विरोधकांची बंगळुरू, तर भाजपप्रणीत एनडीएची दिल्लीत बैठक
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांपासून ते सत्ताधाऱ्यांपर्यंत सर्वांनीच जोरदार तयारी सुरू केली आहे. विरोधकांनी काही महिने आधीपासूनच सत्ताधारी भाजपच्या विरोधात मोर्चा उघडला होता. २३ जून रोजी विरोधकांनी पाटणा येथे पहिली बैठक घेतली. त्यानंतर आज (१७ जुलै) बंगळुरू येथे दुसरी बैठक आयोजित करण्यात आली आहे. तसेच सत्ताधारी भाजपनेही आता मित्रपक्षांची जमवाजमव सुरू केली आहे. मंगळवारी (१८ जुलै) दिल्ली येथे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटकपक्षांची बैठक होणार आहे. काँग्रेस आणि भाजप हे पक्ष आपापल्या आघाडीमधील दोन मोठे पक्ष आहेत. त्यामुळे या पक्षांच्या हालचालींकडे इतर पक्षांचेही लक्ष लागले आहे.
विरोधकांच्या बैठकीमध्ये ‘राष्ट्रवादी काँग्रेस’च्या फुटीचे पडसाद?
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा विरोधकांच्या एकजुटीवर परिणाम होणार नाही, असे महाआघाडीतील नेते ठामपणे सांगत असले तरी, ‘राष्ट्रवादी काँग्रेस’च्या फुटीचे पडसाद बेंगळुरू येथे आजपासून (सोमवार व मंगळवार) होत असलेल्या बैठकीवर पडण्याची शक्यता आहे.‘संयुक्त पुरोगामी आघाडी’च्या अध्यक्ष सोनिया गांधींच्या उपस्थित होत असलेल्या बैठकीमध्ये ‘राष्ट्रवादी काँग्रेस’चे अध्यक्ष शरद पवार मंगळवारी (१८ जुलै) सहभागी होतील. सोमवारी मात्र पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे एकट्याच बैठकीला उपस्थित राहणार आहेत. पाटण्यामध्ये झालेल्या बैठकीला शरद पवार, सुप्रिया सुळे व प्रफुल पटेल असे ‘राष्ट्रवादी’चे तीनही दिग्गज नेते हजर राहिले होते. त्यानंतर ‘राष्ट्रवादी काँग्रेस’मधील फुटीनंतर पटेल हे अजित पवारांच्या गटात सामील झाले. बैठकीच्या पहिल्या दिवशी शरद पवार उपस्थित न राहण्यामागील कारण स्पष्ट केलेले नाही.
वंदे भारत एक्सप्रेसच्या कोचला आग, दिल्लीच्या दिशेनं निघाली होती ट्रेन!
‘वंदे भारत एक्स्प्रेस’ देशभरात चर्चेचा विषय ठरत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते देशातल्या विविध भागात अनेक वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवून त्यांचं उद्घाटन करण्यात आलं आहे. वंदे भारत एक्स्प्रेसच्या वैशिष्ट्यांबरोबरच या एक्स्प्रेसला होणाऱ्या अपघातांचीही चर्चा पाहायला मिळाली. वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यानंतर पहिल्या काही महिन्यांत वन्य प्राणी वा इतर पाळीव जनावरं ट्रॅकवर आल्यामुळे झालेल्या अपघातात काही ट्रेनच्या पुढच्या भागाचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं आहे. आता एका वंदे भारत एक्स्प्रेसच्या कोचलाच आग लागल्याची घटना समोर आली आहे.
जाहिरातींत घट, कर्जामुळे ‘ट्विटर’ तोटय़ात -मस्क
जाहिराती निम्म्याने कमी झाल्याने ‘ट्विटर’चा रोख नफा घटला आहे. व्यवसायिक सल्ला देणाऱ्या ‘ट्वीट’ला दिलेल्या प्रत्युत्तरादाखल ‘ट्विटर’चे प्रमुख एलॉन मस्क यांनी शनिवारी ‘ट्वीट’ केले, की ‘ट्विटर’च्या जाहिरातींच्या महसुलात सुमारे ५० टक्के घट झाली आहे. तसेच मोठय़ा कर्जामुळे अजूनही रोख नफा न होता तोटा होत आहे. सर्वात आधी रोख उत्पन्नातील हा नकारात्मक प्रवाह सकारात्मक करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करण्याची गरज आहे.‘ट्विटर’ ४४ अब्ज डॉलर मोजून ताब्यात घेतल्यापासून मस्क जाहिरातदारांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे. या कंपनीतून मोठय़ा प्रमाणावर वरिष्ठ अधिकाऱ्यांना हटवल्यानंतर जाहिरातदारांची चिंता वाढली आहे. ‘ट्विटर’ने पूर्वी प्रतिबंधित केलेले काही दिग्गज वापरकर्ते पुन्हा ‘ट्विटर’वर सक्रिय झाले आहेत. मस्क यांनी एप्रिलमध्ये स्पष्ट केले होते, की बहुतेक जाहिरातदार पुन्हा ‘ट्विटर’शी जोडले गेले आहेत. त्यामुळे दुसऱ्या तिमाहीत कंपनीचे रोख उत्पन्न सकारात्मक असू शकेल.
विम्बल्डन फायनलमध्ये जोकोव्हिचविरुद्धच्या रोमहर्षक विजयानंतर राफेल नदालने कार्लोस अल्कराझचे केले कौतुक
सातवेळा चॅम्पियन नोव्हाक जोकोव्हिचविरुद्ध विम्बल्डन पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत विजेतेपद मिळवण्यासाठी २० वर्षीय खेळाडूने जबरदस्त कामगिरी केल्यानंतर स्पेनचा अव्वल टेनिस स्टार आणि अल्कराझचा आयडॉल राफेल नदालने कार्लोस अल्कराझला खास शुभेच्छा दिल्या आहेत. रविवारी विम्बल्डन २०२३ ची ट्रॉफी हे कार्लोसचे दुसरे ग्रँड स्लॅम विजेतेपद ठरले. या स्पॅनिश खेळाडूने २०२२ साली यू.एस. ओपन जिंकून त्याचे पहिले ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकले होते. २० वर्षीय अल्कराझने ४ तास, ४२ मिनिटांत विम्बल्डनमध्ये जोकोव्हिचची ३४ सामन्यांची विजयी मालिका खंडित केली.
आशिया चषकात भारत-पाकिस्तान दोन वेळा भिडणार
आशिया चषक २०२३च्या अधिकृत वेळापत्रकाची घोषणा लवकरच केली जाणार असून भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटप्रेमीं त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. यावेळी, हायब्रीड मॉडेलमध्ये खेळल्या जाणार्या आशिया चषकाचे पहिले ४ सामने पाकिस्तानमध्ये आणि उर्वरित ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. त्याचबरोबर भारत आणि पाकिस्तान यांच्यात या स्पर्धेत किमान २ सामने खेळले जातील अशी पूर्ण आशा आहे. समोर आलेल्या माहितीनुसार येत्या बुधवारी आशिया चषकाचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. त्यात भारत आणि पाकिस्तान दोनवेळा भिडणार आहेत.
SD Social Media
9850 60 3590