वातावरणात सध्या गारवा असला तरी राज्यातील काही भागात याची तीव्रता कमी-जास्त आहे. काही भागात तर ढगाळ वातवारण दिसत असून हवामानामध्ये बदल झालेला दिसतोय. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसा राज्यात आजपासून (7 जानेवारी) 10 जानेवारीपर्यत पुन्हा पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रात काही भागात विजांच्या कडकडाटास पाऊस तर दुसरीकडे रात्रीच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
राज्यात 7 ते 10 जानेवारी या कालावधीत पावसाची शक्यता आहे. या चार दिवसात उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस बरसू शकतो. तर विदर्भात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. 7 जानेवारीपासून उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.
मराठवाड्यात 8 जानेवारीपासून वादळी पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भात 8 ते 10 जानेवारी या कालावधीत बहुतांश भागात पाऊस बरसणार आहे. 8 आणि 9 जानेवारीला तुरळक भागात गारांचा पाऊस कोसळू शकतो. पुणे हवामान विभागाने तसा अंदाज व्यक्त केला आहे.
भारतीय हवामान विभागानं पुढील चार दिवसांसाठी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स मुळं बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर जिल्ह्यांना 8 जानेवारीला यलो अॅलर्ट देण्यात आलाय. तर, 9 जानेवारीला अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्याला यलो अॅलर्ट देण्यात आलाय.
दरम्यान, आगामी चार दिवस राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे हुडहुडी कमी झाली असली तरी अजूनही वातावरणात गारवा जाणवत आहे. काही ठिकाणी थंडीच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे त्याचा फायदा गहू, ज्वारी, हरभरा या पिकांना होतोय.या पिकांना थंडीचे वातावरण चांगले पोषक असते. पोषक वातावरण मिळाल्याने उगवण चांगली होऊन पिकांची वाढ जोमात होते. सध्याचा गारवा या पिकांसाठी संजिवनी ठरतोय.