तिसऱ्या लाटेतही उद्योग सुरु ठेवा : मुख्यमंत्र्यांचे निर्देश

राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील मोठ्या उद्योगपतींची बैठक घेऊन त्यांना संभाव्य तिसऱ्या लाटेत उद्योग सुरु ठेवण्याच्या दृष्टीने करावयाच्या तयारीसंदर्भात मार्गदर्शन करावे, ज्या उद्योजकांना त्यांच्या उद्योगाच्या आवारात कामगारांची राहण्याची व्यवस्था करणे शक्य आहे, तिथे त्यांनी त्याचे वेळीच नियोजन करावे व ज्या उद्योजकांना ते शक्य नाही त्यांनी कंपनीच्या आसपासच्या परिसरात अशी जागा शोधून कामगारांची तिथे राहण्याची (फिल्ड रेसिंडन्स) व्यवस्था करावी, त्यादृष्टीने त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक असलेले सहकार्य करावे, अशा सूचना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व विभागीय आयुक्त, महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस अधिकाऱ्यांशी दूरदृष्यप्रणालीद्वारे चर्चा करून कोरोना स्थितीचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, कोरोनासाठी स्थापन करण्यात आलेल्या टास्कफोर्सचे पदाधिकारी, बाल टास्कफोर्सचे पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

कोरोनाच्या दोन लाटेंमधील हा काळ हा संयम आणि शिस्तीसाठी महत्त्वाचा आहे. या काळात कोरोनाची रुग्ण संख्या कमी होऊन आपण काही प्रमाणात आर्थिक व्यवहार सुरु करत असलो तरी अतिशय सावधगिरीने पुढे जाण्याची गरज आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, उद्योग आणि आर्थिक चळवळ सुरु राहण्यासाठी कामगारांचे येणे जाणे हे त्यांच्या कामाचे ठिकाण आणि घर इथपर्यंतच मर्यादित राहणे गरजेचे आहे.

कोरोनाची दुसरी लाट अद्याप पुर्णत्वाने ओसरलेली नाही. परंतू याही स्थितीत कॅलक्युलेटेड रिस्क घेऊन आपण हळुवारपणे काही आर्थिक उपक्रम सुरु करत आहोत. हे करताना सावधगिरीची पाऊले म्हणून जे निर्बंध लावण्यात आलेले आहेत, ते कागदावर राहणार नाहीत, ते काटेकोरपणे अंमलात येतील, कुठेही गर्दी होणार नाही, सभा समारंभ होणार नाहीत, याची दक्षता घेण्याच्या सुचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

आता पावसाळा आहे, या काळात साथीचे इतर आजार उद्भवतात त्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. याच काळात आपले सण समारंभ ही सुरु होतात. ही सगळी परिस्थिती अतिशय काळजीपूर्वक हाताळण्याची गरज असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी जिल्हानिहाय ऑक्सीजनच्या तयारीचाही आढावा घेतला त्यांनी ऑक्सीजन निर्मिती, ऑक्सीजन साठा आणि रुग्णसंख्या वाढल्यास करावयाची पूर्वतयारी यासर्वच प्रक्रियेला वेग देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या.

आशा – अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत गावागावात जनजागृती करून कोराना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेले सर्वजण दुसरा डोस वेळेत घेतील यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे, अशी सूचना देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, लसीचे दोन्ही डोस घेऊन कोरानाबाधित होणाऱ्यांची संख्या, त्याची स्थिती आणि कारणे याचे टास्कफोर्सने विश्लेषण करावे, ही माहिती संकलित करताना ती अनुभवजन्य राहील (लसीचा पहिला डोस घेतला होता की दोन्ही) याची काळजी घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.