आज दि.९ मार्च च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

“राज्यातला विकासाचा मेगाब्लॉक दूर करणारा अर्थसंकल्प”; मुख्यमंत्र्यांकडून फडणवीसांची पाठराखण

उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आर्थिक वर्ष २०२३-२४ साठीचा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे. तसेच हा अर्थसंकल्प अभ्यासपूर्ण असल्याचं मत मांडलं. शिंदे म्हणाले की, “राज्याचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवूनच हा अर्थसंकल्प बनवला आहे. अर्थमंत्री फडणवीस यांनी विकासाचा आणि सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर केला आहे.”

शिंदे म्हणाले की, “हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे. यात शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, विद्यार्थी, तरुण आणि ज्येष्ठांसह सर्वांचा समावेश करण्यात आला आहे. आपलं हे राज्य शेतकऱ्यांचं राज्य आहे. या शेतकऱ्यांसाठी राज्यात नमो शेतकरी योजना सुरू करण्यात आली आहे. ही एक ऐतिहासिक योजना आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आधार मिळेल. राज्यातल्या आत्महत्या थांबवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.” मुख्यमंत्री म्हणाले की, “राज्य सरकारने मुलींसाठी ‘लेक लाडकी’ ही योजना आणली आहे. अशी योजना आपल्या राज्यात पहिल्यांदाच सादर करण्यात आली आहे. तसेच २.५ ते ३ कोटी असंघटित कामगारांसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. असंघटित कामगारांच्या मुलांच्या शिक्षण आणि आरोग्यासाठी गरजेची पावलं उचलली जातील. तसेच ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांना रोजगार मिळवून दिले जातील, तरुणांसाठी स्वयंरोजगाराच्या योजना असतील. तरुणांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे.” एकनाथ शिंदे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करताना म्हणाले की, “गेल्या अडीच वर्षांमध्ये जे काही ठप्प होतं त्याला चालना देण्याचं काम नव्या सरकारने आणि आमच्या अर्थसंकल्पाने केलं आहे. आपल्या राज्यात विकासाचा मेगाब्लॉक तयार झाला होता, फडणवीस यांनी या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून तो दूर केला आहे. याचे परिणाम आगामी काळात पाहायला मिळतील.”

फडणवीसांचा अर्थसंकल्प म्हणजे चुनावी जुमला; अजित पवारांचा राज्य सरकारला टोला

राज्यातल्या नव्या सरकारने म्हणजेच शिंदे-फडणवीस सरकारने आज त्यांचा पहिला अर्थसंकल्प मांडला. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात हा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर आता विरोधी पक्षातील नेत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहे. फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विधीमंडळाबाहेर माध्यमांच्या प्रतिनिधींनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया विचारली असता, पवार म्हणाले की, “हा अर्थसंकल्प म्हणजे एक प्रकारचा चुनावी जुमला आहे.”

अजित पवार म्हणाले की, “अर्थमंत्र्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प आपण पाहिला. खरंतर हा अर्थसंकल्प म्हणजे एक प्रकराचा चुनावी जुमला आहे. यात आपल्याला दूरदृष्टीचा आभाव जाणवेल. तसेच वास्तवाचं भान नसलेला हा अर्थसंकल्प आहे. या राज्यात अलिकडच्या काळात राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी ९ वेळा आणि मी स्वतः ७ वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. माझ्या मते स्वप्नांचे इमले, शब्दांचे फुलोरे आणि घोषणांचा सुकाळ असलेला हा अर्थसंकल्प आहे.”

शिवराज्याभिषेकाचे 350 वे वर्ष, राज्य सरकारची अर्थसंकल्पात मोठी घोषणा

आज अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला. राज्यात होणाऱ्या आगामी निवडणुका पहाता अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडण्यात आला आहे. अनेक लोकप्रिय घोषणा करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. सोबत धनगर समाजाला देखील बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याचबरोबर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं  350 वं वर्ष असल्यानं या महोत्सवसाठी 350 कोटींची तरतुद करण्यात आली आहे.या अंतर्गत पुण्यातील आंबेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज संकल्प उद्यानासाठी 50 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथील शिवचरित्रावरील उद्यानासाठी 250 कोटी रुपये तर शिवनेरी किल्ल्यावरील महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित संग्रहालय आणि किल्ला संवर्धनासाठी  300 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मुंबई ते मदुराई सुसाट धावणार भारत गौरव ट्रेन

पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईत ते मदुरै असा सुपरफास्ट ट्रेनचा प्रवास करता येणार आहे. या ट्रेनमध्ये अत्याधुनिक सुविधा देखील असणार आहेत.भारत गौरव टुरिस्ट ट्रेन, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून गुरुवार, 09.3.2023 रोजी 00.20 वाजता सुटेल, गोलाकार मार्गाने प्रवास करेल आणि 19.3.2023 रोजी परत CSMT ला परत पोहोचेल.भारतीय रेल्वेने पर्यटकांसाठी मुंबई ते रेनिगुंटा भारत गौरव ट्रेन चालवण्यात येणार आहे. या ट्रेनचा क्रमांक 00199 असून तुम्ही IRCTC द्वारे देखील त्यावर बुकिंग करू शकता.कसा असेल मार्ग- कल्याण, पुणे, वाडी, गुंटकल. बेंगळुरू, व्हाईटफील्ड, तिरुनेलवेली, कोचुवेली, मदुराई, रेनिगुंटा आणि परत दौंड, पुणे, कल्याण मार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस.एक AC-2 टियर, तीन AC-3 टियर, 7 स्लीपर क्लास, पँट्री कार आणि 2 जनरेटर कोच असे या ट्रेनला कोच असणार आहेत.

Reliance Jio ने लॉन्च केली आणखी २७ शहरांमध्ये ५ जी सेवा; महाराष्ट्रातील ‘या’ शहरांचा आहे समावेश

भारत सध्या Rilance Jio , Airtel आणि VI म्हणजेच वोडाफोन-आयडिया या प्रमुख टेलिकॉम कंपन्या आहेत. रिलायन्स जिओ आणि एअरटेल या टेलिकॉम कंपन्यांनी आपली ५ जी सेवा भारतामध्ये सुरु केलेली आहे. यामध्ये रिलायन्स जिओ कंपनी सर्वात आघाडीवर आहे. देशातील अनेक शहरांमध्ये जिओची ५ जी सेवा सुरु झाली आहे. रिलायन्स जिओने देशभरातील २७ शहरांमध्ये आपली ५जी सेवा सुरु केली आहे.

या ५ जी सेवेमध्ये महाराष्ट्रातील एका शहराचा समावेश आहे. आज सुरु झालेल्या सेवेमध्ये राज्यातील सातारा शहराचा समावेश करण्यात आला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील १७ शहरांमध्ये जीओची ५ जी सेवा सुरु झाली आहे. महाराष्ट्र राज्यातील अकोला, परभणी, अहमदनगर, अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड-वाघाळा, नाशिक, पुणे, सांगली आणि सोलापूर व सातारा अशा एकूण १७ शहरांमध्ये रिलायन्स जीओची ५ जी सेवा सुरु झाली आहे.

भारताला पाकिस्तान व चीनकडून धोका; अमेरिकी गुप्तचर खात्याचा इशारा!

गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तान आणि चीन या दोन शेजारी देशांबरोबर भारताचे असणारे संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. दोन्ही देशांकडून सातत्याने सीमाभागात भारताला मनस्ताप देणाऱ्या कारवाया केल्या जात असताना भारताकडूनही याबाबत ठाम आणि निषेधाची भूमिका घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आशियामध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी पाकिस्तान आणि चीनकडून सीमाभागात होणाऱ्या कारवाया थांबवण्याची आवश्यकता आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यक्त केली जात आहे. यावर आता थेट अमेरिकेच्या गुप्तचर खात्याकडून इशारा देण्यात आला आहे.बुधवारी अमेरिकेतील गुप्तचर खात्याकडून पाकिस्तान आणि चीनबाबत गंभीर इशारा देण्यात आला आहे. यानुसार आगामी काळात पाकिस्तान आणि चीनकडून भारताला धोका निर्माण होण्याची शक्यता असून त्या पार्श्वभूमीवर भारताकडून त्याचा आक्रमकपणे प्रतिकार केला जाऊ शकतो.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.