आज दि.१३ आॕगस्ट च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

राज्यपालांना बारा सदस्यांचा प्रस्ताव
प्रलंबित ठेवता येणार नाही : न्यायालय

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या मुद्द्यावर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या सुनावणीदरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्यपालांना आदेश देता येणार नाहीत असं स्पष्ट करतानाच राज्यपालांना देखील मंत्रिमंडळाचा प्रस्ताव अनिश्चित काळासाठी प्रलंबित ठेवता येणार नसल्याची महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. त्यामुळे आता न्यायालयाच्या या निर्णयानंतर राज्यपाल काय भूमिका घेतात, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे सत्ताधाऱ्यांनी पुन्हा एकदा राज्यपालांच्या भूमिकेविषयी मुद्दा उपस्थित केला असताना विरोधकांनी मात्र राज्यपालांना आदेश देता येणार नाहीत, या न्यायालयाच्या भूमिकेवरून बाजू लावून धरली आहे.

डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण करणे
अशक्य : सायरस पूनावाला

भारतामध्ये करोना प्रतिबंधक लसीकरणासाठी सर्वात आधी परवानगी मिळालेल्या पुण्यातील ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे अध्यक्ष सायरस पूनावाला यांनी डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण होण्याची शक्यता फेटाळली आहे. डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण होण्याबाबत राजकारणी थापा मारत आहेत, असा टोला पूनावाला यांनी लगावला आहे. पुण्यामध्ये एका कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केलं. सध्या चर्चेत असणाऱ्या लसींचं कॉकटेल करणं चुकीचं असल्याचं मतही पूनावाला यांनी व्यक्त केलं आहे.

आयुर्वेदतज्ज्ञ बालाजी तांबे यांचे
निधन करोना संसर्गाने

आयुर्वेदतज्ज्ञ बालाजी तांबे यांचे निधन करोना संसर्गाने झाले असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बरी नसल्याने त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. १० ऑगस्टला त्यांचे निधन झाले. मात्र, तांबे यांना करोनाचा संसर्ग नव्हता, असा दावा त्यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे.

महापूरामुळे प्रचंड नुकसान,
उत्तर प्रदेशात हाहाकार

महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तराखंड नंतर आता उत्तर प्रदेशात महापूरामुळे हाहाकार उडाला आहे. गेल्या आठवडाभरापासून राज्यात महापुरामुळे प्रचंड नुकसान झाले असून गंगा-यमुना धोक्याच्या बाहेर वाहत आहेत. सुमारे चोवीस जिल्ह्यातील हजारो गावांना या पुराचा तडाखा बसला असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.

लाच प्रकरणातील
वैशाली झनकरला अटक सुटका

तब्बल ८ लाख रुपयांची लाच घेतल्या – प्रकरणी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर-झनकरला शुक्रवारी न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. उद्या परत त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. मंगळवारी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात सापडल्यानंतर त्या दोन दिवसापासून फरार होत्या. पण, आज पोलिसांनी त्यांना अटक केल्यानंतर न्यायालयासमोर उभे केले. न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

अमेरिकेचे सैन्य माघारी फिरताच
अफगाणिस्तानमध्ये तालिबानी राज

अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याच्या माघारी परतल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानच्या दुसऱ्या सर्वात मोठ्या शहरावर ताबा मिळवला आहे. अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या रक्तरंजित संघर्षादरम्यान तालिबानने शुक्रवारी अफगाणिस्तानचे दुसरे मोठे शहर कंदाहार ताब्यात घेतले. तालिबानने शुक्रवारी दावा केला की त्यांनी आणखी एक प्रांतीय राजधानी कंदाहार ताब्यात घेतले आहे. आता फक्त राजधानी काबूल शिल्लक आहे. काबुलनंतर कंदाहार हे अफगाणिस्तानमधील दुसरे मोठे शहर आहे.

हॅकर्सनी चोरल्या सुमारे
४,५०० कोटीं क्रिप्टोकरन्सी

४,५०० कोटींहून अधिक चोरी झालेल्या क्रिप्टोकरन्सीपैकी हॅकर्सने सुमारे १,९३० कोटी क्रिप्टोकरन्सी परत केल्या आहेत. परंतु पॉलीनेटवर्कनुसार, 269 दशलक्ष इथेरियम आणि 84 दशलक्ष पॉलीगॉन परत केलेले नाहीत. कंपनीने एकामागून एक ट्विट करून ही माहिती देताना सांगितले आहे की, हॅकर्सनी काही टोकन देखील परत केले आहेत. क्रिप्टोकरन्सीच्या इतिहासातील ही सर्वात मोठी चोरी असल्याचे मानले जाते. या हॅकिंगमध्ये बहुतेक करून इथेरियम आहे.

शाळा सुरू करण्याच्या
निर्णयाला स्थगिती

राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत टास्क फोर्सच्या सदस्यांनी लगेच शाळा सुरू करण्याला विरोध दर्शवला होता. शालेय शिक्षण विभागाने 17 ऑगस्टपासून शाळा करण्याचा निर्णय घेतला असला तरी मंत्रिमंडळ बैठकीत मात्र टास्क फोर्सशी सल्लामसलत करून शाळेबाबतचा निर्णय घेण्याचे ठरले होते. टास्कफोर्सच्या सदस्यांनी शाळा सुरू करण्याला विरोध दर्शवला. सरकारने शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

रेल्वेच्या तिकीटांवर सूट देण्याचा
मंत्रालयाचा विचार नाही

कोरोनाकाळात रेल्वे तिकीटांच्या दरात वाढ झाली आहे. हे दर कमी होतील, अशी आशा सामान्य नागरिकांना आहे. मात्र, इंधनाच्या दरांप्रमाणे याठिकाणीही सामान्य लोकांचा भ्रमनिरास होण्याची शक्यता अधिक आहे. कारण केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेला दिलेल्या लिखीत स्पष्टीकरणातून तसे संकेत मिळत आहेत. अश्विनी वैष्णव यांनी पत्राद्वारे राज्यसभेला दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेच्या तिकीटांवर कोणतीही सूट देण्याचा मंत्रालयाचा विचार नाही.

नाशिक ऑक्सिजन गळतीचा
ठपका ठेकेदार कंपनीवर

21 एप्रिल रोजी नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये झालेल्या ऑक्सिजन गळतीमुळे 24 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. या गळती प्रकरणाचा ठपका ठेकेदार कंपनीवर ठेवण्यात आला आहे. निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आलाय. महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाला क्लिनचिट देण्यात आली आहे. पुण्यातील ताईवो निपॉन आणि नाशिकच्या जाधव ट्रेडर्सला दंड ठोठावण्यात आला आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना सप्टेंबरमध्ये
मिळणार वाढीव पगार

केंद्रीय कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्यात चांगली बातमी मिळू शकते. कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. महागाई भत्ता आधीच 28 टक्क्यांनी वाढवला गेला आहे. जून 2021 साठी महागाई भत्ता जाहीर केला जाणार आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे महागाई भत्त्याचे तीन सहामाही हप्ते जुलै 2021 पर्यंत स्थगित ठेवण्यात आले होते. 14 जुलै रोजीच डीए 11 टक्क्यांनी वाढवून 28 टक्के करण्यात आला आहे. जूनमधील वाढीबाबत निर्णय बाकी आहे.

मुंबईत डेल्टा प्लसचा
पहिला बळी

राज्यात डेल्टा प्लसच्या रूग्णांमध्ये वाढ होताना दिसतेय. अशातच मुंबईत डेल्टा प्लसचा पहिला बळी गेला आहे. डेल्टा प्लसचा बळी गेल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. एका 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. मुख्य म्हणजे या महिलेने कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले होते. त्यानंतर तिला कोरोनाच्या डेल्टा प्लस वेरिएंटची लागण झाली आणि त्यात महिलेचा बळी गेला आहे.

मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर
फेकल्या पेट्रोलच्या बाटल्या

भारतीय 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या स्वागताच्या तयारीत आहेत. अशावेळी 15 ऑगस्ट रोजी दिल्लीपासून ते जम्मू-काश्मीरपर्यंत अलर्ट जारी करण्यात आला आहे. एवढंच नाही तर गुप्तचर संघटनांना देखील सतर्क राहण्यासाठी सांगण्यात आलं आहे. मुंबई विमानतळाच्या धावपट्टीच्या दिशेने अज्ञातांकडून पेट्रोलच्या बाटल्या फेकल्याची घटना उघडकीस आली आहे. सुरक्षा यंत्रणा सावध झाली आहे. रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली आहे. यानंतर बॉम्बशोधक टीमने परिसराची झडती घेत बंदोबस्त वाढवला आहे.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.