भटक्या कुत्र्यांचा मुद्दा विधानसभेत, बच्चू कडूंनी सांगितला वादग्रस्त उपाय!
महाराष्ट्र विधानसभेमध्ये भटके कुत्रे आणि त्यांच्यामुळे होणाऱ्या त्रासावर चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडू यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. भटक्या कुत्र्यांची समस्या सोडवण्यासाठी त्यांना आसामला पाठवा, कारण आसामची लोक कुत्रे खातात, असं बच्चू कडू म्हणाले. आसाममध्ये कुत्र्यांना 8 हजार रुपयांचा दर मिळू शकतो, यामुळे राज्यातली भटक्या कुत्र्यांची समस्या दूर होईल आणि कुत्र्यांची लोकसंख्याही नियंत्रणात येईल, त्यामुळे कुत्र्यांना आसामला पाठवावं, असं बच्चू कडू म्हणाले.
सध्या फक्त एका शहरासाठीच हा प्रयोग केला पाहिजे, असं मतही बच्चू कडू यांनी मांडलं. बच्चू कडू यांच्या या वक्तव्याचा प्राणी प्रेमी आणि पशू अधिकारांची लढाई लढणाऱ्या कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. बच्चू कडू यांचं विधान अमानवी आणि अपमानकारक असल्याची टीका त्यांनी केली आहे. आमदार प्रताप सरनाईक आणि अतुल भातखळकर यांनी भटक्या कुत्र्यांच्या त्रासाबाबतचा प्रस्ताव विधानसभेत मांडला होता, त्यावर बच्चू कडू बोलत होते.
चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये वंचित फॅक्टरमुळे मविआचा पराभव?
पुण्यातील चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांचा पराभव झाला. त्यांच्या पराभवाला वंचित आघाडी कारणीभूत असल्याचे सांगितले जात होते. पण, वंचितच्या भूमिकेमुळे मविआचा उमेदवार पडला या आरोपात काहीही तथ्य नाही, असा दावा वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला.
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या निकालानंतर प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना राजकीय घडामोडींवर भाष्य केलं.
माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या चुलत भावाने स्वत: वर का झाडली गोळी?
लातूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर यांच्या चुलत भावाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. त्यांनी शारीरिक त्रासाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचललं असावं असा अंदाज व्यक्त केला जात आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी केंद्रीय गृह मंत्री शिवराज पाटील चाकुरकर यांचे चुलत भाऊ चंद्रशेखर उर्फ हणमंत पाटील यांनी लातुरातील शिवराज पाटील चाकुरकर यांच्या देवघर येथील निवासस्थानी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. आज सकाळी 9 ते 10 च्या सुमारास ही घटना घडली असून आत्महत्येचं नेमकं कारण अस्पष्ट आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.
12वी पेपर फुटी प्रकरणात 2 शिक्षकांसह 5 आरोपी अटकेत
सध्या 12 वीच्या परीक्षा सुरू असून पहिल्या दिवसापासून राज्य शिक्षण मंडळाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. आधी इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत उत्तर छापलं गेलं होतं. तर बुलढाणा जिल्ह्यात बारावीच्या गणिताचा पेपर फुटल्याने शिक्षण यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली. काही महाठगांनी तब्बल 15 हजार रुपये प्रत्येक विद्यार्थ्यांकडून उकळून, त्यांना पास करून देण्याचं जणू रॅकेटच चालवलं. ज्यात आता अनेक मासे पोलिसांच्या गळाला लागत आहेत.
3 फेब्रुवारी रोजी बारावीचा पेपर सुरू होण्याआधीच साडेदहा वाजता गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला, ही बातमी वाऱ्याच्या वेगाने गावभर पसरली. अत्यंत कडेकोट बंदोबस्तात हे पेपर स्थानिक पोलीस ठाण्यात आणि तिथून परीक्षा केंद्रावर पोहोचवले जातात. असं असतानाही हा पेपर सुरू होण्याआधीच फुटल्याने परीक्षा विभागाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले. त्यामुळे हा पेपर नेमका कुणी फोडला? याचा तपास आता सुरू झाला आहे. साखरखेडा पोलिसांनी तात्काळ तपास चक्रे फिरवून तब्बल पाच जणांना अटक केली.
रविंद्र धंगेकर राज ठाकरेंची भेट घेणार?
मागच्या चार दिवसांपूर्वी पुण्यातील दोन विधानसभेच्या पोटनिवडणुकांचे निकाल हाती आले. यामध्ये राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कसबा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर हे तब्बल 10 मतांनी निवडून आल्याने भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपा उमेदवार हेमंत रासने यांचा 10 हजार मतांनी पराभव केला. त्यांच्या पराभवाने भाजपचा 28 वर्षांच्या गडाला सुरुंग लावला. दरम्यान रविंद्र धंगेकर यांनी एका वृत्त वाहिनीला मुलाखत दिली यावेळी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे.
