आयसीआयसीआय बँक कर्ज गैरव्यवहारप्रकरणी व्हिडीओकॉन समूहाचे सर्वेसर्वा वेणूगोपाळ धूत यांना झालेली अटक अनावश्यक असल्याचा दावा त्यांच्या वतीने शुक्रवारी उच्च न्यायालयात करण्यात आला. तर, धूत हे चौकशीला टाळटाळ करीत असल्याने त्यांना अटक केल्याचा दावा ‘सीबीआय’ने केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अटकेला आव्हान देणाऱ्या धूत यांच्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला.
धूत यांनी अटक आणि त्यानंतर सुनावण्यात आलेली सीबीआय कोठडीला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तसेच अंतरिम जामिनावर सुटका करण्याची मागणी केली आहे. न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने याचिकेवरील निर्णय राखून ठेवला. तत्पूर्वी, डिसेंबर २०१७ मध्ये प्राथमिक तक्रार नोंदवण्यात आल्यापासून धूत हे ३१ वेळा सीबीआयसमोर हजर झाल्याचा दावा त्यांचे वकील संदीप लढ्ढा यांनी केला. आरोपपत्र दाखल करण्यात आल्यानंतरही धूत न्यायालयात हजर झाले होते. त्यामुळे आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी दाखल प्रकरणात धूत यांना विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला, असेही लढ्ढा यांनी सांगितले. धूत यांनी डिसेंबर महिन्यात दोन वेळा तपास यंत्रणेसमोर उपस्थिती लावली होती. परंतु अंमलबजावणी संचालनालयाने आधीच समन्स बजावल्याने २३ आणि २५ डिसेंबर रोजी ते सीबीआयसमोर उपस्थित राहू शकले नाहीत. सीबीआयने त्यांना २५ डिसेंबर रोजी नोटीस बजावली आणि दुसऱ्याच दिवशी अटक केली. २३ आणि २५ डिसेंबर रोजी ते तपास यंत्रणेसमोर उपस्थित राहू शकले नाहीत, याला असहकार्य म्हणता येणार नाही, असा दावाही लढ्ढा यांनी केला.