आता आपण युपीआय किंवा ऑनलाईन बँकेच्या आधारे कोणालाही पैसे ट्रांस्फर करु शकता. परंतु काही व्यवहारांसाठी पैशांची आवशकता लोकांना असते. ज्यामुळे लोकांना ATM वापरावा लागतो. ATM मधून पैसे काढण्यासाठी आपल्याला कार्डचा वापर करावा लागतो. परंतु जर तुमच्याकडे कार्ड नसेल, तर मात्र पैसे काढताना मोठी समस्या उद्भवते.
परंतु आता काळजी करण्याची गरज नाही. कारण आता तुम्हाला एटीएम कार्डशिवायही पैसे काढता येणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी ही घोषणा केली आहे.
कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढता येतील
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, आता डेबिट कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा सर्व बँकांमध्ये दिली जाईल. आतापर्यंत फक्त काही बँकांमध्ये कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा होती. परंतु आता सर्वच बँकेच्या ग्राहकांना हे शक्य होणार आहे. त्यांनी सांगितले की आता UPI च्या माध्यमातून एटीएममधून पैसे काढता येणार आहेत.
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या मते, यामुळे कार्ड क्लोन करून पैसे काढण्याची फसवणूक कमी होईल. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी शुक्रवारी चलनविषयक धोरण जाहीर केले.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, एमपीसीने पॉलिसी दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. रेपो दर 4 टक्क्यांवर कायम आहे. मध्यवर्ती बँकेने व्याजदरात बदल न करण्याची ही सलग 11वी वेळ आहे. यापूर्वी, रिझर्व्ह बँकेने 22 मे 2020 रोजी रेपो दरात शेवटचा बदल केला होता.
रेपो रेट हा दर आहे, ज्यावर रिझर्व्ह बँक व्यावसायिक बँकांना त्यांच्या तात्काळ गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज देते. रिव्हर्स रेपो रेट अंतर्गत बँकांना त्यांचे पैसे रिझर्व्ह बँकेकडे ठेवल्यास व्याज मिळते.
MPC ने चालू आर्थिक वर्षासाठी आर्थिक विकास दराचा अंदाज 7.2 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. फेब्रुवारीच्या आर्थिक आढावा बैठकीत एमपीसीने आर्थिक विकास दर 7.8 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता.