अमावस्येमुळे मृतदेह रात्रभर पावसात घराबाहेर उघड्यावर; सोलापुरात अंधश्रध्देचा धक्कादायक प्रकार
दहा हजार गरीब महिला विडी कामगारांचा निवारा असलेल्या गोदूताई परूळेकर घरकूल वसाहतीत माणुसकीला कलंक लावणारा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. समाजात अजूनही अंधःश्रध्देचा पगडा किती घट्ट आहे, याचीही प्रचिती आली. आजारपणामुळे रात्री मृत्यू झालेल्या घर भाडेकरूचा मृतदेह केवळ अमावस्या असल्यामुळे घरी आणण्यास घरमालकाने मज्जाव केला. त्यामुळे मृतदेह घराबाहेर रात्रभर पाऊस झेलत उघड्यावर ठेवण्याची वेळ मृताच्या कुटुंबीयांवर ओढवली.शंकर यल्लप्पा मुटकिरी (वय ४९) या शिंपीकाम करणा-या कामगाराचा पक्ष्याघाताच्या आजारामुळे छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयात मृत्यू झाला असता मृतदेह रात्री गोदूताई परूळेकर विडी घरकूल वसाहतीत घराकडे आणण्याची तयारी सुरू झाली. परंतु घरमालकाने सोमवती अमावस्या असल्यामुळे मृतदेह घरी आणू दिला नाही. मृत शंकरची आई नागमणी वृध्द तर पाठचा भाऊ अनिल हा शारीतिकदृष्ट्या अपंग. अमावस्येचे कारण देऊन नातेवाईकांनीही पाठ फिरविलेली. त्यातच सुरू असलेली पावसाची रिपरीप. कोणाच्याही मदतीविना वृध्द आई आणि विकलांग भावाने शंकर याचा मृतदेह घराकडे आणला खरा; परंतु घरमालकाने अमावस्येचे कारण सांगून मृतदेह घरात ठेवण्यास पुन्हा मज्जाव केला. तेव्हा रात्रभर पावसाच्या सरी कोसळत असताना शंकरचा मृतदेह घरासमोर उघड्यावर ठेवण्यात आला. मृतदेह पावसात भिजू नये म्हणून कोणीतरी एका व्यक्तीने प्लास्टिकचा आवरण आणून दिले. तेवढीच दिसलेली माणुसकी. मृतदेह प्लास्टिकच्या आवरणात गुंडाळून रात्रभर उघड्यावर ठेवण्यात आल्याची वार्ता दुस-या दिवशी परिसरात पसरली आणि त्याची महिती छायाचित्रांसह समाज माध्यमांतून फैलावली. दरम्यान, गोदूताई परूळेकर विडी घरकूल परिसरातील माकपचे कार्यकर्ते वसीम मुल्ला, विल्यम ससणे व इतर कार्यकर्त्यांनी धाव घेऊन मृतदेहाचा अंत्यविधी उरकण्यास मदत केली.
राज्यात पावणेदोन लाख हेक्टर जंगल आगीत भस्मसात
राज्यातील जंगलांवर एकीकडे प्रकल्पांचे आक्रमण होत असतानाच दुसरीकडे वणव्यांमुळे जंगल मोठ्या प्रमाणात नाहीसे होत असल्याचे भारतीय वनसर्वेक्षणच्या अहवालातून समोर आले आहे. संपूर्ण राज्यात एक लाख ७० हजार ६६०.०८७ हेक्टर जंगल वणव्यात नाहीसे झाले.२०२१ हा करोनाकाळ असताना देखील राज्यात ६३ हजार ८४६ वणव्यांचे ‘अलर्ट’ आले.ज्यात सर्वाधिक अलर्ट गडचिरोली जिल्ह्यात आले. २०१८ ते २०२३ या कालावधीत याच जिल्ह्यात सर्वाधिक ११ हजार ५२७ वणव्याच्या घटना घडल्या. ज्यात ३३ हजार ८७०.४५३ हेक्टर जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. गडचिरोलीपाठोपाठ कोल्हापूर, ठाणे, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये वणव्याचे ‘अलर्ट’ आलेत. तर वणव्याच्या घटना या जिल्ह्यांसह अमरावती जिल्ह्यात नोंदवण्यात आल्या. २०१८ साली राज्यात वणव्याच्या ८,३९७ घटना घडल्या. ज्यात ४४,२१९.७३ हेक्टर जंगल जळाले. २०१९ साली ७,२८३ वणव्याच्या घटनांमध्ये ३६,००६.७२७ हेक्टर जंगल जळाले.
गुजरात उच्च न्यायालयाचा निर्णय ‘विकृत’; तीस्ता सेटलवाड यांना जामीन देताना सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण
सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मानवाधिकार कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांना जामीन मंजूर केला. २००२ साली गुजरातमध्ये घडलेल्या गोध्रा दंगलीशी संबंधित पुराव्याशी कथित छेडछाड केल्याचा आरोप तीस्ता सेटलवाड यांच्यावर आहे. आता सेटलवाड यांना या प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (१९ जुलै) सेटलवाड यांना नियमित जामीन मंजूर केला.न्यायमूर्ती बीआर गवई, ए.एस, बोपण्णा आणि दीपंकर दत्त या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने गुजरात उच्च न्यायालयाचा आदेश रद्दबातल ठरवला. गुजरात उच्च न्यायालयाचा निर्णय हा ‘विकृत’ आणि ‘विरोधीभासी’ असल्याचं निरीक्षणही सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं.
मुंबई, ठाणे कोकणातल्या शाळांना उद्या सुट्टी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये मागच्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस पडत आहे, तसंच पुढच्या 24 तासांमध्येही पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे, त्यामुळे उद्या मुंबईसह, ठाणे, कोकण विभागातील शाळांना एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची घोषणा केली आहे.मुंबईसह कोकणामध्ये कालपासूनच मुसळधार पाऊस पडतो आहे. कोकणातल्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे, तर मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल ट्रेनही विस्कळीत झाली आहे. हवामान खात्याचा इशारा बघता राज्य सरकारने मुंबई आणि कोकणातल्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच राज्यातील इतर भागांमध्ये स्थानिक प्रशासनाने परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा, असंही सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
Asia Cup च्या वेळापत्रकाची घोषणा, भारत-पाकिस्तान महामुकाबल्याची तारीखही ठरली
आशिया कप 2023 च्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. आशियाई क्रिकेट काऊन्सिलचे प्रमुख जय शाह यांनी आशिया कपचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यंदा पहिल्यांदाच ही स्पर्धा दोन देशांमध्ये खेळवली जाणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलंकेमध्ये आशिया कपचे सामने होतील. भारताने पाकिस्तानमध्ये खेळायला नकार दिल्यानंतर आशिया कप दोन देशांमध्ये खेळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबरदरम्यान आशिया कप खेळवला जाणार आहे. स्पर्धेचा पहिलाच सामना पाकिस्तान आणि नेपाळमध्ये मुलतानला होणार आहे. तर भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त तीन सामने होऊ शकतात.
सीमा हैदरसंदर्भात अनेक पाकिस्तानी कागदपत्रं आली समोर
पाकिस्तानातून नेपाळमार्गे भारतात आलेली सीमा हैदर प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सीमा हैदरशी संबंधित काही पाकिस्तानी दस्तऐवज समोर आले आहेत, यामध्ये सीमा आणि तिच्या परिवाराशी संबंधित महत्त्वाची माहिती एटीएसच्या हाती लागली आहे. तसेच सीमा हैदर ही पाकिस्तानातून गायब झाल्यानंतर तिचा पती गुलाम हैदरच्या नातेवाईकांकडून एफआयआर दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती समोर आली आहे.
मुंबईकरांनी लाईफलाईन थांबली, चाकरमानी ट्रॅकवरून निघाले घराकडे
ठाणे जिल्ह्यात बुधवारी (19 जुलै) सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलंय. दिवसभर पडलेल्या पावसामुळे कल्याणच्या पुढे रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. डोंबिवली ते कल्याण दरम्यान अनेक गाड्या एका पाठोपाठ एक अशा उभ्या आहेत. यामुळे कर्जत कसारा तसेच मुंबईकडे जाणाऱ्या येणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले. यामुळे अनेक चाकरमान्यांनी घर गाठण्यासाठी रेल्वे ट्रॅकचा मार्ग धरला.
कोल्हापुरात पावसाचा कहर, पुढील दोन दिवस यलो अलर्ट, यंत्रणा झाली सज्ज
मागच्या काही दिवसात दडी मारून बसलेल्या पावसाने आता राज्यभरात जोर धरला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस कोसळत असून कोल्हापुरात ही पावसाची मुसळधार सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी नदी, नाले आणि ओढे यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. बऱ्याच ठिकाणी बंधाऱ्यावर पाणी आल्यामुळे त्या ठिकाणची वाहतूक बंद झाली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या घाटमाथ्यासह धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. तर गगनबावडा, राधानगरी, आजरा आणि शाहूवाडी या तालुक्यांतील अनेक भागात अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडत आहे.
SD Social Media
9850 60 3590