मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्राने राज्यात खळबळ उडाली. गृहमंत्र्यांवरच पैसे वसुलीचे आरोप त्यांनी पाठवलेल्या पत्रात केले होते. सोमवारी पुन्हा एकदा शरद पवारांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन परमबीर सिंग यांच्या पत्रावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण देखील केली आहे. “ज्या दिवसांचा परमबीर सिंग यांनी पत्रात उल्लेख केला आहे, त्या काळात अनिल देशमुख करोनामुळे रुग्णालयात होते. मग सचिन वाझे देशमुखांना कधी भेटले?”, असा आक्षेप शरद पवार यांनी घेतला आहे.
परमबीर सिंग यांच्या पत्रावर मोठा गदारोळ झाल्यानंतर विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाऊ लागली आहे. लोकसभेत देखील या मुद्द्यावरून भाजपाच्या खासदारांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील ठाकरे सरकार बॅकफूटवर गेल्याचं चित्र निर्माण झालेलं असताना शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारला मोठा पुश दिला आहे.
दरम्यान, विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या राजीनाम्याच्या मागणीचा देखील शरद पवारांनी यावेळी समाचार घेतला. “हे स्पष्ट होत आहे की ज्या कालावधीसंदर्भात आरोप केले जात आहेत, त्या काळात अनिल देशमुख रुग्णालयात होते. त्यामुळे राजीनाम्याच्या मागण्यांना काहीही आधार उरत नाही”, असं पवार म्हणाले आहेत.