राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी पुण्यामधील पत्रकार परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे गुजरातचे असल्याने गुजरातमधील गुंतवणूक वाढत राहणार असं विधान केलं. ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकल्प तळेगावऐवजी गुजरातला गेल्याच्या मुद्द्यावरुन पवारांनी ही टीका केल्यानंतर भाजपाने यावरुन प्रत्युत्तर देत पवारांवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र भाजपाच्या ट्विटर हॅण्डलवरुन पवारांनी मोदींवर केलेल्या टीकेला उत्तर देण्यात आलं आहे.
शरद पवार यांनी गुरुवारी ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकल्प पुन्हा राज्यात आणण्यासाठी मोदी मदत करणार असल्याच्या चर्चांवर भाष्य केलं. “पंतप्रधानांशी या प्रकरणात मदत करणार असल्याची माहिती मिळाली. ही आनंदाची गोष्ट आहे. पण या प्रकल्पासारखा मोठा प्रकल्प आम्ही महाराष्ट्राला देऊ, हे लहान मुलाची समजूत काढावी असे आहे. त्याच्यात महाराष्ट्राची काही प्रतिष्ठा नाही. त्यामुळे यावर चर्चा न केलेली बरी,” असं पवार म्हणाले. पुढे पवार यांनी, “साधारणत: केंद्रात पक्ष सत्तेत असल्याचे परिणाम काही राज्यांना अनुकूल होत असतात. त्यामध्ये गुजरातला लाभ मिळाला असेल तर आपण तक्रार करण्याचे कारण नाही,” असंही म्हटलं.
“पंतप्रधान मोदी, अमित शाह तिथे आहेत. ज्यांच्या हातात देशाची सूत्रं आहेत त्यांनी थोडेबहुत लक्ष जर गुजरातकडे दिले तर आपण समजू शकतो. मोदी साहेबांचे दौरे पाहिले तर जास्तीत जास्त ते कोणत्या राज्यात जातात हे आपण पाहतो. साहजिकच कोणत्याही माणसाला घरची ओढ असते,” असा टोलाही पवार यांनी मोदींना लगावला. पवार यांच्या भाषणातील मुद्दे त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आलेले. त्यापैकी मोदी आणि शाह यांना घरची ओढ आहे या टीकेच्या ट्वीटला भाजपाने उत्तर दिलं आहे. “ज्यांचं अवघं आयुष्य बारामती शहराच्या अवतीभवती फिरत आलं आहे, त्यांच्या तोंडून असली भाषा शोभून दिसत नाही,” असा टोला महाराष्ट्र भाजपाने लगावला आहे.
दरम्यान शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये वेदान्त समुहाबद्दलही भाष्य केलं. “तळेगाव या भागातील चाकण, रांजणगाव हा परिसर ऑटोमोबाईलच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. मी जेव्हा सरकारमध्ये होतो तेव्हा हा परिसर ऑटोमोबाईलचा कॉरीडोर करण्याची संकल्पना होती. सुदैवाने देशातील चांगल्या कंपन्या तिथे आल्या व हा महत्त्वाचा भाग झाला. त्यामुळे इथे प्रकल्प आला असता तर त्या कंपन्यांना अधिक सोयीचे झाले असते. वेदान्त कंपनीचे मालक अनिल अग्रवाल यांनी या संबंधीचा निर्णय घेतला, तो त्यांचा अधिकार आहे. एक अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प रत्नागिरीलाही करायचा निर्णय झाला होता. तो प्रोजेक्टही वेदान्त ग्रुपचा होता. स्थानिक विरोधामुळे तो प्रोजेक्ट चेन्नईला नेण्यात आला. ही जुनी गोष्ट आहे, त्यामुळे वेदान्त कंपनीकडून ही पहिलीच गोष्ट झाली असे नाही. त्यामुळे वेदान्तचा प्रकल्प येत असेल तर तो शेवटपर्यंत येईल की नाही याची खात्री निदान मला तरी देता येत नाही,” असं पवार म्हणाले.