रक्तदान, नेत्रदानाप्रमाणे अवयव दानदेखील काळाची गरज बनली आहे. यामुळे अनेक रुग्णांना फायदा होऊ शकतो. ही गोष्ट लक्षात घेत अनेक लोक अवयवदानासाठी पुढाकार घेत आहेत. नुकतेच एका स्पॅनिश महिलेमुळे पाच रुग्णांचा जीव वाचला आहे. ब्रेन डेड झालेल्या या महिलेचे अवयव तिच्या कुटुंबियांच्या संमतीने दान करण्यात आले. यामुळे चार भारतीय आणि एका लेबानानी नागरिकाचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. `टीव्ही नाइन हिंदी`ने या विषयीची माहिती दिली आहे.
मुंबईत एका मृत स्पॅनिश महिलेमुळे पाच रुग्णांचा जीव वाचला आहे. येथील जसलोक रुग्णालयात या महिलेवर उपचार सुरू होते. पण या महिलेला डॉक्टरांनी ‘ब्रेन डेड’ घोषित केलं. महिलेच्या कुटुंबीयांच्या संमतीनं तिचे अवयव दान करण्यात आले. त्यामुळे चार भारतीय आणि एक लेबनानी नागरिकाचे प्राण वाचले आहेत. 67 वर्षांची टेरेसा मारिया फर्नांडिस ही स्पॅनिश महिला भारताच्या दौऱ्यावर आली होती. मुंबईत 5 जानेवारीला तिला हेमोरिजिक स्ट्रोक आला होता. त्यामुळे या महिलेला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या महिलेच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याने तिला ‘ब्रेन डेड’ घोषित करण्यात आलं, असं जसलोक रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.
रिजनल कम स्टेट ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशनने दिलेल्या माहितीनुसार, टेरेसा फर्नांडिस यांचे फुफ्फुस, यकृत आणि मूत्रपिंड भारतीय रुग्णांना तर हृदय लेबनानी नागरिकाला दान करण्यात आलं. या महिलेची हाडंदेखील दान करण्यात आली आहेत. या महिलेचं लिव्हर मुंबईतील 54 वर्षाच्या डॉक्टरांच्या शरीरात प्रत्यारोपित करण्यात आलं आहे, त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. त्यांना 2019 पासून हृदयविकार आहे. नानावटी रुग्णालयातील हिपॅटोलॉजी आणि ट्रान्सप्लांट मेडिसीन विभागाचे संचालक डॉ. चेतन कलाल यांनी प्रत्यारोपण केलं.
दरम्यान, या महिलेला स्ट्रोकवरील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिचे कुटुंबीय मुंबईत दाखल झाले. या महिलेची मुलगी वैद्यकीय व्यावसायिक आहे. “माझ्या आईला अवयव दान करण्याची इच्छा होती. कुटुंबियांनी ही इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला,“ असं तिच्या मुलीनं सांगितलं.
जसलोक रुग्णालयातील डॉ. आंबेडकर यांनी सांगितले, “या स्पॅनिश महिलेच्या कुटुंबाकडून लोकांनी धडा घेतला पाहिजे. जिने बिनदिक्कत आपले अवयव दान केले आहेत, तेही दुसऱ्या देशात आणि अनोळखी व्यक्तींना. आमचं त्यांच्याशी अवयव दानाविषयी बोलणं झालं नव्हतं. त्यांनी स्वतःहून यासाठी होकार दिला. मानवतेला भौगोलिक सीमा रोखू शकत नाहीत, हे त्यांनी दाखवून दिलं.“