मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपण मंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. उद्धव ठाकरे यांनी काल रात्री नऊ वाजता महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. परिवहन मंत्री अनिल परब यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा राजीनामा राज्यपालांकडे सादर केला. राज्यपालांनी लगेच तो राजीनामा मंजूरही केला. यानंतर राज्यपालांकडून उद्धव ठाकरेंना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पाहण्याची विनंती करण्यात आली. त्याबाबतचं पत्र देण्यासाठी राज्यपालांकडून मुख्यमंत्र्यांना राजभवनावर येण्याचं निमंत्रण देण्यात आलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री राजभवनावर दाखल झाले.
मुख्यमंत्री राजभवनावर दाखल झाले त्यावेळी शेकडो शिवसैनिकांनी राजभवनाबाहेर गर्दी केली. मुख्यमंत्र्यांसोबत आणखी काही मंत्रीदेखील राजभवनावर गेले होते. मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवून राजभवनावर गेले होते. मुख्यमंत्री राजभवनावर दाखल झाल्यानंतर त्यांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर ते पुन्हा ‘मातोश्री’च्या दिशेला रवाना झाले.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारला आपलं बहुमत सिद्ध करण्यासाठी आज संध्याकाळपर्यंतचा वेळ होता. कारण राज्यपालांनी दिलेल्या आदेशानुसार महाविकास आघाडीला गुरुवारी विशेष अधिवेशनात बहुमत सिद्ध करण्याची संधी होती. पण त्याआधीच मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी फ्लोर टेस्टआधी राजीनामा का दिला? असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देताना केलेल्या भाषणात आपलीच माणसं आपल्याविरोधात मत देताना बघायचं नाहीय, असं सांगितलं आहे. पण तरीही मुख्यमंत्र्यांनी फ्लोर टेस्टआधी राजीनामा देण्यामागे काही महत्त्वाचे कारणे आहेत.
विशेष म्हणजे महाराष्ट्रात आज ज्या घटना घडल्या अगदी तशा काही घटना 1996 मध्ये देशात वाजपेयी सरकार असताना घडल्या होत्या. अटल बिहारी वाजपेयी यांनी 1996 मध्ये सभागृहात विश्वासदर्शक ठरावावर भाषण केल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. विरोधकांनी एनडीएविरोधात लोकसभेच अविश्वासाचा ठराव मांडला होता. त्यानंतर अवघ्या एका मतासाठी वाजपेयी सरकार कोसळलं होतं. त्यावेळी वाजपेयी यांच्यावर सभागृहात विरोधकांनी टीका केली होती. अनेक प्रश्न उपस्थित केले होते. वाजपेयी यांनी त्यांच्या प्रश्नांना उत्तरेदेखील दिली होती. सभागृहात काय-काय घडलं होतं त्याबाबतच्या चर्चा आजही रंगतात.
दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता सत्ता स्थापनेचा चेंडू हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गोटात येवून पडला आहे. शिवसेनेच्या 39 बंडखोर आमदारांच्या जोरावर फडणवीस नवीन सरकार स्थापन करु शकतात. अर्थात तसं होण्याची शक्यता आहे. पण शिवसेनेच्या या बंडखोर आमदारांचं मन पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या दिशेला वळले तर फडणवीसांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न हे स्वप्नच राहू शकतं. पण त्याची शक्यता कमी आहे. कारण बंडखोरांचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे.