आज दि.१७ जून च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

करोना विषाणूच्या
साथीने भारत उद्ध्वस्त

करोना विषाणूच्या साथीने भारत उद्ध्वस्त झाला आहे. जगभरात करोना विषाणूचा प्रसार करण्यास कारणीभूत असल्याबद्दल चीनने अमेरिकेला १० ट्रिलियन अमेरिकी डॉलर द्यावे असा दावा अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी ही मागणी केली आहे.

२६ जून रोजी भाजपाचे राज्यभरात
चक्काजाम आंदोलन

मराठा आरक्षणा पाठोपाठच आता राज्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा देखील तापताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यातील ओबीसी नेते आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. तर, आज भाजपाची देखील या अनुषंगाने बैठक पार पडली, या बैठकीनंतर पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबईत पत्रकारपरिषद घेत, २६ जूनरोजी भाजपा राज्यभरात एक हजार ठिकाणी चक्काजाम आंदोलन करणार असल्याची घोषणा केली. तर, “…आता रस्त्यावर उतरू, न्यायालयात जाऊ पण ओबीसी आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही” असं म्हणत बावनकुळे यांनी राज्य सरकारला इशाराही दिला.

पंकजा मुंडे यांचा ठाकरे
सरकारवर हल्लाबोल

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने राज्य सरकारसमोर पेचप्रसंग उभा ठाकला आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यात गुंतलेल्या ठाकरे सरकारसमोर आता ओबीसी आरक्षणाचा प्रश्नही निर्माण झाला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपाच्या नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. करोना परस्थिती आणि इम्पिरिकल डाटा गोळा करण्याचा एकमेकांशी संबंध लावणं चुकीचं असून, सरकारमध्ये मंत्री असणाऱ्यांना आंदोलन करण्याची गरज काय?, असा सवाल करत पंकजा मुंडे यांनी २६ जून रोजी चक्का जाम आंदोलनाची हाक दिली आहे.

ममता बॅनर्जी यांना
नंदीग्राममधील पराभव अमान्य

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये नंदीग्राममधून पराभव झाला. त्यांच्याविरुद्ध त्यांच्याच पक्षातले एकेकाळचे विश्वासू नेते सुवेंदू अधिकारी यांचा भाजपाच्या तिकिटावर विजय झाला. मात्र, हा पराभव ममता बॅनर्जी यांना अमान्य आहे. २ मे रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर ३ मे रोजी त्यांनी भाजपावर गैरव्यवहार केल्याचे आरोप देखील केले होते. नंदीग्राममधून पराभूत झाल्यानंतर ममता कोणत्या मतदारसंघातून निवडून विधानसभेत जाणार, याची चर्चा सुरू असताना ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममधूनच विधानसभेत जाण्याचा चंग बांधला आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप
स्पर्धेमध्ये पावसाचा अडथळा

भारतासह संपूर्ण जग ज्या सामन्याची वाट पाहत होते, त्या सामन्याचा दिवस आज उजाडला आहे. विराट कोहली आणि केन विल्यमसन या दोघांच्या सैन्यात आजपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना (World Test Championship Final) सुरू होत आहे. पावसाने चाहत्यांना निराश केले आहे. कसोटी क्रिकेटच्या १४४ वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच होत असलेल्या या स्पर्धेमध्ये पावसाने अडथळा आणला आहे. साऊथम्प्टनमधील हॅम्पशायर बाऊलच्या मैदानात हा सामना खेळवला जाणार होता. साऊथम्प्टनमध्ये रात्रभर पाऊस पडत आहे. यामुळे बीसीसीआयने पहिल्या सत्रात खेळ होणार नसल्याचे जाहीर केले आहे.

मॉल्स, रेस्टॉरंट्समध्ये गर्दी केल्यास
तिसरी लाट येण्याची शक्यता अधिक

राज्यांतील निर्बंध शिथील केल्यानंतर पुढील ३० ते ६० दिवसांत देशभरातील नागरिक मॉल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर ठिकाणी मोठ्या संख्येने भेट देणार असल्याने लवकरच करोनाच्या तिसऱ्या लाट धडकण्याची शक्यता आहे. कम्युनिटी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, लोकल सर्कल्सच्या सर्वेक्षणानुसार, सुमारे ३१ टक्के नागरिकांनी पुढच्या ६० दिवसात जेवणासाठी रेस्टॉरंटला भेट देण्याचे ठरवले आहे, तर २९ टक्के लोक मॉलमध्ये जाण्याची शक्यता आहे. विस्तारित कुटुंब किंवा मित्र यातील ९० टक्के लोकांचा यामध्ये समावेश आहे.

करोनाची दुसरी लाट आता
ओसरू लागल्याचं चित्र

करोनाची दुसरी लाट आता ओसरू लागल्याचं चित्र आहे. दिवसागणिक राज्यातील नवीन करोनाबाधितांची संख्या कमी होत असून, सरकारने एप्रिलमध्ये लागू केलेले निर्बंधही काही प्रमाणात शिथिल केले आहेत. तर काही जिल्ह्यांमध्ये निर्बंध पूर्णपणे हटवले आहेत. दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी होताना दिसत असली, तरी तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सरकारने राज्यातील निर्बंध हटवण्यासंदर्भात आणि दुसऱ्या लाटेत निर्माण झालेली अभूतपूर्व परिस्थितीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पंचस्तरीय पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे.

