राज्यांत बटाटय़ाचे भाव पन्नास टक्क्य़ांनी कोसळले असून रब्बी हंगामात दर किलोला ५ ते ६ रुपये किलोपर्यंत खाली आले, असे दिसून येते. ग्राहकांना बटाटे मिळत असले तरी त्यांचे दर खूपच कमी आहेत. शेतक ऱ्यांचा उत्पादन खर्चही त्यातून निघत नाही.
२० मार्चला उत्तर प्रदेशातील संबळ व गुजरातमधील दिशा येथील घाऊक बाजारात गेल्या तीन वर्षांतील नीचांकी दर गाठला गेला. बटाटय़ाचे भाव तिथे सहा रुपये किलो नोंदले गेले. वर्षभरापूर्वी बटाटय़ाचे घाऊक बाजारातील किमान दर हे उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्य़ात ८-९ रुपये किलो होते तर इतर राज्यात ते १० रु. किलो होते. घाऊक मंडईत ते २३ रुपये किलो होते. बटाटा ग्राहक राज्यांत २० मार्चला घाऊक दर पन्नास टक्के कमी झाले. गेल्या वर्षी १५ पैकी १२ ग्राहक राज्यांत हे दर घसरले.
पंजाबमध्ये अमृतसर व दिल्लीत २० मार्चला बटाटय़ाचे दर पाच रुपये किलो होते. चेन्नईत सतरा रुपये होता. ग्राहक कामकाज मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे २० मार्चला किरकोळ किंमत १० रु. किलो होती. वर्षभरापूर्वी ती वीस रुपये किलो होती. दिल्लीत बटाटय़ाचे दर २० मार्चला पंधरा रुपये किलो होते.
बटाटय़ाचे ८५-९० टक्के उत्पादन हे हिवाळ्यात (रब्बी हंगामात) होते. नोव्हेंबरमध्ये हंगाम सुरू होतो. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, पंजाब व गुजरात ही बटाटय़ाचे उत्पादन करणारी प्रमुख राज्ये आहेत.
भारतातील बटाटा उत्पादन – वार्षिक ५ कोटी टन
सरासरी लागवडीचे क्षेत्र – २१ लाख हेक्टर
सरासरी हेक्टरी उत्पादन – २२ ते २४ टन