबच्या घटनेमागे अमित शहा
यांचा हात तर नाही ना? : नाना पटोले
पंजाबच्या घटनेमागे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा हात तर नाही ना?, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन हा गंभीर आरोप केला आहे. पंतप्रधानांचा दौरा असतो तेव्हा 15 दिवसांपूर्वीपासून सर्व सुरक्षेच्या व्यवस्था पाहिल्या जातात. तीन गुप्तचर यंत्रणांकडून माहिती घेतली जाते. एसपीजी या सर्वांचं कंट्रोल करत असते. एसपीजी गृहखात्यांतर्गत येते. अमित शहा हे या यंत्रणांचे प्रमुख आहेत. या घटनेमागे अमित शहांचा हात तर नाही ना हा प्रश्न आहे. देशाच्या गृहमंत्र्यांनीच त्याचं उत्तर दिलं पाहिजे. काही डाव तर साधायचा नव्हता ना हेही सांगितलं पाहिजे, अशा शंका उपस्थित केल्या.
महाराष्ट्रात कोरोना रुग्णवाढीचा
विक्रम, 36 हजार रुग्ण आढळले
संपूर्ण महाराष्ट्रातील कोरोना रुग्णवाढीचा नवा विक्रम नव्या वर्षात नोंदवला आहे. तब्बल 36 हजारपेक्षा जास्त नवे कोरोना रुग्ण संपूर्ण राज्यात आज आढळून आले आहेत. यातील 20 हजारपेक्षा जास्त रुग्ण तर एकट्या मुंबईत आढळून आले आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते आहे. दरम्यान, बहुतांश रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळून आलेली नसल्यानं चिंता आणखीनच वाढली आहे. लक्षण नसलेल्या रुग्णांकडून संसर्ग अधिक होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते आहे.
दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटीत
मिळवला शानदार विजय
दक्षिण आफ्रिकेने जोहान्सबर्गमधील दुसऱ्या कसोटी सामन्यात शानदार विजय मिळवून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. दक्षिण आफ्रिकेने हा सामना सात विकेटने जिंकला. दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा नायक ठरला, त्याचा कर्णधार डीन एल्गर. त्याने नाबाद (96) धावांची खेळी केली. आतापर्यंतच्या तीन डावांमध्ये भारतीय गोलंदाज प्रभावी ठरले होते. पण चौथ्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी कामगिरी उंचावली व भारतीय गोलंदाजांना अजितबात दाद दिली नाही.
सारा तेंडुलकर, शुभमन गिलच्या
फोटोमुळे ती चर्चेत
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लाडकी लेक सारा तेंडुलकर ही लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक आहे. साराने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नसले तरी तिचे लाखो चाहते आहेत. साराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या ट्रीपचे काही फोटो शेअर केले आहेत. त्याच फोटोमुळे ती चर्चेत आली आहे. यावेळी तिच्यानंतर बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानच्या कोलकाता नाइट रायडर्स टीमचा सलामीवीर शुभमन गिलने देखील सुट्ट्यांचा आनंद घेत असल्याचा फोटो शेअर केला आहे. आता हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा सुरु झाल्या आहेत. त्या दोघांनी अजुन अधिकृत रित्या त्यांच्या रिलेशनशिपबद्दल सांगितले नाही.
SD social media
9850 60 35 90