साबरमती नदीत करोना
विषाणू आढळल्याची नोंद

देशात करोनाची दुसरी लाट आता हळूहळू ओसरताना दिसत आहे. मात्र संकट अजून टळलेले नाही. करोनाबाबत रोज काहीतरी नवीन खुलासे होता आहेत. अशीच एक घटना गुजरातमधून समोर आली आहे, जिथे सर्वात महत्वाच्या नदी साबरमती नदीत करोना विषाणू आढळल्याची नोंद करण्यात आली आहे. अहमदाबादच्या मध्यभागी असलेल्या साबरमतीच्या पाण्याचे नमुने घेण्यात आले होते. या सर्वांमध्ये करोनाचा संसर्ग आढळून आला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.

भारतीय जनता पार्टीतर्फे
२१ जूनला राज्यभर योग शिबिर

महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे जागतिक योग दिनानिमित्त राज्यभर २१ जून रोजी २७०० पेक्षा अधिक ठिकाणी योग शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात राज्यभरातील एक कोटीहून अधिक नागरिक सहभागी होतील, अशी माहिती प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत उपाध्ये बोलत होते.

राहुल गांधी यांच्यावर टिका करत
काँग्रेस आमदाराचा राजीनामा

ज्योतिरादित्य सिंधिया आणि जितिन प्रसाद यांच्यानंतर आता अजून एका तरुण काँग्रेस नेत्यानं पक्षाला रामराम ठोकला आहे. विशेष म्हणजे, पुन्हा एकदा काँग्रेसमधल्या कार्यपद्धतीवर आणि पार्टी हायकमांडवर टीका करत हा नेता बाहेर पडल्यामुळे काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. काँग्रेसचे आसाममधील आमदार रूपज्योती कुर्मी यांनी हायकमांडवर टीका करत पक्षातील सर्व पदांचा आणि आमदारकीचा देखील राजीनामा दिला आहे. रुपज्योती कुर्मी २१ जून रोजी भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत.

गोव्यातील सनातन संस्थेचे
फेसबुक पेज ब्लॉक

गोव्यातील सनातन संस्थेच्या फेसबुक पेज ब्लॉक केल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात फेसबुकला आव्हान दिले आहे. संस्थेच्या तीन फेसबुक पेजपैकी दोन पेज २०११मध्ये आणि एक २०१९मध्ये तयार करण्यात आलं होतं. गुरुवारी या खटल्यावर सुनावणी झाली. न्यायमूर्ती एम. एस. सोनक आणि न्यायमूर्ती एम. एस. जावळकर यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान, फेसबुक इंडियातर्फे वकिलांनी संस्थांद्वारे दाखल केलेल्या याचिकेच्या युक्तिवाद करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. खंडपीठाने हा खटला ८ जुलैपर्यंत तहकूब केला आहे.

शाळा सोडल्याचा दाखला नसला
तरी सुद्धा विद्यार्थ्यांना प्रवेश देणार

शाळेच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडे शाळा सोडल्याचा दाखला नसला तरी सुद्धा विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा. शाळा सोडल्याचा दाखला नसल्यास विद्यार्थ्यांच्या जन्म प्रमाणपत्रवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा, असा महत्वाचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
शासन निर्णयात म्हटलं आहे की, प्रत्येक मुलाला शिकण्याचा तसेच एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेण्याचा अधिकार आहे.

एन्काऊंटर स्पेशालिस्ट
प्रदीप शर्मा यांना अटक

नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असलेले एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना आज एनआयएने (NIA) अटक केली आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात पुरावे नष्ट करणे आणि या कटात सहभागी असल्याचा आरोप लावत त्यांना आज एनआयएने अटक केली आहे. त्याच बरोबर अजून दोघांना या प्रकरणी अटक करण्यात आली असून आता या प्रकरणात एकूण 10 लोकांना अटक करण्यात आली आहे.

कोरोना काळात स्विस बँकेत
भारतीयांनी जमा केले सर्वाधिक पैसे

कोरोना काळात भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठे झटके बसले, मात्र भारतातील श्रीमंतांवर याचा काहीही परिणाम झालेला दिसत नाही. कारण याच काळात अनेक भारतीय श्रीमंतांनी स्विस बँकेत मोठ्या प्रमाणात पैसे जमा केलेय. या पैशांची रक्कम इतकी आहे की मागील 13 वर्षांचा विक्रम मोडलाय. गुरुवारी (17 जून) स्विझर्लंडची केंद्रीय बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीत हे उघड झालंय. यानुसार 2020 मध्ये स्विस बँकेत (Swiss Banks) भारतीयांना आणि भारतीय कंपन्यांनी जवळपास 2.55 अब्ज स्विस फ्रँक म्हणजेच 20,700 कोटी रुपये जमा केले आहेत. ही रक्कम मागील 13 वर्षातील सर्वाधिक आहे.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.