आज दि.२२ फेब्रुवारी च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

रशियाची पूर्व युक्रेनच्या दोन प्रातांना
स्वायत्त देशाची मान्यता; महायुद्धाची शक्यता गडद

रशिया आणि युक्रेनच्या दरम्यान वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष Vladimir Putin ने पूर्व युक्रेनमधून वेगळे झालेल्या दोन प्रातांत स्वतंत्र देशाची मान्यता दिली आहे. तसेच युक्रेनने म्हटलं आहे की, तो कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही तसेच घाबरणार देखील नाही. युक्रेनशी असलेल्या तणावादरम्यान रशियानं मोठं पाऊल उचलंय, ज्यामुळे आता हा वाद गंभीर स्वरूप घेऊ शकतो अशी शक्यता आहे. युक्रेनपासून वेगळे झालेले देश म्हणजे डोनेत्स्क (Donetsk) आणि लुहांस्क (Luhansk) होय. पुतीन यांनी आपल्या संबोधनात युक्रेन आणि अमेरिकेवर टीका करताना, युक्रेन अमेरिकेच्या हातातली बाहुली झाल्याचा आरोप केला आहे.

मुंबई स्टॉक एक्स्चेंजचा निर्देशांक
1200 अंकानी घसरला

रशिया आणि युक्रेनमधील वादाच्या पार्श्वभूमीवर जागातील शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण नोंदवली गेली आहे. त्याचा परिणाम भारतीय बाजारांवरही दिसून येत आहे. मंगळवारी बाजार उघडताच मुंबई स्टॉक एक्स्चेंजचा निर्देशांक 1200 अंकानी घसरला तर, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निर्देशांक 265 अंकांनी घसरला होता. रशियाने युक्रेनच्या दोन प्रांतांना स्वायत्त देशांची मान्यता दिल्याने तणाव वाढला आहे. याचाच परिणाम म्हणून अमेरिका रशिया आणि पूर्व युक्रेनपासून वेगळ्या झालेल्या देशांवर कारवाई करू शकते.

ओबीसी आरक्षण फैसला
२५ फेब्रुवारीला होणार

राज्यातील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून बराच खल सध्या सुरू असताना आता थेट सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाचा फैसला होणार आहे. येत्या २५ फेब्रुवारी रोजी ओबीसी समाजासाठी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून त्यावर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भवितव्य अवलंबून असेल. ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न घेण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली होती. त्यामुळे २५ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल मान्य केला, तर राज्यात ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल.

मध्य प्रदेशमधील दोन शहरांमध्ये
मद्य आणि मांस विक्री बंद

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्यातील दोन शहरांना पवित्र शहरं म्हणून घोषित केले आहेत. या दोन शहरांमध्ये मद्य आणि मांस विक्री होणार नाही. यामध्ये जैन तीर्थक्षेत्र कुंडलपूरसह बांदकपूरचा समावेश आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळपासून २८५ किमी अंतरावर असलेल्या दामोह जिल्ह्यात असलेल्या कुंडलपूरमध्ये जैन समाजाच्या पंचकल्याणक उत्सवात सहभागी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान सहभागी झाले. यावेळी पवित्र शहरांची घोषणा केली.

एसटीचे नुकसान कामगारांकडून
वसूल करण्याचा निर्णय नाही

एसटी संपामुळे महामंडळाचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान होत आहे. मात्र, हे नुकसान कर्तव्यावर रूजू झालेल्या कामगारांकडून वसूल करण्याचा कोणताही निर्णय महामंडळाने घेतलेला नाही, असे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी स्पष्ट केले. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ हा संप सुरु आहे

पुण्यात काँग्रेसच्या ओबीसी
सेल मोर्चात तुफान राडा

ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसच्या ओबीसी सेलने पुण्यात आज मोर्चा काढला. मात्र या मोर्चादरम्यान तुफान राडा झाल्याचे पाहायला मिळाले. मोर्चाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून सुरुवात झाली. मात्र मोर्चा सुरू होताच समता परिषदेचे मृणाल ढोले यांनी मोर्चाला काळे झेंडे दाखवले आणि घोषणा दिल्या. त्यामुळे मोठा गोंधळ झाला आणि राडा पाहायला मिळाला. यावेळी संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मृणाल ढोले यांना मारहाण केली.

परमबीर सिंग यांची चौकशी
९ मार्चपर्यंत थांबवण्याचे निर्देश

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. येत्या ९ मार्चपर्यंत परमबीर सिंग यांच्याविरोधातील चौकशी थांबवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. परमबीर सिंग आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा सहभाग असल्याचा आरोप असणाऱ्या आर्थिक घोटाळ्याचं प्रकरण म्हणजे बरीच गोंधळाची बाब असल्याचं देखील न्यायालयानं यावेळी नमूद केलं. तसेच, परमबीर सिंग यांच्याविरोधातील सर्व प्रकरणांचा तपास सीबीआयकडे हस्तांतरीत करायचा किंवा नाही, याविषयी देखील निर्णय देणार असल्याचं न्यायालयानं यावेळी नमूद केलं.

जे हिंदू मला मत देणार नाहीत, त्यांच्या
नसात मुस्लिमांचे रक्त : राघवेंद्र प्रताप

जे हिंदू मला मत देणार नाहीत, त्यांच्या नसात मुस्लिमांचे रक्त आहे, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपाचे आमदार राघवेंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे. राघवेंद्र सिंह हे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवत आहेत. एका प्रचारसभेत त्यांनी केलेल्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यासंदर्भात बोलताना सिंह म्हणाले की, “मी पाच दिवसांपूर्वी हे वक्तव्य केलं होतं. परंतु ते दुसऱ्या संदर्भात होतं आणि कोणालाही धमकावण्याचा माझा हेतू नव्हता.

पेगासस स्पायवेअर हेरगिरी
प्रकरणात समितीचा अहवाल सादर

देशभर खळबळ उडवून दिलेल्या पेगासस स्पायवेअर हेरगिरी प्रकरणात समितीने आपला अंतरिम अहवाल सादर केला आहे. सर्वोच्च न्यायालया (Supreme Court) ने ही समिती नेमली असून हेरगिरीच्या तपासासाठी समितीने आणखी वेळ मागितला आहे. न्यायालय या अहवालावर 23 फेब्रुवारी होणार्‍या सुनावणीवेळी विचार करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अहवालात समितीने आतापर्यंतच्या तपासातील कोणकोणते निष्कर्ष नोंदवले आहेत, त्याचा अजून उलगडा झालेला नाही.

1 मार्चपासून शाळा पूर्ण वेळ
सुरू होण्याची शक्यता

1 मार्चपासून शाळा पूर्ण वेळ सुरू होण्याची शक्यता आहे. कोरोना रूग्णसंख्या कमी होऊ लागल्यामुळे शाळा पूर्णवेळ आणि पूर्ण क्षमतेने सुरू करा, अशी मागणी पालकांकडून होत आहे. याबाबत आता प्रशासनाने चाचपणी सुरू केली आहे.

SD social media
9850 60 35 90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.