रविंद्र धंगेकर यांची पार्श्वभूमी पाहिली गेल्यास ते पहिल्यांदा शिवसेना, मनसेनंतर काँग्रेसमध्ये आले आहेत. याचबरोबर रवींद्र धंगेकर मनसेत नगरसेवक म्हणून कार्यरत होते. ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जायचे. पण, 2019 साली धंगेकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.ठाकरे कुटुंब पूर्वीपासून माझ्या जवळचं आहे. आजही राज ठाकरेंशी चांगले संबंध आहेत. शिवसेना आणि मनसे सोडली, पण त्यांच्यावर कधीही टीका केली नाही. कारण, कुटुंब म्हणून त्या परिवारात राहत होतो, असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं. आमदार झाल्यावर राज ठाकरेंचा फोन आला होता का? असं विचारल्यावर धंगेकर म्हणाले, “राज ठाकरेंचा फोन आला नाही. पण, त्यांना भेटण्यास जाणार आहे,” असं धंगेकरांनी सांगितलं आहे.
उत्तर भारतातील मजूरांबाबत चुकीचे वृत्त पसरविल्याप्रकरणी भाजपा नेता, २ पत्रकारांवर गुन्हे दाखल
तामिळनाडूमध्ये स्थलांतरीत मजूरांमध्ये सध्या दहशतीचे वातावरण आहे. त्याला कारण बनले मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या नावाने पसरलेली एक खोटी बातमी. ही बातमी व्हायरल होऊन गोंधळ माजल्यानंतर आता तामिळनाडू सरकारने उत्तर प्रदेशमधील एक भाजपा नेता आणि दैनिक भास्कर यांच्या संपादकांसह दोन पत्रकारांवर गुन्हा दाखल केला आहे. तामिळनाडूमध्ये उत्तर भारतीय स्थलांतरीत मजूरांवर हल्ले होत असल्याबाबतचे खोटे आणि निराधार वृत्त दिल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तीन स्वतंत्र तक्रारी करुन तीन जणांवर हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भाजपाचे प्रवक्ते आणि गोवा सरकारचे सर्वोच्च न्यायालयातील सल्लागार म्हणून काम करणारे प्रशांत उमराव यांच्यासह दैनिक भास्करचे संपादक (नाव जाहीर केलेले नाही) आणि बिहारमधील पत्रकार मोहम्मद तनवीर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या शोधासाठी तामिळनाडू पोलिसांची तीन पथके रवाना झाली आहेत. तसेच तामिळनाडू सरकारतर्फे शनिवारी एक निवेदन काढून सांगितले की, सर्व उत्तर भारतीय कामगार तामिळनाडूमध्ये शांततेत राहत आहेत.
बिल गेट्स झाले आजोबा; लेक जेनिफरने दिला गोंडस बाळाला जन्म
मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांची मोठी लेक जेनिफर गेट्स हिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. पती नायल नासर याने त्याच्या पहिल्या बाळाच्या जन्माची घोषणा केली आहे. यामुळे बिल गेट्स आता आजोबा झाले आहेत. जेनिफर गेट्सने पतीसोबत नवजात बाळाचा हातात घेतलेला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत ही गोड बातमी दिली आहे.आमच्या छोट्या निरोगी कुटुंबासाठी प्रेम पाठवा, असे तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे. बिल गेट्स यांनीही तोच फोटो त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर शेअर करत जेनिफर आणि नायल माता पिता झाल्याने खूप अभिमान वाटत असल्याचे म्हटले आहे. बिल गेट्स यांची विभक्त पत्नी मेलिंडा फ्रेंच गेट्स यांनीही आजी झाल्याचा आनंद व्यक्त केला आहे.
WPLमुळे तरुणींना खेळण्यास अन् स्वप्न पूर्ण करण्यास प्रेरणा मिळेल : नीता अंबानी
महिला प्रीमियर लीगचा उद्घाटनाच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने धमाकेदार असा विजय गुजरात जायंट्सविरुद्ध मिळवला. या सामन्यावेळी संघाच्या मालक निता अंबानी उपस्थित होत्या. मुंबईने फलंदाजीसह गोलंदाजीत कमाल करत गुजरात विरुद्ध तब्बल १४३ धावांनी सामना जिंकत स्पर्धेची विजयी सुरुवात केली.मुंबई इंडियन्सच्या मालक नीता अंबानी प्रत्येक चेंडूवर जल्लोष करताना दिसल्या. त्यांनी महिला संघाला प्रोत्साहनही दिलं. WPLचा पहिला दिवस हा अविस्मरणीय होता असं नीता अंबानी म्हणाल्या. क्रीडा क्षेत्रातील महिलांसाठी एक मोठा क्षण असून याचा भाग बनणं हे खूप रोमहर्षक असल्याचं त्या म्हणाल्या.WPLमुळे महिलांना जास्ती जास्त सहभागी करून घेता येईल आणि खेळात करिअरसाठीही मदत होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. देशभरातील तरुण मुलींना क्रिकेट खेळण्यासाठी आणि त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रेरणा मिळेल असंही नीता अंबानी यांनी म्हटलं.
SD Social Media
9850 60 3590