राज्यातील संरक्षित स्मारकांचे १० वर्षांसाठी आता संस्थांना पालकत्व, राज्य शासनाकडून ‘महाराष्ट्र वैभव’ योजनेत सुधारणा
राज्यातील प्राचीन स्मारके, किल्ले, लेणी, शिलालेख, पारंपरिक कला अशा वारशाच्या जपणुकीसाठीची ‘महाराष्ट्र वैभव – राज्य संरक्षित स्मारक योजना’ सुधारित करण्यात आली आहे. त्यानुसार या योजनेत संरक्षित स्मारकांच्या संगोपनासाठी केवळ संस्थांना मुभा असेल, संरक्षित स्मारकांचे पालकत्व १० वर्षांसाठी घेता येईल, संरक्षित स्मारकाच्या परिसरात सुविधा आणि प्रकाश-ध्वनी कार्यक्रम, प्रदर्शन अशा उपक्रमांचे आयोजन पुरातत्त्व विभागाच्या परवानगीने करावे लागतील, असे बदल करण्यात आले आहेत.
दिल्लीला रवाना होण्यापूर्वी अजित पवार आणि शरद पवारांची भेट
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यामुळे पक्षाचे दोन गट झाले आहेत. पक्ष फूटीनंतर दोन्ही गट सातत्याने आमने-सामने येत आहेत. दोन्ही गटांमधील नेते एकमेकांवर टीका करत आहेत. तसेच अजित पवार गटातील नेत्यांनी थेट अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केलं होतं. दोन्ही गटात तणाव निर्माण झालेला असताना राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील (अजित पवार गट) यांनी शुक्रवारी (१० नोव्हेंबर) शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर वेगवेगळ्या राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या भेटीवेळी खासदार सुप्रिया सुळेदेखील उपस्थित होत्या. शरद पवारांचे बंधू आणि उद्योगपती प्रतापराव पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी शरद पवार आणि अजित पवारांची भेट झाली.
सोलापुरात साखर कारखान्यांमध्ये ऊसदरासाठी चढाओढ
उच्चांकी साखर उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात यंदा पावसाळ्याने निराशा केल्यामुळे ओढावलेल्या दुष्काळी परिस्थितीत ऊस उत्पादन घटण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांकडून ऊस पळवापळवीसह ऊसदर देण्यात चढाओढ सुरू झाली आहे. सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याने सर्वप्रथम उसाचा जास्त दर देण्याचे जाहीर करताच इतर कारखानेही जादा दर देण्यासाठी पुढे सरसावत आहेत. यंदाच्या गळीत हंगामात जिल्ह्यात ४१ पैकी ३८ साखर कारखान्यांनी धुराडे पेटवून गळीत हंगाम सुरू केला आहे. यंदा जिल्ह्यात दोन लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रात ऊस लागवड झाल्याची नोंद आहे. परंतु दुष्काळजन्य परिस्थितीत पाण्याअभावी सुमारे ३० हजार हेक्टर क्षेत्राएवढे उसाचे उत्पादन घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
राज्यावरील अवकाळी पावसाचे संकट कायम
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, अवकाळी पावसाचे हे संकट आणखी चार दिवस कायम राहील, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
“मोदी दिवसातून दोनदा लाखो रुपयांचे सूट बदलतात”, राहुल गांधींची टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पेहराव नेहमीच चर्चेचा विषय असतो. ज्या प्रांतात ते जातात तेथील ते पेहराव परिधान करतात. तर, नियमित शासकीय कामांसाठीही त्यांचे ठराविक सूट असतात. दिवसभरातील विविध कार्यक्रमात ते कधीकधी वेगवेगळे कपडेही घालतात. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टीका केली आहे. ते मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील प्रचारादरम्यान बोलत होते.
मध्य प्रदेशात १७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. यामुळे निवडणूक प्रचाराला वेग आला आहे. मोदींच्या आणि राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली जातेय.
Hero मोटोकॉर्पचे चेअरमन पवन मुंजाल यांच्यावर ईडीची मोठी कारवाई, २५ कोटींची संपती जप्त
ईडी अर्थात सक्तवसुली संचलनालयाने हिरो मोटोकॉर्पचे अध्यक्ष पवन कांत मुंजाल यांच्यावर कारवाई केली आहे. हिरो मोटोकॉर्प लिमिटेडचे सीएमडी आणि अध्यक्ष पवनकांत मुंजाल यांच्या २४.९५ कोटी रुपयांच्या तीन स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. मनी लाँडरींग प्रतिबंधात्मक कायदा २००२ ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर हिरो मोटोकॉर्पच्या शेअर्समध्ये घसरण सुरु झाली आहे.
“राज्यपाल आगीशी खेळतायत, हे फार गंभीर आहे”; सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं
गेल्या काही महिन्यांपासून देशभरातील सरकारांविरोधात दाखल झालेल्या प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने ठाम भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं आहे. मग ते महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण असो किंवा दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाचा मुद्दा असो. यामुळे न्यायपालिका व कायदेमंडळ यांच्या अधिकारक्षेत्राचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने पंजाबच्या राज्यपालांना परखड शब्दांत सुनावलं आहे. पंजाब सरकार विरुद्ध राज्यपाल या प्रकरणात न्यायालयाने राज्यपालांच्या कार्यपद्धतीवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत.
मानवजातीला हाय अलर्ट! गेले १२ महिने ठरला पृथ्वीच्या इतिहासातील सर्वात उष्ण नोंद झालेला काळ
गेल्या अनेक वर्षांपासून जागतिक तापमानवाढीवर निरनिराळ्या स्तरातून चिंता व्यक्त केली जात आहे. संयुक्त राष्ट्रांपासून अनेक आंतरराष्ट्रीय संघटना, देशोदेशीच्या पर्यावरणप्रेम संघटना व पर्यावरणतज्ज्ञ यावर सातत्याने भूमिका मांडत आहेत. मात्र, तरीही जागतिक पातळीवर पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार अत्यंत कमी लोकसंख्येकडून करण्यात आला आहे. त्यामुळे जागतिक तापमानवाढीचे चटके वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात बसू लागले आहेत. आता यासंदर्भात अवघ्या मानवजातीला धोक्याची घंटा ठरणारा एक अहवाल समोर आला असून त्यानुसार गेले १२ महिने हे पृथ्वीतलावर नोंद करण्यात आलेले सर्वात उष्ण १२ महिने होते!
लोकप्रिय के-पॉप गायिकेचं २४ व्या वर्षी निधन, मृत्यूचं कारण अस्पष्ट
लोकप्रिय के-पॉप गायिका व गीतकार किम नही हिचे निधन झाले आहे. तिच्या आकस्मिक मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. निधन दोन दिवसांपूर्वी ८ नोव्हेंबर रोजी झालं. स्थानिक अधिकारी सध्या तिच्या मृत्यूच्या कारणाचा तपास करत आहेत.
विविध कोरियन न्यूज पोर्टल्सनी दिलेल्या वृत्तानुसार नही हिचे अंत्यसंस्कार आज १० नोव्हेंबर रोजी केले जाईल. प्योंगटेक ग्योन्गी-डो येथील सेंट्रल फ्युनरल हॉलमध्ये तिला अखेरचा निरोप दिला जाईल. तिच्या मृत्यूची बातमी इंटरनेटवर व्हायरल झाल्यामुळे चाहते शोक व्यक्त करत आहेत. तिचा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चाहते श्रद्धांजली वाहत आहेत. ‘वियॉन न्यूज’ने याबद्दल वृत्त दिलंय.
SD Social Media
9850603590